प्रेस रिव्ह्यूः "डॉक्टरांनी नक्षलवादी व्हावं, आम्ही गोळ्या घालू"

मेडिकल स्टोअरचे उदघाटन करताना हंसराज अहिर

फोटो स्रोत, TWITTER/HANSRAJ AHIR

फोटो कॅप्शन,

मेडिकल स्टोअरचे उदघाटन करताना हंसराज अहिर

डॉक्टरांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारू, असं विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केलं आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालयात माफक दरात रुग्णांना औषध उपलब्ध करण्यासाठी मेडिकल स्टोअर सुरू करण्यात आलं. त्याचं लोकार्पण अहीर यांच्याहस्ते झालं.

या कार्यक्रमास अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक गैरहजर असल्यानं अहिर संतापले. "संबधित अधिकारी व डॉक्टरांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी नक्षलवादी व्हावं, आम्हा त्यांच्या छातीत गोळ्या घालू," अशा शब्दात संताप व्यक्त केला.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसह नक्षलवाद विरोधी मोहिमेची जबाबदारी अहिर यांच्याकडेच आहे. त्यांनी असं वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली आहे.

"आम्ही इथं राज्यघटना बदलण्यासाठी आलोय"

केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष हा राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आला असून नजीकच्याकाळत असे बदल झालेले दिसतील, असं वक्तव्य केलं.

फोटो स्रोत, FACEBOOK/ANANTKUAR HEGDE

फोटो कॅप्शन,

अनंतकुमार हेगडे

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कोप्पळ जिल्ह्यातील कुक्कनूर इथं झालेल्या ब्राह्मण परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना त्यांचे आई-बाप कोण हेदेखील ठाऊक नसतं, असंही वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी याच कार्यक्रमात केलं.

"कोणत्याही माणसानं त्याच्या धर्माप्रमाणं किंवा जातीप्रमाणं आपली ओळख मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, ब्राह्मण आहे, लिंगायत आहे अशी करून दिली, तर मला निश्चितच आनंद होईल. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना काय म्हणावं असा प्रश्न मला पडतो," असंही हेगडे यावेळी म्हणाले.

सरकार खुळचट आणि बुळचट - सामना

कालच्या चारही शहीदांच्या भडकलेल्या चितांची ठिणगी १२५ कोटी जनतेच्या मनातील लाव्हा बनून विचारीत आहे, ''सरकार खुळचट आणि बुळचट निघालं आहे काय?'' असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

संग्रहीत छायाचित्र

या अग्रलेखातून पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. गुजरातच्या निवडणुकीनंतर 'व्ही फॉर व्हिक्टरी'ची खूण दाखवत विजयी ढोल बडविणं हाच देशाभिमान आणि शौर्य असेल तर आमच्या जवानांच्या भडकलेल्या चिता म्हणजे निवडणूक प्रचाराची शेकोटी आहे काय?

देशातील सरकार खरोखर खुळचट आणि बुळचट निघालं आहे काय? सरकारचा प्रवास नामर्दानगीच्या दिशेनं सुरू झाला आहे काय? सरकारच्या शौर्याचा बुडबुडा फुटला आहे काय? बेडूक फुगला होता आणि त्या बेडकाचं पोट फुटलं आहे काय? ढोल वाजवून आनंद साजरा करणाऱ्यांचा ढोल आधीपासूनच फुटका होता काय? असे अनेक प्रश्न फक्त आमच्या मनात घुसळत नसून सामान्य जनतेच्या मनातही उसळत आहेत. अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून सरकार आणि पंतप्रधानांवर टीका करण्यात आली आहे.

खूनी, वेडे सोडून भाजमध्ये सर्वांनाच प्रवेश- बागडे

सध्या भाजपात खुनाचा आरोपी, वेडी माणसं सोडली तर कोणालाही सहज प्रवेश मिळतो. हा काळानुसार झालेला बदल असल्याची टोलेबाजी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वःपक्षावरच केली.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/GETTY IMAGES

लोकमतच्या वृत्तानुसार, माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या ज्येष्ठ आणि जुन्या जाणत्या नेत्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यात जुने-जाणते आणि निष्ठावान कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

हरिभाऊ बागडे यांनी तोच धागा पकडत पक्षात कोणाला घ्यायचे, याबाबत आपण बोलू शकत नसल्याचं सांगितलं. "पूर्वी पक्षात घेताना आणि तिकीट देताना मात्र खूप चौकशी केली जायची. त्यानंतर प्रवेश दिला जात असे. आता केवळ मर्डर करणारे आरोपी आणि वेड्या माणसांनाच प्रवेश दिला जात नाही," असं ते उपहासाने म्हणाले.

आमच्या हातून चूक होऊ शकते, पण बेईमानी नाही : मुख्यमंत्री

आघाडी सरकारनं आम्हाला रिकामी तिजोरी आणि प्रश्नांचा डोंगर दिला. एकवेळ आमच्या हातून चूक होऊ शकते पण बेईमानी नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, यवतमाळ इथं झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी नितीन गडकरी यांनी विरोधकांची फिरकी घेतली. गडकरी म्हणाले की, "राज्यातील अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. ते प्रकल्प म्हणजे कुणी तरी हुंडा घेतला, लग्न केलं, हनिमून झालं, मुलं झाली आणि आता ती मूलं देवेंद्र फडणवीसच्या अंगावर खेळत असून ते मूल आम्हाला जेवू घाला असे म्हणत आहे."

मराठा समाजाचा 10 फेब्रुवारीचा अल्टिमेटम

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यांसाठी सकल मराठा समाजानं सरकारला 10 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पनवेलमध्ये झाली. या वेळी मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी अनेक ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले. मराठी शाळा पुन्हा सुरू कराव्यात असा ठरावही समितीनं या वेळी मान्य केला. पुढील राज्यस्तरीय बैठक 11 फेब्रुवारीला जळगाव इथं होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)