'ज्यानं माझ्या मुलीला जाळलं तो सुटता कामा नये'

संध्या
प्रतिमा मथळा ज्या ठिकाणी संध्याला जाळलं त्या ठिकाणी एका झाडावर तिचा फोटो लावण्यात आला आहे.

लग्नाला नकार दिल्यामुळे हैदराबादच्या संध्याराणी या 28 वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्यात आलं.

तिच्या मृत्यूमुळं तिचे कुटुंबीय हादरलेत. जेव्हा बीबीसीच्या प्रतिनिधी दीप्ती बत्तिनी यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी आपलं मन मोकळं केलं.

संध्याची बहीण सरितानं बीबीसीला सांगितलं, "अक्का, मला माहितीये मी मरणार आहे. माझं पोट जळतंय...पण त्याला मोकाट सोडू नका...त्याला नक्की शिक्षा व्हायला पाहिजे, असं संध्या मला म्हणाली होती."

प्रतिमा मथळा संध्याच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

लकी ट्रेडर्स या अॅल्युमिनियम मटेरियल सप्लायच्या दुकानात संध्या काम करत होती. त्याच ठिकाणी तिच्यासोबत काही काळ काम करणाऱ्या कार्तिक वांगा या तरुणावर तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

सिकंदराबादमधल्या लालपेटमध्ये संध्याचं घर आहे. तिथं ती दोन खोल्यांच्या घरात आई आणि आपल्या भावंडांसोबत राहत होती.

संध्याच्या घरी गेल्यावर तिची आई आम्हाला पाहून म्हणाली, "माझ्या राणीला भेटायला आलात ना? ती गेली... त्यानं तिला मारलं..." असं म्हणून त्या बाजूच्या खुर्चीवर कोसळल्या.

त्यांच्या घरात एक पोमेरियन जातीचं कुत्रं आहे. तो बावरल्यासारखं करत होता. तो काहीतरी शोधत आहे असं वाटत होतं. संध्याच्या आईनं संध्याचा फोटो त्याच्यासमोर धरला. आणि तो त्या फोटोकडे पाहून भुंकू लागला.

प्रतिमा मथळा संध्याचा टॉमीवर फार जीव होता.

संध्याचा भाऊ एन. किरण यांनी त्या कुत्र्याला जवळ घेतलं आणि त्याला कुरवाळू लागला. "कालपासून टॉमी असं वागत आहे. संध्याचा टॉमीवर फार जीव होता. ती त्याला खाऊ-पिऊ घालायची, अंघोळ घालायची. कदाचित तिची आठवण त्याला येत असावी," असं किरणनं सांगितलं.

संध्याची आई सावित्री यांनी सरिताला सांगितलं, "संध्याचा फोटो घेऊन ये." त्या फोटोकडे एकटक पाहून त्या बोलू लागल्या, "पाहिलंत ती किती सुंदर दिसत होती. त्यानं तिच्यावर पेट्रोल टाकलं... तिला जाळलं... माझ्या बाळाला किती त्रास सहन करावा लागला असेल... तो सुटता कामा नये."

संध्या व्यतिरिक्त सावित्री यांना दोन मुली आणि तीन मुलं आहेत. संध्या सर्वांत लहान होती. चार वर्षांपूर्वी संध्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिनं तिच्या परीनं कुटुंबाची जबाबदारी उचलली होती.

प्रतिमा मथळा 'तिला खूप त्रास सहन करावा लागला...'

तिनं काही दिवस बॅंकेत काम केलं. गेल्या 14 महिन्यांपासून ती लकी ट्रेडर्समध्ये कम्प्युटर ऑपरेटरचं काम करत होती.

"ती खूप नियोजनबद्धरितीनं काम करत असे. कुणाला काय हवं काय नको याचा ती विचार करत असे. आमच्या घर खर्चाचं ती नियोजन करत असे आणि ते ती पार पडत असे," अशी आठवण सरिता यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितली.

संध्याला कुणी त्रास देत होतं अशी आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती. जर आम्हाला याबद्दल आधी थोडंही कळलं असतं तर आम्हाला काही करता तरी आलं असतं, असं किरणनं सांगितलं.

ऑफिसमध्ये गेल्यावर

तिच्या घरापासून अगदी जवळ असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये आम्ही पोहचलो. तिच्या घरापासून ऑफिसला चालत जाण्यास फक्त 15 मिनिटं लागतात.

संध्याच्या जाण्याचा धक्का लकी ट्रेडर्सचे मालक जगन रेड्डी यांना देखील बसला आहे. एका रिकाम्या टेबल खुर्चीकडे हात दाखवून त्यांनी म्हटलं, "तिथं संध्या बसत होती. आता मला माझा हात आखडला आहे असं वाटतं. आमचे सगळे आर्थिक व्यवहार तीच पाहत होती."

"कंप्युटरचे पासवर्ड, बॅंक खात्यांचे पासवर्ड तिलाच माहीत होते. आम्हालाच नाही तर आमच्या ग्राहकांना देखील हे ऐकून फार वाईट वाटलं. ती गेल्याचं कळल्यावर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे."

प्रतिमा मथळा 'त्या खुर्चीवर संध्या बसत होती. ती नसली तर माझा हात आखडल्या सारखं होतं'

कार्तिकनं (ज्याच्यावर संध्याच्या हत्येचा आरोप आहे) लकी ट्रेडर्समध्ये चार महिने काम केलं. नंतर तो वेळेवर कामाला येत नसल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.

