शेतकरी आंदोलन: शीख धर्मियांमध्ये का आहे नांदेडला एवढं महत्त्व?
- निरंजन छानवाल
- बीबीसी मराठी

फोटो स्रोत, PAL PILLAI/GETTY IMAGES
गुरू गोविंद सिंग यांनी शीख धर्मातील देहधारी गुरूंची परंपरा संपवत गुरू ग्रंथ साहिबला गुरूपदी विराजमान केलं ते नांदेडमध्येच. शीख धर्मियांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न.
"परमात्म्याच्या इच्छेनुसार मी या पंथाची स्थापना केली आहे. माझ्या सगळ्या शीख बांधवांना या ग्रंथाचं पालन करण्याचा आदेश मी देतो. या पवित्र ग्रंथावर तुमच्या गुरूसारखीच आस्था ठेवा आणि याला परमात्म्याचं एक रूपच समजा. ज्याचं मन पवित्र आहे तो या ग्रंथाच्या पवित्र शब्दांनुसार आपलं आचरण करेल."
...हे शब्द आहेत गुरू गोविंद सिंग यांचे. नांदेडमधल्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वारानुसार, नांदेड इथं 7 ऑक्टोबर 1708 ला परलोकगमनाला (स्वर्गारोहण) जाण्याआधी त्यांनी हा संदेश दिला होता.
फोटो स्रोत, Hazursahib.com
नांदेडची सचखंड हजूर साहिब गुरूद्द्वारा
त्याआधी त्यांनी देहधारी गुरूंची परंपरा समाप्त करत गुरू ग्रंथ साहिबला (गुरू-ता-गद्दी) गुरूपदी विराजमान केलं. गुरू ग्रंथ साहिबला त्यांनी सर्वसमावेशक उत्कृष्ट आदर्शांचा भंडार बनवलं. एक आध्यात्मिक आणि धर्मनिरपेक्षक गुरू ज्यात शीख गुरूंसोबतच सर्व धर्मातील संतांची पदं समाविष्ट करण्यात आली आहेत.
देहधारी गुरूंची परंपरा खंडित
नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि इतिहास अभ्यासक डॉ. दिलीप गोगटे सांगतात, "नांदेड वास्तव्यादरम्यानच गुरू गोविंद सिंग यांनी देहधारी गुरूंची परंपरा संपवण्याचा निर्णय घेतला होता. स्वतःनंतर गुरू ग्रंथसाहीबला प्रस्थापित करण्याचाही निर्णय त्यांनी इथंच घेतला."
फोटो स्रोत, NARINDER NANU/GETTY IMAGES
अमृतसर ते नांदेडदरम्यान सचखंड एक्स्प्रेस धावते.
डॉ. गोगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नांदेड इथंच त्यांनी खालसा पंथाला आदेश दिला की यानंतर कायमचं गुरूपद हे गुरू ग्रंथ साहीबला असेल. तसंच ते असेही म्हणाले, जन्माला आलेल्या प्रत्येक शीखानं त्याच्या आयुष्यात एकदा तरी नांदेडला यावं. श्री गुरू प्रत्येक शीखाच्या वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत नांदेड इथं त्यांची वाट पाहतील."
महाराष्ट्राशी असलेलं नातं
गुरू गोविंद सिंग महाराष्ट्रात कसे आले आणि नांदेडलाच त्यांनी का निवडलं? याविषयी डॉ. गोगटे म्हणतात, "गुरू गोविंद सिंग यांचं औरंगजेबाशी युद्ध झालं. त्यानंतर ते मध्य प्रदेशमार्गे नांदेडला आले. या काळाबद्दल विविध मतं आहे."
फोटो स्रोत, PAL PILLAI/GETTY IMAGES
नगीना घाट (संग्रहीत छायाचित्र)
"नांदेडचा गोदावरी नदीलगतचा नगीना घाट परिसर त्यांना फारच आवडला. आता इथंच वास्तव्य करावं असं त्यांनी ठरवलं."
"चमकोरची लढाई आणि सातत्यानं सुरू असलेल्या धावपळीमुळे त्यांना विश्रांती हवी होती. त्यांच्या पत्नी आणि गुरू मातासाहेब सुद्धा इथंच राहत असतं. सैनिकांना आणि सेवकांना त्या हातानं जेवण करून वाढत," अशी माहिती त्यांनी दिली.
नांदेडचं महत्त्व
नांदेडचं महत्त्व विषद करताना ते सांगतात, "प्रत्येक शीखाच्या दृष्टीनं नांदेड गुरूद्वाराचं महत्त्व दोन कारणांमुळे आहे. एकतर इथं ग्रंथ साहीबला गुरूपदी विराजमान कऱण्यात आलं. आणि दुसरं म्हणजे अंतिम देहधारी गुरूंची समाधी इथंच आहे. या समाधीला पंजाबी भाषेत 'अंगीठा साहेब' म्हटलं जातं."
