जंगली अनाथ प्राण्यांचा आधार डॉ. प्रकाश आमटे

  • प्राजक्ता धुळप
  • बीबीसी मराठी

ज्येष्ठ समाजसेवी बाबा आमटेंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या हेमलकसा येथील कामाचा 44 वर्षांनंतर आता वटवृक्ष झाला आहे.

डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम जंगलात 1972 साली आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू हे काम विस्तारत गेलं.

आरोग्यासोबतच शिक्षण, आदिवासींची उपजिविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये गेली चार दशकं काम सुरू आहे. आमटेंनी प्राण्यांसोबतच्या नात्याला वेगळा आयाम दिला आहे. जंगली प्राण्यांना हाताळू नका, असा शासकीय अधिनियम आहे. गेली चार दशकं प्राण्यांशी जिव्हाळ्याचं नातं तयार करणारे डॉ. प्रकाश आमटे या नियमानुसार कारवाई होत असल्यानं दु:खी झाले आहेत.

फोटो कॅप्शन,

घुबडाला गोंजारताना डॉ. प्रकाश आमटे यांची तिसरी पिढी

मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे गेली चार दशकं महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये अनाथ जंगली प्राण्यांसाठी अनाथालय चालवतात. 1973साली सुरू झालेल्या प्राण्यांच्या अनाथालयाला 1991 मध्ये रेस्क्यू सेंटरची मान्यता मिळाली. जंगली प्राणी आणि माणूस यांच्यात वेगळं नातं जपणारं ठिकाण म्हणून हे 'आमटे आर्क' प्रसिद्ध आहे.

खरंतर 'रेकग्निशन ऑफ झू अधिनियम 2009' नुसार जंगली प्राण्यांना जवळून हाताळण्यावर बंदी आहे. यासंदर्भात सेंट्रल झू ऑथोरिटीनं गेल्या ऑक्टोबरमध्ये 'आमटे आर्क'ला नोटीस बजावली. 2009मध्ये हा अधिनियम आल्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच नोटीस आहे. या निमित्तानं माणूस आणि जंगली प्राणी यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्यासाठी बीबीसी मराठीची टीम हेमलकसाला पोहोचली.

"आज जास्परचं वय १५ वर्षं आहे. आमचा जास्पर म्हणजे तरस. इंग्रजीत त्याला हायना म्हणतात. जास्पर दोन महिन्याचा होता तेव्हा त्याला स्थानिक आदिवासींनी आमच्याकडे आणून दिलं. कारण त्याची आई नव्हती. तो अनाथ होता. तशीच गोष्ट एल्सा या बिबट्याच्या बछड्याची," डॉ. प्रकाश आमटे सांगत होते.

फोटो कॅप्शन,

जास्पर नावाचा हा तरस दोन महिन्याचा असताना अनाथालयात आला.

बिबट्या, तरस या प्राण्यांना हिंस्त्र म्हटलं जातं. आमटे यांच्या म्हणतात, "बिबट्या, तरस क्रूर आहेत हा गैरसमज आहे. गेल्या ४४ वर्षांपासून मी गडचिरोलीच्या जंगलात काम करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे राहिले आहेत. त्यांनी कधी आपापसातही हल्ला केला नाही, की कधी माझ्यावरही हल्ला झाला नाही. मी प्राण्यांना प्रेम दिलं आणि प्राण्यांनीही मला प्रेम दिलं."

1973 मध्ये डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ मंदा आमटे यांनी गडचिरोलीच्या जंगलात हेमलकसा इथे लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत आदिवासींच्या आरोग्यासाठी काम सुरू केलं. या भागात माडिया आणि गोंड या आदिवासी जमाती राहतात.

"आमच्याकडे येणारे आदिवासी अगदी मोठा आजार झाल्यावर यायचे किंवा शिकारीदरम्यान जखमी झाल्यानं यायचे. जखमी पेशंटची संख्या खूप असायची. कारण आदिवासींचं मुख्य अन्न हे शिकारीवर अवलंबून असायचं, " अशी माहिती आमटे यांनी दिली.

डॉ. प्रकाश आमटे यांचे वडील बाबा आमटे हे जेष्ठ समाजसेवी. बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या लोक बिरादरी संस्थेला केंद्र सरकारनं आदिवासींच्या सेवेसाठी गडचिरोलीच्या जंगलात हेमलकसामध्ये 50 एकर जागा दिली. तिथेच प्रकाश आमटे यांनी काम सुरू केलं.