"संध्याला कामावर ठेवा असं कार्तिकनं आम्हाला सांगितलं होतं. तो म्हणाला ती उत्तम काम करते. मग आम्ही तिला कामावर ठेवलं आणि ती चांगलं काम करू लागली," असं रेड्डी सांगतात.

त्या दोघांची ओळख कशी झाली याबद्दल कुणालाच काही माहीत नाही. कार्तिकनं लग्नाची मागणी घातली आणि त्यानं तिच्याकडं लग्न करण्याचा आग्रह धरला. ही बाब तिनं लकी ट्रेडर्सच्या मालकांना सांगितली. हे कळताचं रेड्डींनी कार्तिकला दुकानावर बोलवून घेतलं.

संध्याला त्रास देऊ नको, असं रेड्डींनी कार्तिकला समजावून सांगितलं होतं. रेड्डी सांगतात, "जर मुलीला तुझ्यात काही रस नाही तर मग तिला तू का त्रास देत आहेस असं मी त्याला म्हटलं होतं."

पण कार्तिक म्हणाला, "जर तिला मी आवडत नाही तर मग तिनं मी दिलेला मोबाइल फोन का स्वीकारला."

रेड्डी यांना हे ऐकून आश्चर्य वाटलं. त्यांनी संध्याला मोबाइलबद्दल विचारलं. ती म्हणाली, "हा फोन मीच विकत घेतला आहे. पण जर तो माझा पिच्छा सोडणार असेल तर हा फोन त्याला देऊन टाका."

प्रतिमा मथळा हैदराबादच्या याच लकी ट्रेडर्समध्ये संध्या काम करत होती.

त्यानंतर कार्तिकचा रेड्डींना फोन आला होता. "संध्याचा फोन तुम्ही का घेतला असा जाब त्यानं विचारला," असं रेड्डी सांगतात.

"त्यावेळी मला माहीत नव्हतं की, तो संध्यासोबत आहे. जर याची मला कल्पना आली असती तर मी माझी माणसं पाठवून संध्याची सुटका करून घेतली असती."

मोबाइल प्रकरणाबद्दल संध्याच्या भावाला विचारलं असता त्यान या गोष्टीला नकार दिला. "हे साफ खोटं आहे. संध्यानं कधी त्याच्याकडून काही घेतलं नाही. तसंच संध्याला नोकरी तिच्याच प्रयत्नांमुळे लागली होती. कार्तिकनं शिफारस केली होती असं म्हणणं चुकीचं आहे," असं तो सांगतो

कार्तिकच्या आईचं काय आहे म्हणणं?

कार्तिकच्या कुटुंबीयांची बाजू देखील बीबीसीनं जाणून घेतली. कार्तिकच्या घराला मोठ्ठं कुलूप लावलेलं होतं. आम्ही का आलो आहोत याची त्यांच्या शेजाऱ्यांना कल्पना आली.

"ज्या दिवशी ती घटना घडली तेव्हापासून त्यांच्या घराला कुलूप आहे," असं समोरच्या दुकानदारानं सांगितलं.

प्रतिमा मथळा कार्तिकची आई.

बीबीसीनं कार्तिकची आई व्ही. उर्मिला यांना फोन केला. त्यांना विचारलं, "कार्तिक त्या मुलीला त्रास देत होता याची तुम्हाला कल्पना होती का?" त्यावर त्या म्हणाल्या, "तो तिच्या प्रेमात होता."

"तिच्यासोबत मी लग्न करणार असं तो म्हणत असे. तिनं देखील त्याला फूस लावली असणार, नाही तर तो तिच्या पाठी इतका लागला असता का?" कार्तिकच्या आई प्रश्न विचारतात.

"ते दोघं एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होते. एकदा ते दोघं बसस्टॉपवर बोलत उभे होते. मी माझ्या मुलाला तिच्याबद्दल विचारलं. त्यानं सांगितलं की माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार," असं त्या म्हणाल्या.

मग त्यांनी त्या दोघांविषयी खूप काही सांगितलं. कार्तिकनं एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता असं त्याच्या आईनं सांगितलं.

"माझे पती खूप दारू पीत होते, त्यातच त्यांचं निधन झालं. सगळी जबाबदारी कार्तिकवर पडली," असं त्या म्हणाल्या.

"गेल्या महिन्याभरापासून कार्तिक दारू पिऊ लागला होता. त्या दिवशी तो लवकर कामावर गेला. आणि दुपारी घरी आला. त्यानं बीअरची बाटली सोबत आणली होती. त्यानं बीअर घेतली आणि संध्याला भेटून येतो असं सांगितलं. थोड्या वेळानंतर मी त्याला फोन केला आणि विचारलं घरी कधी येणार आहेस? त्यानं सांगितलं की पाच मिनिटांत घरी येईल. पण पुढच्या पाच मिनिटांत त्याचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की मी संध्याला जाळलं," असं सांगून त्या धाय मोकलून रडू लागल्या.

कार्तिकला त्याच दिवशी अटक करण्यात आली. सध्या तो हैदराबादच्या चंचलगुडा तुरुंगात आहे.

"आम्ही आमच्या घरात होतो. रस्त्यात मोठा आरडाओरडा सुरू झाला. मी बाहेर आलो. तर पाहिलं की एक मुलगी जळत आहे. लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णवाहिकेला बोलवलं. तिला गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं," असं एका प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीला सांगितलं.

रुग्णालयात असताना संध्यानं मृत्यूपूर्वी दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला. ती म्हणाली, "कार्तिकनं माझ्यासोबत हे कृत्य केलं."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)