ब्लॉग : भीमा कोरेगावात जमणाऱ्या दलितांनाही 'देशद्रोही' ठरवलं जाणार का?

पुण्यातल्या पेशवा साम्राज्याचं एक पेंटिंग Image copyright ALASTAIR GRANT/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा पुण्यातल्या पेशवा साम्राज्याचं एक पेंटिंग

ज्या ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी 1857 मध्ये जवळपास संपूर्ण भारतात युध्द छेडण्यात आलेलं असताना, स्वतंत्र भारतात त्याच कंपनीच्या विजयाचा उत्सव साजरा करण्याहून मोठा 'देशद्रोह' आणखी काय असू शकतो?

पण पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावमध्ये दरवर्षी या विजयाचा उत्सव साजरा करणाऱ्या लाखो दलितांना आत्तापर्यंत कुठल्याही "राष्ट्रवाद्याने" देशद्रोही असल्याचं प्रमाणपत्र देण्याची हिंमत केलेली नाही.

दरम्यान, पेशव्यांचा गड समजल्या जाणाऱ्या शनिवार वाड्यात दलितांना प्रदर्शन करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं पुणे पोलिसांकडे केली आहे.

"अशा उत्सवामुळं जातीय भेद वाढेल," असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांचं म्हणणं आहे.

दलितांच्या या उत्सवावर ब्राह्मण महासंघाला आक्षेप का असावा?

दलितांचा उत्सव

हे जाणण्यासाठी दोन गोष्टी समजणं गरजेचं आहे की. एक म्हणजे, अतीशूद्र (म्हणजेच वर्ण व्यवस्थेच्या बाहेरील जाती) महारांविषयी पेशवा राज्यकर्ते काय विचार करत होते. आणि दुसरं म्हणजे, कसं त्यांनी महारांच्या दुरवस्थेला जबाबदार सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जातीय भेदभावांच्या नियमांची कठोर अमंलबजावणी केली.

Image copyright DOUGLAS E. CURRAN/AFP/GETTY IMAGES

या भीमा कोरेगावात दोनशे वर्षांपूर्वी, म्हणजे 1 जानेवारी 1818ला अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जवळपास 800 महारांनी चित्पावन ब्राह्मण पेशवा दुसरा बाजीरावच्या 28 हजार सैनिकांना गुडघे टेकायला भाग पाडलं.

हे महार सैनिक इस्ट इंडिया कंपनीच्या बाजूनं लढले होते आणि याच युद्धानंतर पेशव्यांचं साम्राज्य संपुष्टात आलं होतं.

यंदा 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगावात देशभरातून हजारो दलित एकत्र येत विजयाची दोनशे वर्षं साजरी करणार आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, तरुण दलित नेते आणि गुजरातच्या वडगावमधून अपक्ष निवडून आलेले आमदार दिग्नेश मेवानी या उत्सवात सहभागी होणार आहे.

अस्मितेची लढाई

जे इतिहासकार महार आणि पेशवा सैन्यात झालेल्या युद्धाकडे 'परदेशी आक्रमक इंग्रज विरुद्ध भारतीय राज्यकर्त्यांचं युद्ध' म्हणून बघतात, ते तथ्याप्रमाणं चुकीचे नाहीत.

पण हा प्रश्नही विचारला गेला पाहिजे की, हे महार इंग्रजांकडून पेशव्यांविरुद्ध लढले तरी का?

Image copyright SAM PANTHAKY/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा जिग्नेश मेवानी या उत्सवात सहभागी होणार आहे.

महारांसाठी ही इंग्रजांची नव्हे तर त्यांच्या अस्मितेची लढाई होती. चित्पावन ब्राह्मण व्यवस्थेशी प्रतिशोध घेण्याची ही त्यांच्यासाठी एक संधी होती. कारण दोनशे वर्षांपूर्वी पेशव्यांनी महारांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली होती.

अतिशूद्र, म्हणजेच वर्णव्यवस्थेच्याही बाहेरच्या मानल्या गेलेल्या अस्पृश्यांशी जो व्यवहार प्राचीन भारतात होत होता, तोच व्यवहार पेशव्यांनी महारांशी केला होता.

इतिहासकारांनी अनेक ठिकाणी त्याकाळातील वर्णव्यवस्थेचं वर्णन करून ठेवलं आहे.