फोटो कॅप्शन,

आदिवासी रुग्णांना तपासताना डॉ. मंदा आमटे. 90च्या दशकातील छायाचित्र.

माकडाच्या पिल्लापासून सुरूवात

आम्ही प्रकाश आमटेंना विचारलं, तुम्ही आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करत होतात, तर मग प्राण्यांचं अनाथालय कसं सुरू झालं.

ते म्हणाले, "एकदा आम्ही जंगलातून जात होतो. आदिवासी माकडाची शिकार करून घेऊन चालले होते. त्या मेलेल्या मादीला बिलगून माकडाचं जिवंत पिल्लू दूध पित होतं. तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की माणसं माकडाचीही शिकार करून खातात."

भारतीय समाजात माकड खाण्याची प्रथा नाही.

आमटे पुढे म्हणाले, "आम्ही पहिल्यांदाच माकडाची शिकार केलेली पाहात होतो. त्या आदिवासींकडे आम्ही माकडाचं पिल्लू मागितलं. त्यांनी घरात मुलं उपाशी आहेत असं सांगितलं. तेव्हा आम्हाला कळलं की भूक किती पराकोटीची असू शकते. आम्ही मुलांना खायला तांदूळ दिले आणि त्या बदल्यात ते माकडाचं पिल्लू घेतलं."

1973मध्ये आमटे आर्क हे प्राणी अनाथालय सुरु झालं ते या माकडाच्या पिल्लापासून. तेव्हा अशा जंगली प्राण्यांना पिंजऱ्यात न ठेवता घरातच ठेवलं जाई.

हळूहळू प्रकाश आमटे यांच्या घरात अस्वल, बिबट्या, सिंह, कुत्रे, हरणं यांची भर पडत गेली.

जवळपास 17 वर्ष हे जंगली प्राणी प्रकाश आमटेंसोबत नदीवर फिरायलाही जात असत.

प्राण्यांच्या अनुभवांवर लोकबिरादरी प्रकल्पाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि लेखक विलास मनोहर यांनी 'नेगल' ही पुस्तकांची मालिका लिहिली.

नेगल म्हणजे आदिवासी भाषेत बिबट्या. मराठी साहित्यात त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. नेगल म्हणजे आदिवासी भाषेत बिबट्या.

फोटो कॅप्शन,

बिबट्या आणि सिंह एकत्र नांदताना

'आमटेज् अॅनिमल आर्क'

प्राण्यांच्या या अनाथालयाला 'आमटेज् अॅनिमल आर्क' असं नाव देण्यात आलं. या नावाविषयी सांगताना ते म्हणतात, "बायबलमध्ये नोहाज् आर्क नावाची गोष्ट आहे. जगबुडी आल्यावर एका जहाजावर सगळे प्राणी आले आणि प्रतिसृष्टी निर्माण झाली. 'झू आऊटरिच ऑर्गनायझेशन'च्या संस्थापक सॅली वॉकर यांनी आमच्याकडचे प्राणी पाहून हे नाव सुचवलं."

"आमच्याकडे बिबट्या, कुत्रे, सिंह, हरीण, अस्वल असे अनेक प्राणी एकत्र सुखाने नांदताना दिसत होते. एरव्ही जंगलात हे सगळे प्राणी परस्परांचे शत्रू असतात. पण इथे सगळे सुखाने नांदत होते."

प्राण्यांचं हे अनाथालय सुरू झाल्यानंतर जवळपास 17 वर्षांनंतर म्हणजे 1991मध्ये 'आमटे अॅनिमल आर्क'ला भारतीय वन्यजीव कायद्यानुसार रेस्क्यू सेंटर म्हणून परवानगी मिळाली. त्यानंतर अनाथ जंगली प्राण्यांसाठी पिंजरे केले गेले.

आदिवासींसाठी शाळा

प्राण्यांचं अनाथालय सुरू करण्याबरोबरच आदिवासींमध्ये जागृती तयार करण्यासाठी आणि अन्नासाठी शिकारीला पर्याय देण्याच्या हेतूनं डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा यांनी 1974 साली आदिवासींसाठी शाळा सुरु केली.

फोटो कॅप्शन,

माडिया-गोंड आदिवासी पूर्वी माकडाची शिकार करायचे.

