अरुणाचल प्रदेश : जेव्हा 'ईशान्य भारतातलं स्वित्झर्लंड' आम्ही सायकलने गाठलं...

अरूणाचल प्रदेशमधील एक साकव Image copyright Prashant Nanaware

'उगवत्या सूर्याचा प्रदेश' म्हणून सर्वांना परिचित असलेलं अरुणाचल प्रदेश हे राज्य डोंगरदऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आगळ्यावेगळ्या लोकसंस्कृतीने संपन्न आहे.

पश्चिमेला भूतान, उत्तरेस चीन आणि पूर्वेला म्यानमार अशा तीन राष्ट्रांनी वेढलेलं हे राज्य भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. आणि अशा प्रदेशाला भेट देणं हा नेहमीच अंतर्बाह्य समृध्द करणारा अनुभव असतो.

मुंबई, पुणे, नाशिक, धुळ्याचे आम्ही काही तरुण-तरुणी गेली पाच वर्षं अरुणाचल प्रदेशची नियमित वारी करत आहोत. तवांग (2012), वालाँग (2013), टुटींग (2015) आणि मेन्चुका (2017) या सीमेवरच्या प्रदेशांना भेट देण्यासाठी आमचं साधन होतं सायकल!

जंगल, नदी, शेतांमधून, अरूंद रस्त्यांवरून, चिखलातून वाट काढत, मिळेल तिथे मुक्काम करत, स्थानिक पदार्थांची चव चाखत, लोकांशी संवाद साधत, तिथल्या संस्कृतीशी एकरूप होत सायकलवरून डोंगररांगा पार करण्याच्या या साहसी प्रवासात प्रत्येकवेळी नव्या गोष्टींची अनुभूती येते.

नोव्हेंबर महिन्यात आम्ही दहा सायकलस्वारांनी, ज्यात दोन मुलींचाही यात समावेश होता, अरुणाचलच्या पश्चिम सियांग जिल्ह्यातल्या मेन्चुका (सरकारी नोंदीनुसार मेचुखा) या ठिकाणाला दिलेली भेट अशीच आगळीवेगळी ठरली.

6000 फुटांची चढाई आणि 450 किमी सायकल प्रवास

मुंबई-कोलकाता-मोहनबारी (आसाम), असा विमानप्रवास केल्यानंतर आम्ही आसामच्या दिब्रूगढ इथून सायकलिंगला सुरुवात केली. बोगीबिलच्या किनाऱ्यावरून सायकल बोटीत टाकून ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र ओलांडलं आणि लिकाबारी-गारू-बसर-इगोकाटो-काईंग-थुंबिन-पेने-टाटो, या मार्गावरून 350 किलोमीटर अंतर सायकलने कापत आम्ही मेन्चुकाला पोहोचलो.

मेन्चुकाच्या पुढे यार्लुंग आणि लष्कराच्या हनुमान कॅम्पपर्यंत 60-70 किलोमीटरचं सायकलिंग आणि परतीच्या प्रवासात पुन्हा 70-80 किलोमीटर, असा एकूण 450 किमीचा सायकल प्रवास झाला.

इथे डोंगरांमध्ये वसलेल्या दोन गावांमधील अंतर साधारण 30-40 किमी असतं. एका गावातही साधारण 15-20 घरंच असतात. तिथे सर्वांची राहण्याची आणि जेवणाची सोय होईलच, असं नाही.

Image copyright Ashish Agashe
प्रतिमा मथळा मेन्चुकाला पोहोचलो तेव्हा सायंकाळचे पाच वाजले होते.

त्यामुळे आदल्या दिवशी सर्व माहिती काढून पुढील दिवसाच्या मुक्कामाची आणि राईडची योजना आखावी लागते. दररोज कमीतकमी एक हजार फुटांहून अधिकची चढाई ठरलेली. त्यात रस्ते खराब असल्यानं वेगही मंदावतो.

थुंबिन ते पेने या 40 किमी अंतरामध्ये तर तब्बल 3000 फुटांची चढाई केली. पुढे पेने-टाटो-मेन्चुका या दोन दिवसांमध्ये प्रत्येकी 2000 फुटांची चढाई करताना आमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षाच होती.