गावात प्रवेश करतेवेळी महारांना आपल्या कमरेला एक झाडू बांधावा लागायचा, जेणेकरून त्यांच्या 'प्रदूषित आणि अपवित्र' पावलांचे ठसे त्यांच्या कमरेच्या मागे लटकवलेल्या झाडूने पुसले जातील.

त्यांना गळ्यात एक भांडंही लटकवावं लागायचं, आणि थुंकायचं झाल्यास त्यातच थुंकावं लागायचं, जेणेकरून त्यांच्या थुंकीनं "एखादी सवर्ण जातीतील व्यक्ती प्रदूषित आणि अपवित्र न व्हावी".

सवर्णांच्या विहिरीतून किंवा पाणवठ्यावरून पाणी घेण्याचा विचारही ते करू शकत नव्हते.

ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी

प्राचीन काळापासून भारतात चालत आलेल्या या नियमांविरुद्ध बौद्ध, जैन, अजित केसकंबलिन आणि मक्खलिपुत्त गोसाल संपद्रायाचे लोक वारंवार विद्रोह करत होते.

पण दरवेळेस या दलितविरोधी व्यवस्थेची पुनर्स्थापना करण्यात येत होती.

Image copyright CLASSIC IMAGE ALAMY
प्रतिमा मथळा सुरत येथील इस्ट इंडिया कंपनीचा एक कारखाना.

अशा व्यवस्थेत राहणारे महार दलित ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात सहभागी झाले. पेशवा सैनिकांसोबतच ते चित्पावन ब्राह्मण राज्यकर्त्यांच्या क्रूर व्यवस्थेविरुद्धही प्रतिशोधाची लढाई लढत होते.

आता या युद्धाला दोनशे वर्षं पूर्ण झाल्याबद्दल 2018च्या पहिल्या दिवशी शेकडो दलित संघटनांशी जोडल्या गेलेले हजारो लोक भीमा कोरेगावमध्ये एकत्र येतील. तेव्हा ते ईस्ट इंडिया कंपनीचा नव्हे तर ब्राह्मणवादी पेशवा व्यवस्थेच्या भेदभावावर दलितांनी मिळवलेल्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जमलेले असतील.

जातीआधारित भेदभावाचे पुरावे

या उत्सवात सहभागी होणाऱ्या तरुणांना दोनशे वर्षांपूर्वीच्या या विजयाचं प्रतिकात्मक महत्त्व असलं, तरी आजच्या काळात घडणाऱ्या खऱ्या घटनांमधून त्यांना जातीआधारित भेदभावाचे पुरावे मिळत आहेत.

याच खऱ्या उदाहरणाचा उपयोग या युवकांना त्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी मदत करेल.

Image copyright GETTY IMAGES

सहारनपूरचे युवा दलित नेते चंद्रशेखर आझाद रावण यांना न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअन्वये पुन्हा तुरुंगात डांबलं.

तसंच भाजपशासित राज्यांमध्ये पहलू खानच्या हत्येच्या आरोपात पकडल्या गेलेल्या सहा लोकांवरचे आरोप परत घेण्यात आले.

उत्तर प्रदेशच्या दादरीमधले मोहम्मद अखलाक यांच्या हत्याप्रकरणातल्या एका आरोपीच्या मृत्यूनंतर देशाचे सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी त्याला शहीद संबोधून श्रद्धांजली दिली होती.

या सर्व घटना दलित तरुण बघत आहेत.

महार सैनिकांचा विजय

हिंदुत्वाचा समर्थक शंभुलाल रैगर याने राजस्थानच्या राजसमंद शहरात अफराजुद्दीनची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. आता पोलीस म्हणत आहेत की ही हत्या गैरसमजुतीतून झाली.

बहादुरगढजवळ धावत्या ट्रेनमध्ये जुनैदला ठेचून मारण्यात आलं. यासंबंधी पोलिसांनी केलेल्या चौकशीवर जुनैदच्या घरच्यांनी असंतोष व्यक्त केला आहे.

यामुळेच भीमा कोरेगाव येथील महार सैनिकांच्या विजयाला 200 वर्षं पूर्ण होत असताना, त्यातील उत्सवात सहभागी होऊन दलित आजच्या राजकारणात आपलं स्थान शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सोबतच ते ब्राम्हणवादी पेशवा व्यवस्थेला मानणाऱ्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रतिकार सुद्धा करण्याचा प्रयत्न करतील.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)