'शिकारीचं प्रमाण कमी झालं'

डॉ. मंदा आमटे यांच्या मते गेल्या चार दशकात आदिवासींच्या आयुष्यात खूप बदल झाला आहे. "पूर्वी आमच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे धनुष्यबाण असायचे. बाणाला मातीचे गोळे लावलेले असायचे. जाता-येता ही मुलं पक्षी मारायची. पण आता बदल झालाय. आता ते शिकार करत नाहीत."

इथे आलेले अनाथ प्राणी आणि त्यांच्याविषयीचं प्रेम पाहून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होऊ लागला, असं मोन्शी दोरवा या माडिया आदिवासी तरूणाला वाटतं. हेमलकसाच्या शाळेत शिकलेल्या मोन्शी दोरवाचं वय तीस वर्ष आहे.

"लहानपणी मी वडील आणि आजोबांबरोबर शिकारीला जायचो. आजोबांनी माकड मारून आणलेलं आठवतंय. पण आता आम्ही खाण्यासाठी माकडाची शिकार करत नाही."

सापळा लावून कशा प्रकारे प्राण्यांची शिकार केली जायची याचं प्रात्यक्षिक त्यानं आम्हाला दाखवलं.

फोटो कॅप्शन,

माडिया आदिवासी तरूण मोन्शी दोरवा

"आजही आदिवासींच्या घरात शिकारीची जाळी, सापळे, मोठ मोठाले भाले पाहायला मिळतात. त्याचा वापर हळूहळू मागे पडला आणि आदिवासी भाजीपाला, धान्य पिकवायला लागले. आज आमचं मुख्य अन्न शेतीवरच अवलंबून आहे."

मोन्शी आदिवासींच्या आयुष्यात झालेल्या या बदलामुळे खूप खुश आहे. पण आदिवासी संस्कृतीची पारंपरिक मूल्य टिकून राहावीत असं त्याला वाटतं.

आता इथल्या आदिवासींच्या जगण्याचं साधन शिकार नाही, तर शेती आहे.

"आदिवासींनी शिकार करणं कमी केल्यानं आमटे आर्कमध्ये येणाऱ्या जंगली प्राण्यांची संख्याही कमी झाली आहे," असं डॉ. आमटे यांनी सांगितला.

फोटो कॅप्शन,

एल्सा ही बिबट्याची बछ़डी सहा महिन्याची असताना अनाथालयात दाखल झाली

रेस्क्यू सेंटर आणि अनाथालय

आज प्राण्यांच्या या अनाथालयात विविध प्रजातीचे जवळपास शंभर प्राणी आणि पक्षी आहेत.

आतापर्यंत जवळपास १००० जखमी तसंच अनाथ प्राण्यांना आमटे आर्कनं वाचवलं आहे. पण सगळेच अनाथ प्राणी आदिवासींनी आणून दिलेले नाहीत.

"वनखात्यानं आतापर्यंत 10 बिबटे सांभाळायला दिले. महाराष्ट्रात अहमदनगर आणि नाशिकमध्ये सध्या बिबट्या मनुष्यवस्तीत घुसल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. अनेकदा जंगली भागात प्राण्यांच्या अधिवासात मनुष्यवस्तींचं अतिक्रमण झालेलं दिसतं. अशा संघर्षातून अनाथ झालेले काही प्राणी वनखातं आमच्याकडे सुपूर्द करतं. आता इथल्या पिंजऱ्यात असलेली एल्सा हे बिबट्याचं पिल्लू गेले अडिच वर्ष इथं आहे," अशी माहिती आमटे आर्कचे सहसंचालक अनिकेत आमटे यांनी दिली.

रेस्क्यू सेंटर असल्याने बिबट्या, हरणं, अस्वलं असे अनेक प्राणी सरकारच्या वनखात्याने आमटे आर्कला दिले आहेत.

फोटो कॅप्शन,

'आमटे अॅनिमल आर्क'मधील हरणं

मुदतवाढ मिळेल

रेस्क्यू सेंटरला कायमस्वरुपी परवानगी मिळत नसल्यानं ठरावीक कालावधीनंतर परवान्याची मुदत वाढवण्यात येते. आमटे अॅनिमल आर्कची मुदत 3 नोव्हेंबर 2017ला संपली आहे. 'केंद्रीय झू ऑथोरिटीच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत 3 नोव्हेंबरला मिटींग झाली. त्यात सरकारचे काही आक्षेप असल्यानं त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं. तसंच झू ऑथोरिटीच्या सूचनांनुसार मास्टरप्लॅन सादर करण्यात आला आहे. आम्ही ही मुदत वाढण्याची वाट पाहात आहोत, असं अनिकेत आमटे यांनी सांगितलं.

