वाढदिवस विशेष : रामदास आठवलेंच्या 7 रंजक कविता

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी
रामदास आठवले

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या राजकीय पटलावर रामदास आठवले एक मोठं नाव. आज त्यांच्या 58व्या वाढदिवशी त्यांच्या एका खास वैशिष्ट्यावर प्रकाश टाकूया.

दलित पॅंथर चळवळीच्या काळात त्यांची 'सर्वांना सोबत घेऊन जाणारा', 'राज्यभर फिरणारा' आणि 'एक खंदा कार्यकर्ता', अशी ओळख निर्माण झाली होती. कार्यकर्तांची मोट बांधत बांधत त्यांनी आपल्या पाठीमागे मोठा जनाधार उभा केला.

पण आधी राष्ट्रवादीसोबत मैत्री आणि मग ज्यांच्यावर टीका करत होते, त्या भारतीय जनता पक्षाबरोबरच हातमिळवणी, अशा राजकीय कोलांटउड्या खालल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली.

राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आज ते केंद्र सरकारमध्ये सामाजिक कल्याण राज्यमंत्री आहेत.

त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पण याबरोबरच त्यांची एक खास ओळखही लोकप्रिय आहे, ती म्हणजे एका कवीची.

एका कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली होती. "माझ्यातल्या कोणता खास गुण तुम्हाला आवडतो?" असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं होतं.

फडणवीसांचं उत्तर - "तुमची जिंदादिली आणि तुमच्या कविता मला आवडतात."

गंमत म्हणजे, आठवले यांना चटकन कविता सुचते. कोणत्याही कार्यक्रमाला ते गेले आणि भाषणाला सुरुवात केली, की श्रोते कवितांचा आग्रह धरतात. आणि जनतेच्या आग्रहाचा आदर करत, आढेवेढे न घेता, ते आपली कविता सादर करतात.

त्यांच्या कविता सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहेत. फेसबुकवर "रामदास आठवलेंच्या कविता" नावाने एक पेजही आहे. त्यावरून त्यांची नव्या पिढीतली 'क्रेझ' काय आहे, याची कल्पना येऊ शकते.

आणि केवळ कार्यक्रमांमध्येच नाही तर कधीकधी राज्यसभेतही त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. एकदा तर त्यांनी GST सारख्या विषयावरही त्यांनी कविता केली होती.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सादर आहेत त्यांच्या सात वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता.

1. रामदास आठवले कोण आहे?

रामदास आठवले कोण आहे? असा प्रश्न तुम्ही विचारला तर ते काव्यातूनच उत्तर देतात.

रामदास आठवले कोण आहे...

अरे तो माणसा-माणसाला जोडणारा फोन आहे...

रामदास आठवले कोण आहे?

तो तर दलित चळवळीचा बोन आहे...

रामदास आठवले कोण आहे?

तो तर दलित-सवर्णांना जोडणारा झोन आहे...

2. GST वर कविता

राज्यसभेत GSTवर चर्चा सुरू होती. विरोधी पक्षाचं म्हणणं होतं की या मसुद्यात बदल करा. GSTचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी ही कविता सादर केली.

देश की गरिबी नहीं हटी,

इसलिए अरुण जेटलीजीने लाई है GST

GSTकानून जब हो जाएगा अपना,

तब होगा पुरा बाबासाहेब आंबेडकर का सपना!

3. हामिद अंसारीना निरोप

माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांच्या निरोपासाठी देखील त्यांनी एक कविता केली होती. ऐरवी त्यांच्या कवितेतून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या आठवलेंनी उप-राष्ट्रपतींवर कविता सादर करून सर्वांना भावूक केलं होतं.

आप जा रहें है दस सालों की यादों को यहां छोडकर...

आप जा रहे है सत्ताधारी और विरोधी पक्ष को जोडकर

आपने सबका जीत लिया था दिल,

इसलिए हम सबको हो रहा है फील...

नियमों से हाऊस को चलाने वालेआप थे बहोत अच्छे व्हील...

इसलिए आपने पास किये सैकडों बिल..

4. स्वप्न कसं पूर्ण करणार?

दलित पॅंथरमध्ये असल्यापासूनच त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेलं समतेचं स्वप्न आपण कसं पूर्ण करणार, असं त्यांनी या कवितेतून म्हटलं आहे.

फोटो स्रोत, MANPREET ROMANA/GettyImages

फोटो कॅप्शन,

रामदास आठवले

ज्यांनी दलितांसाठी केले होते आपले हौद खुले,

त्यांचं नाव होतं महात्मा फुले

आता गावागावात जागी होत आहेत आपली मुले

कारण बाबासाहेबांनी केलं होतं आपल्यासाठी शिक्षण खुले

आमची उद्धारली आहेत कुळे, माझ्या भीमामुळे...

आता आम्ही राहिलो नाहीत खुळे

कारण आम्हाला फुलवायचे आहेत बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचे मळे

6. नितीन गडकरींना 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अशा काव्यात्मक शुभेच्छा दिल्या

नितीन गडकरीजी तुम्ही पूर्ण केले आहेत वर्ष साठ...

आता मी कधीच सोडणार नाही तुमची पाठ!

साऱ्या देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदीजींची लाट...

म्हणूनच तुमच्यासोबत पडली आहे माझी गा!

आता आपण धरूया महाराष्ट्राच्या विकासाची वाट!

7. आपल्याला मंत्रिपद कसं मिळालं, याचं वर्णन आठवलेंनी या कवितेतून केलं आहे

मंत्रिपद मिळाले आहे मला...

ते कसे मिळावायचे, याची येते मला कला..

म्हणूनच हा समाज इथे आला...

कारण मी आहे सच्चा जयभीमवाला

माझा वाढदिवस नाही, विषमतेचा गाडदिवस

आठवले आपल्या कार्यकर्तांना सांगतात, "माझा वाढदिवस फक्त नावापुरता साजरा करू नका, मला विषमतेचा अंत झालेला याचि देही याचि डोळा पाहायचा आहे."

फोटो स्रोत, Twitter/ramdas athavle

त्यांनी आपले विचार या छोट्याशा कवितेतून मांडले आहेत,

"माझा नका करू साजरा वाढदिवस, मला पाहायचा आहे विषमतेचा गाडदिवस."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)