नांदेडच्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वाराचे कथाकार बाबा विजेंदरसिंग यांच्या मते, ही त्यांच्या पूर्वजन्मीची तपोभूमी होती म्हणूनच ते इथं आले.
फोटो स्रोत, PAL PILLAI/GETTY IMAGES
"श्री गुरू गोविंद सिंग यांनी जिथं अंतिम श्वास घेतला तिथंच महाराजा रणजितसिंग यांनी गुरूद्वारा बांधली. शीख धर्मातल्या पाच तख्तांपैकी हे एक तख्त आहे," विजेंदरसिंग यांनी सांगितलं.
नांदेडलाच गुरू गोविंद सिंग यांनी सप्टेंबर 1708 च्या पहिल्या आठवड्यात वैरागी साधू माधोव दास यांना शीख धर्माची दीक्षा दिली आणि बंदासिंग बहाद्दूर असं त्यांच नामकरण केलं.
पुढच्या सात वर्षांत (1709-1715) त्यांनी शीखांच्या इतिहासाला एक वेगळ वळण देत 1764-65 मधल्या पंजाबच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला.
फोटो स्रोत, Hazursahib.com
त्यांचे अजून एक शिष्य भाई संतोख सिंग यांनी नांदेड इथंच राहून 'गुरू का लंगर' सुरू करण्याचा सल्ला त्यांना दिला. याच ठिकाणी गुरू गोविंद सिंग यांच्या पंच प्याऱ्यांपैकी दोन भाई दयासिंग आणि धरमसिंग यांनी शेवटचा श्वास घेतला.
गुरू गोविंद सिंग यांची जयंती काही ठिकाणी 22 डिसेंबरला साजरी केली जाते. उत्तर भारतात पुढीच्या वर्षी 5 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पण नांदेड इथल्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्द्वारातर्फे ही जयंती 25 डिसेंबरला साजरी केली जात असल्याची माहिती बाबा विजेंदरसिंग यांनी दिली.
संत नामदेवांची सर्वाधिक पदं
पत्रकार सचिन परब माहिती देतात, "गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांची तब्बल 61 पदं आहेत. गुरू नानक साहिब यांच्या अगोदर ज्यांची-ज्यांची पदं समाविष्ट करण्यात आली, त्यात सर्वाधिक संत नामदेवांची आहेत."
फोटो स्रोत, Hazursahib.com
गुरू-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त निघालेली जागृत यात्रा.
"गुरू गोविंद सिंग यांना महाराष्ट्रात यावसं वाटलं असेल यामागे कदाचीत हेच ऋणानूबंध असावेत, अस मला वाटतं. संत नामदेव हे दोन दशकांहून अधिक काळ पंजाबमध्ये राहीले आहेत. संत नामदेवांचं मुळ गाव नरसी नामदेव हे नांदेडपासून जवळच आहे. आजही शीख धर्मिय लोकं नांदेडला आल्यावर नरसी नामदेवला आवर्जून जातात," असंही सचिन परब सांगतात.
गुरू-ता-गद्दी सोहळा
गुरू गोविंद सिंग यांनी 1708 मध्ये देहधारी गुरूंची परंपरा समाप्त करत गुरू ग्रंथ साहिबला (गुरू-ता-गद्दी) गुरूपदी विराजमान केलं. गुरू ग्रंथ साहिब हे अकरावे गुरू. या घटनेला तीनशे वर्षे झाली. त्यानिमित्त 2008 मध्ये नांदेड इथं गुरू-ता-गद्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
फोटो स्रोत, PAL PILLAI/GETTY IAMGES
गुरू-ता-गद्दी सोहळ्यास तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.
जगभरातून शीख धर्मीय इथं आले होते. साधारणतः वर्षभर हा सोहळा सुरू होता. त्यासाठी केंद्र सरकारनं 800 कोटींच पॅकेजही दिलं होतं. त्यातून अनेक विकासकामं इथं झाली.
"ज्ञानदेवा रचिला पाया, तुका झालासी कळस, यासारखंच गुरू नानक साहब यांनी पाया रचला आणि गुरू गोविंद सिंग यांनी कळस चढवला. 300 वर्षांनंतर नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेला सोहळा हेच शिकवतो की, कुठल्याही पंथाचं कार्य हे वाया जात नसतं," असं के. आर. एम. महिला महाविद्यालयाचे प्रा. मनोज बोरगावकर सांगतात.
तुम्ही हे वाचलंत का?
तुम्ही हे पाहिलं का?
पाहा व्हीडिओ : कुटुंबीयांसोबतच्या भेटीनंतर कुलभूषण यांचा व्हीडिओ जारी
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)