प्राण्यांच्या या अनाथालयाविषयी केंद्रीय झू ऑथोरिटीचे काही आक्षेप आहेत. त्याविषयीच्या अनेक नोटीस त्यांनी 2016 पासून आमटे आर्कला पाठवल्या आहेत. काही अस्वलं कायदेशीर बाबी पूर्ण न करता अनाथालायात दाखल करून घेतल्याप्रकरणी झू नियमांचं उल्लंघन होत असल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे. यावर उत्तर देताना आमटे यांनी कायदेशीर प्रक्रिया उशिरा झाल्याचं मान्य केलं.

"अनाथालयातील प्राण्यांना राहण्यासाठी अधिक मोठे पिंजरे करण्याच्या सरकारच्या सूचनेनुसार नवा मास्टरप्लॅन केंद्राकडे संमतीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यासाठी 10 कोटी इतका खर्च येणार असून टप्प्याटप्प्याने नवं अनाथालय बांधण्यात येईल," अशी माहिती प्रकाश आमटे यांनी बोलताना दिली.

केंद्रीय झू ऑथोरिटीचा आणखी एक आक्षेप आहे तो जंगली प्राण्यांना हाताळयाविषयी. जंगली प्राण्यांना हाताळणं आणि आमटे आर्कमधील प्राण्यांचे फोटो आमटे यांनी सोशल मीडिया, वेबसाईट, वर्तमानपत्रं, लेटरहेडवर वापरणं हे 2009च्या झू अधिनियमाचं उल्लंघन आहे, असं सेंट्रल झू ऑथोरिटीचं म्हणणं आहे.

फोटो कॅप्शन,

हरणांसोबत प्रकाश आमटे यांची नात

'प्राण्यांना आई नव्हती, म्हणून प्रेम केलं'

'इथले सगळे प्राणी अनाथ आहेत. लहान पिल्लं आहेत ज्यांनी आई बघितलीच नाही. माणसांमुळे या प्राण्यांची आई मरण पावली. जंगलात त्यांना आई सगळं शिकवते. शिकार कशी करायची आणि स्वत:ला कसं वाचवायचं हे शिकवते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. त्यांना आई नव्हती, म्हणून प्रेम केलं ' असं आमटे यांचं स्पष्टीकरण आहे.

कायद्याच्या नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी आम्ही त्यांना विचारलं. 'जखमी प्राण्यांवर उपचार करा आणि त्यांना जंगलात सोडून द्या असा रेस्क्यू सेंटरचा कायदा सांगतो. पण हे अनाथालय आहे. आणि अनाथ प्राण्यांच्या गरजेनुसार कायदा भारतात अस्तित्वात नाही', असं त्यांनी सांगितलं. पण यापुढे नवीन दाखल होणाऱ्या प्राण्यांना हात लावणार नाही, असंही ते म्हणाले.

याविषयी बीबीसी मराठीनं केंद्रीय झू ऑथोरिटीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला. पण त्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला. तसंच, त्यांनी 2016 नोव्हेंबरमध्ये आमटे आर्कला पाठवलेली नोटीस उत्तरादाखल पाठवली.

सध्या या अनाथालयात बिबट्या, तरस, हरणाच्या पाच प्रजाती, नीलगाय, अस्वल, मगरी, साळींदर, कोल्हे, घुबड, घोरपड, मोर, साप असे जवळपास शंभर प्राणी-पक्षी आहेत. आजूबाजूच्या आदिवासी गावांमधील आणि भारतभरातून सहली इथे येत असतात.

लोकबिरादरी प्रकल्पाचं आदिवासींसाठी हॉस्पिटल, शाळा, हॉस्टेल याच परिसरात आहे. आदिवासींना या अनाथालयाने जगण्याचा वेगळा दृष्टीकोन दिला आहे.

गडचिरोलीचा हा दुर्गम भाग आदिवासींना बाहेरच्या जगाशी जोडतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)