टाटोच्या २२ किलोमीटर अलीकडे माझ्या सायकलची चेनच तुटली. ती दुरुस्त करण्यात तब्बल दोन तास खर्ची झाले. पंक्चर, गिअर, ब्रेक प्रॉब्लेम, अशा लहानसहान अडचणी तर येतच असतात. पण डोंगरात आमचे आम्हीच असल्यानं एकाला जरी काही अडचण आली तरी सगळे थांबतात आणि विषय मार्गी लावला जातो.

भारताच्या ईशान्येकडील 'स्वित्झर्लंड'

सियोम (स्थानिक नाव यार्गीपचू) नदीच्या किनारी वसलेलं 4000 लोकवस्तीचं हे गाव भारत-चीनदरम्यानच्या मॅकमोहन सीमारेषेच्या अवघ्या 30 किलोमीटर अलीकडे आहे.

उंचच उंच पाईन वृक्ष, नदीवरचा झुलता पूल, बौध्द धर्मस्थळ, लाकडाची त्रिकोणी छप्परं असलेली एका रांगेतली रंगीबेरंगी घरं, समोर मोठं अंगण, अंगणात फुलझाडं आणि गावाच्या मध्यभागी मार्केट असलेलं चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं मेन्चुका.

खरोखरीच मेन्चुका हे भारताच्या ईशान्येकडील 'स्वित्झर्लंड' आहे. गावात सरकारी हस्तकला केंद्रही आहे. गेली पाच वर्षं मेन्चुकामध्ये 'अॅडव्हेंचर फेस्टीव्हल'ही आयोजित केला जात आहे.

Image copyright Ashish Agashe
प्रतिमा मथळा डोंगरावरून खाली दिसणारं मेन्चुका गाव.

हे गाव लहरी आहे. सकाळी सहा वाजता 'आलो' या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गावातून टॅक्सी सुटतात. तेव्हा कुडकुडतच गाव अंशत: जागं होतं. टॅक्सी गेल्या की गाव पुन्हा झोपी जातं आणि साडेआठ-नऊच्या सुमारास परत सर्व व्यवहार सुरू होतात.

एके दिवशी तर आम्ही सीमारेषेपर्यंत सायकलिंग करून सायंकाळी सात वाजता गावात परत आलो तर गावात चिटपाखरूही दिसलं नाही. दुसऱ्या दिवशी चौकशी केली तर कळलं, आदल्या दिवशी थंडी जरा जास्त होती त्यामुळे गाव लवकर झोपी गेलं.

सीमारेषेच्या या गावात भारतीय वायुसेनेचं 'अॅडव्हान्स लँडींग ग्राऊंड' (ALG) आहे. त्यामुळे पहाटे लवकर लष्कराचे जवान धावताना दिसतात. लष्कराचा वावर असला तरी गावाचं गावपण टिकून, आहे हे विशेष.

अपाँग आणि होम स्टे

'बसर' गावातून पुढे जाताना आम्हाला सपाट रस्स्त्यावरून आणि वळसा घालून 'आलो' या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं नव्हतं. 'बसर'मध्ये चौकशी केल्यानंतर 'इगोकाटो' गावातून जाणारा मार्ग कळला. रस्ता थोडा आडवाटेचा आणि चढाईचा होता पण याच रस्त्यावर न्योराक (Nyorak) म्हणून एक सुंदर गावही पाहायला मिळालं.

अरुणाचलच्या प्रत्येक व्हॅलीचं, असं एक स्थानिक पेय आहे. पाहुण्यांचं स्वागतही याच पेयाने केलं जातं. पश्चिम सियांग व्हॅलीमध्ये त्या पेयाला 'अपाँग' असं म्हणतात. 'बसर'मध्ये आमचं स्वागत अपाँगनेच झालं होतं, पण 'इगोकाटो'च्या 'होम स्टे'मध्ये अपाँग बनवतात कसं याचं प्रात्यक्षिकही पाहायला मिळालं.

Image copyright Prashant Nanaware
प्रतिमा मथळा 'इगोकाटो' गावातील होम स्टेमध्ये स्थानिक महिलांनी खास अरूणाचली नृत्य सादर केले.

तांदळापासून तयार केलेलं हे पेय बायका-पुरुष सगळेच पितात. पण ते प्रमाणातच प्यायलेलं बरं. नाहीतर सुर्यास्तानंतर अशा पेयाचं अति सेवन केल्यास झिंग चढू शकते.

