प्रेस रिव्ह्यूः मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा तिहेरी तलाकला विरोध

प्रातिनिधिक छायाचित्र Image copyright NOAH SEELAM/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

तिहेरी तलाक विधेयक घटनाविरोधी असल्याचं मत व्यक्त करत 'ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'ने हे विधेयक मागे घेण्यात यावं, असं आवाहन केंद्र सरकारला केलं आहे. याशिवायही इतर ठळक बातम्यांचा घेतलेला हा आढावा.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारतर्फे संसदेत तिहेरी तलाकविरोधात कायदा मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी यातील विविध मुद्द्यांवर विरोध दाखवायला सुरुवात केली आहे.

काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं तिहेरी तलाक कायद्यासाठी केल्या जाणाऱ्या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तर प्रस्तावित कायद्यात पतीला अटक करण्याच्या मुद्द्याला बिजू जनता दलाने विरोध केला आहे.

रविवारी 'ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'च्या लखनौमध्ये झालेल्या एका बैठकीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वांनीच एकमतानं केंद्र सरकारच्या या विधेयकाला विरोध दर्शविला.

2. मुंबईत एसी लोकल सुरू

बोरिवली ते चर्चगेट अशी पहिली एसी लोकल सकाळी 10.30ला सुटली.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, वातानुकूलित लोकल सेवेत आल्यानंतर या गाडीतून प्रवास करणाऱ्या 'फुकट्या'प्रवाशांना चाप लावण्याचं मोठं आव्हान पश्चिम रेल्वेसमोर आहे.

Image copyright Prashant Nanavare / BBC
प्रतिमा मथळा बोरीवली ते चर्चगेट अशी पहिली एसी लोकल सकाळी 10.30ला सुटली.

यासाठी सर्वं डब्यांमध्ये तिकीट तपासनीसांची नियुक्ती केली जाणार आहे. शिवाय त्यांच्या जोडीला आठवडाभरासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, वातानुकूलित लोकलची रविवारी चर्चगेट ते अंधेरीदरम्यान शेवटची चाचणी पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसमक्ष घेण्यात आली.

3. कुलभूषण भेटीमागे षडयंत्राचा संशय

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी सोमवारी त्यांना भेटायला पाकिस्तानात जाणार आहे. 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, इस्लामाबादमध्ये ते आज पोहचतील आणि भेट घेऊन लगेच परततील.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कुलभूषण जाधव

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी या भेटीचे छायाचित्रं आणि व्हीडिओ फुटेज प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, ही भेट खाजगी न ठेवता ती प्रसारमाध्यमांसमोर ठेवण्याचा पाकिस्तान सरकारचा कुटील डाव असण्याची शक्यता असल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तान सरकार जर एकांतात भेट घडवून आणणार नसेल तर जाधव यांच्या आई आणि पत्नीनं जाहीर भेटीवर बहिष्कार घालून पाकिस्तान सरकारचं पितळ उघडं पाडावं, अशी भूमिका निकम यांनी मांडली आहे.

4. 'बेटी बचाओ'चे 30 लाख बनावट अर्ज

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडे 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' योजनेअंतर्गत यावर्षी देशभरातून 30 लाखांवर बनावट अर्ज प्राप्त झाले आहेत.

Image copyright SAJJAD HUSSAIN/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तुम्हाला मुलगी असेल तर फक्त अर्ज भरला तरी केंद्र सरकार दोन लाख रुपये देणार असल्याची अफवा काही लोकांकडून पसरविली जात आहे.

गरिबांना असे बनावट अर्ज 20 ते 25 रुपयांमध्ये विकले जातात.

अशी कुठलीही सवलत केंद्र सरकारतरर्फे दिली जात नाही, असे असतानाही सर्वाधिक अर्ज हे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून आल्याचं निदर्शनास आले आहे.

5. जयललितांच्या आर.के.नगरात दिनाकरन विजयी

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर. के. नगर पोटनिवडणुकीत AIADMK चे बंडखोर अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनाकरन यांनी विजय मिळविला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.

'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, AIADMK पक्षात दिनाकरन यांना एकटं पाडण्यात आलं होतं.

या पोटनिवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. दिनाकरन यांचा विजय हा AIADMK आणि DMK साठी धक्का मानला जात आहे.

दिनकरन यांनी AIADMK चे उमेदवार इ मधुसुधनन यांना तब्बल 40 हजार मतांनी हरवले.

आम्हीच खरे AIADMK असून आर के नगरच्या मतदारांनी अम्मांच्या (जयललिता) उत्तराधिकाऱ्याला निवडलं असल्याचं दिनाकरन म्हणाले.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)