अरुणाचली लोकं पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात कसलीच कसर सोडत नाहीत. आमच्यासाठी इथेच स्थानिक महिलांनी खास अरुणाचली नृत्य सादर केले. रात्रीच्या जेवणाला बांबू शूट चिकन, राईस आणि उकडलेल्या स्थानिक भाज्यांचा फक्कड बेत होता.

लष्करासोबत मुक्काम आणि रस्ते उभारणी

अरुणाचलमध्ये मुक्काम करताना आमची पहिली पसंती इंस्पेक्शन बंगलो, रेस्ट हाऊस, धार्मिक स्थळांचे निवारे किंवा गावातील घरांना होती. एखाद्या ठिकाणी यापैकी काहीच उपलब्ध झाले नाही तर मात्र पंचाईत होते. अशावेळी धावून येतं भारतीय लष्कर. GREF, BRO, लष्कराच्या तुकड्या वाटेत मदतीला तत्पर होत्या.

सुरक्षा आणि माहिती गुप्ततेच्या कारणास्तव स्थानिक लोक आणि पर्यटकांपासून सहसा थोडं लांबच राहणारं लष्कर आम्हाला डोंगरामध्ये सायकलिंग करताना पाहून एकाचवेळी आश्चर्यचकित आणि खूशसुध्दा होतं.

त्यातही एखादा मराठमोळा जवान, अधिकारी भेटला आणि त्यांना आम्ही मराठी तरुण आहोत हे कळलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना. अशावेळी अधिकाऱ्यांकडूनच चहापाण्याचं आमंत्रण यायचं. यावेळीही एका गावात राहण्याची सोय न झाल्याने लष्करासोबतच आम्ही मुक्काम केला.

भारत-चीन सीमेवरील तणावाच्या वातावरणाची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. परंतु अरुणाचलमध्ये सीमेवरील गावांमध्येही शांतता मोठ्या सुखाने नांदते ती केवळ भारतीय लष्करामुळे.

Image copyright Prashant Nanaware
प्रतिमा मथळा कायम स्मरणात राहिल असा लष्करासोबतचा मुक्काम.

घनदाट जंगलं आणि डोंगररांगांमुळे या प्रदेशात पायाभूत सुविधा उभारणीचं काम मोठया कष्टाचं आहे. विशेषत: रस्ते उभारणीचं काम 'बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन'च (BRO) करतं.

अरुणाचलमधील अंतर्गत जिल्हे रस्त्यांनी जोडले गेलेले असले तरी त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. सध्या सरकारने रस्ते दुरुस्तीची सर्व कामं थांबवली असून जिथे रस्ते आहेत तिथे थेट महामार्ग उभारणीचं काम युध्दपातळीवर सुरू केलं आहे.

देशातील इतर राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणं आणि सीमेपलीकडे चीनने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांना शह देण्याचा हा प्रयत्न असल्याचं स्थानिक लोकांकडून झालेल्या चर्चेतून समोर आलं.

मॉडर्न तरुणाई

भारतातल्या प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. त्यातही ईशान्येकडील सात राज्यं दिसणं, भाषा, खाद्यसंस्कृती, पोषाख याबाबतीतही अनोखी आहेत. त्यामुळे भारतातील इतर भागात जेव्हा ही मंडळी जातात तेव्हा त्यांना चिनी, नेपाळी म्हणून संबोधलं जातं.

पण अशा वागणुकीमुळे आपल्याच देशात आपण परकं असल्याची खंत इथला प्रत्येक माणूस बोलून दाखवतो, विशेषत: तरुणाई. नैसर्गिक गोष्टी खाण्याकडे इथल्या लोकांचा भर असल्याने दिसण्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण जातं.

Image copyright Prashant Nanaware
प्रतिमा मथळा न्योराक गावातील तरुणी

गोरापान रंग, नाकीडोळी निटस, सुडौल बांध्याचे तरुण-तरुणी पाहून त्यांचा हेवा वाटतो. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा मिलाप त्यांच्या पोषाखात, राहणीमानात दिसून येतो. ट्रेंडी कपडे, उंची जॅकेट्स, केशभूषा आणि मेकअपसह इथल्या तरुणाईला कायम अप-टू-डेट राहायला आवडतं.

मुख्य म्हणजे त्यांना तो रुबाब मिरवणं खूप चांगलं जमतं आणि शोभतंही. गरज आहे त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची.

धीट महिला

ईशान्येकडच्या बहुतांश राज्यांमध्ये स्त्रीसत्ताक कुटुंबपध्दती आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये आजही हुंडापध्दती असताना, अरुणाचलमध्ये मात्र मुलाने मुलीच्या घरच्यांना आपल्या ऐपतीप्रमाणे मिथून (बैलासारखा दिसणारा प्राणी) देण्याची प्रथा आहे.

जंगलात सोडलेले हे मिथून पडकून आणण्याचं शौर्य नवरदेवाला दाखवावं लागतं.

घरातल्या सर्व कामांसह शेतीची कामं, एवढंच नव्हे तर अपाँगदेखील महिलाच तयार करतात. इथल्या नवमातेच्या पाठीला कायम तिचं बाळ बांधलेलं दिसतं. घरातली आणि घराबाहेरची सर्व कामं करताना ती झाशीच्या राणीसारखी आपल्या बाळाला पाठीवर वागवत असते.

Image copyright Prashant Nanware
प्रतिमा मथळा बाळाला पाठीशी बांधून काम करणारी अरुणाचली महिला.

इथल्या बायका मार्केटमधल्या हॉटेलमध्ये बसून कधी बिनधास्तपणे बिअर पिताना दिसतात तर कधी चारचौघांमध्ये बाळाला भूक लागली तर मोकळेपणाने बाळाला स्तनपान देतात.

भाजीच्या दुकानांपासून ते अगदी दारूची दुकानंही महिलाच चालवतात.

खंबा नावाच्या गावात तर शाळेतल्या मुली 'दाव' (Dao) म्हणजेच सुरीसारखा एक मोठा चाकू कमरेला बांधून फिरताना दिसल्या. आता बोला, होईल कुणाची हिम्मत त्यांच्याशी पंगा घ्यायची?

डुकरांच्या कथा

अरुणाचलमध्ये डुक्कर हा खूप महत्त्वाचा प्राणी आहे. आहारात त्याचं मांस मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. बसर गावात मिळालेल्या माहितीनुसार, इथल्या आजूबाजूच्या गावात डुकरांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, की इथली लोकं काही ना काही निमित्त काढून 'डुक्कर पार्टी' करत असतात.

पण आता डुकरांमुळे आर्थिक, सामाजिक, पर्यावरण आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याने याबाबत समाजप्रबोधन करण्याचं महत्त्वाचं काम बसरमध्ये GRK सारख्या सामाजिक संस्था करत आहेत.

Image copyright Ashish Agashe
प्रतिमा मथळा मेन्चुका हे भारताच्या ईशान्येकडील 'स्वित्झर्लंड' म्हणून ओळखले जाते.

अरुणाचलमधील घरांची रचना वेगळी आहे. बांबू आणि लाकडाच्या पट्ट्या उभ्या करून उंचावर इथली घरं बांधली जातात. घराच्या बाजूला शौचालयही उंचीवर बांधलेलं असतं. पण खरी गंमत शौचास बसल्यावर येते.

कारण शौचालयाच्या खालीच डुकरांच्या राहण्याची जागा केलेली असते. तुमच्या पोटातलं पदार्थ हेच त्याचं अन्न असतं आणि ते खाण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. नवखा माणूस त्यांच्यातली भांडणं आणि आवाजाने चांगलाच गोंधळून जातो.

फुलपाखरांची जत्रा

फुलपाखरांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी भारतात कुठली योग्य जागा असेल तर ती म्हणजे अरुणाचल प्रदेश, इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतकी विविध फुलपाखरं इथेच पाहायला मिळतात.

सायकलिंग करताना डोक्यावरचं हेल्मेट, सायकलचा हँडलबार यावर बसून कित्येक फुलपाखरांनी आमच्यासोबत प्रवास केला आहे. सायकलच्या चाकाच्या मध्येमध्ये ती घुटमळत असतात. फोटो काढायला सायकल थांबवावी तर मात्र दूर पळतात.

अनेक ठिकाणी तर डोंगराच्या कपारीतून वाहणाऱ्या पाण्याशेजारी उगवलेल्या हिरवळीवर आणि शेवाळांवर स्वच्छंदीपणे बागडताना दिसतात. मेन्चुकाच्या अलीकडे 'रिलो' नामक गावाच्या आधी दगड-मातीच्या अतिशय खराब रस्त्याचा ४ किलोमीटरचा चढ आहे.

Image copyright Prashant Nanaware
प्रतिमा मथळा मोठ्या प्रमाणात फुलपाखरं अरुणाचल प्रदेशमध्ये पहायला मिळतात.

त्या चढाबद्दल ऐकून आणि पाहूनच मनात धडकी भरली होती. पण चढाच्या अगोदर डोंगराच्या एका कोपऱ्यात फुलपाखरांची जत्रा भरलेली पाहायला मिळाली. ऐकून आश्चर्य वाटेल पण जवळपास एक हजाराच्या आसपास फुलपाखरं होती. तेच दृष्य डोळ्यात साठवून आम्ही सर्वजण तो चढ चढलो.

४ वाजताच काळोख आणि चांदणं

भारतात पहिलं सूर्यकिरण वालाँगजवळच्या डाँग नावाच्या गावात पडतं. अरुणाचलमध्ये सूर्योदय लवकर होत असल्याने सूर्यास्तही लवकरच होतो. त्यामुळे पहाटे पाच वाजता लख्ख प्रकाश आणि सायंकाळी ४ वाजता काळोख व्हायला सुरुवात होते. पाच वाजता तर मिट्ट काळोख पडलेला असतो.

अंधार लवकर पडत असल्याने पॅडलिंगही लवकर थांबवावं लागतं. अंधारात चालवण्याची आमची सर्व तयारी असली तरी अनोळखी प्रदेशात आणि घनदाट जंगलातून सायकलिंग करणं शक्यतो आम्ही टाळतो.

पण यावेळी अतिशय खराब रस्त्यांशी आमचा सामना झाल्याने मुक्कामी पोचायला आम्हाला दररोज उशीर व्हायचा. तरीही अंधारात चालवणं म्हणजे चांदण्यात चालवण्यासारखं असतं.

विरळ लोकवस्ती आणि डोंगराळ भागामुळे आजूबाजूला कृत्रिम प्रकाश नसतो. अशावेळी १८० च्या कोनात चांदण्यांची चादर अंथरलेल्या आकाशाखाली सायकल चालवण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.

'पेणे'च्या मुक्कामात तर जेवून बाहेर फेरफटका मारायला गेलो असता एक तुटलेला तारा चक्क ३-४ सेकंद आमच्यासमोरून प्रवास करत होता.

Image copyright Prashant Nanaware
प्रतिमा मथळा जंगलातून नाहीतर नदीच्या किनाऱ्यावरूनच तुमचा प्रवास सुरू असतो.

एखादा प्रदेश सायकलने फिरण्याची मजा काही औरच आहे. जिथे सामान्य लोकांना आणि इतर वाहनांना जाणं शक्य होत नाही, तिथे सायकलमुळे जाणं शक्य होतं.

यापूर्वीही म्यानमारची सीमा ओलांडून 'लेक ऑफ नो रिटर्न' पर्यंत जाण्याची परवानगी आम्हाला केवळ सायकलमुळेच मिळाली होती.

अरुणाचलमध्ये फिरताना कुठेही भाषेची अडचण येत नाही. इथे हिंदी सर्वश्रृत आहे.

आजवरच्या अरुणाचल प्रदेशच्या राईडमध्ये अनोळखी लोकांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य, मदतीची भावना, प्रेम अनुभवण्याची संधी सायकलनेच दिली आहे. त्यामुळे इथे पुन्हा-पुन्हा सायकलने जाण्याची ओढ काही केल्या कमी होत नाही.

(अरुणाचल प्रदेशमध्ये भ्रमंती करून आलेली आमची सायकल राईड टीम - अवंती दराडे, शुभांगी पालवे, आशिष आगाशे, कपिल केळकर, दिनानाथ सावंत, सिध्देश काकाणी, डॉ. मंदार कर्वे, त्रिलोक खैरनार, रमांकात महाडिक आणि प्रशांत ननावरे.)

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)