झुल्फिकार अली भुत्तो आणि बेनझीर भुत्तो : पाकिस्तानातल्या भुत्तो कुटुंबाचं नाशिक कनेक्शन

  • प्रविण ठाकरे आणि संकेत सबनीस
  • बीबीसी मराठीसाठी
बेनझीर भुत्तो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

वडील झुल्फिकार अली भुत्तो यांच्या छायाचित्रासह बेनझीर भुत्तो.

नाशिकजवळ तळेगाव फाट्यावरून 3 किलोमीटर आत गेल्यावर इंदोरे नावाचं गाव आहे. तसं, महाराष्ट्राच्या नकाशावर छोटासा ठिपका असलेल्या या गावाचा इतिहास मोठा आहे. कारण, पाकिस्तानातील माजी राष्ट्रप्रमुखांशी या गावाचा घनिष्ठ संबंध आहे. पाकिस्तानातील हे नेते आहेत झुल्फिकार अली भुत्तो आणि त्यांची मुलगी बेनझीर भुत्तो.

इंदोरे गावाचा एकंदर व्याप छोटेखानी असला तरी गावातील आठवणी मात्र निराळ्याच आहेत. या गावाचा इतिहास आणि गावातल्या एका बड्या व्यक्तीच्या वास्तव्याबद्दल बोलताना इथले जुने-जाणते नागरिक खंडेराव नामदेव दरगोडे आठवणींमध्ये हरवून गेले होते.

भुत्तोंच्या विहीरीमुळे गावाला संजीवनी

गावाच्या रम्य आठवणी सांगताना 93 वर्षीय वृद्ध दरगोडे म्हणाले की, "दुष्काळामुळे गावाची लोकसंख्या कमी होऊ लागली होती. गाव निर्मनुष्य व्हायला लागलं होतं. १९५२-५३ सालापर्यंत हे गाव चर्चेतही नव्हतं. तर ग्रामपंचायत आणि इतर सुविधा म्हणजे आमच्यासाठी मृगजळच होत्या."

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE

फोटो कॅप्शन,

भुत्तो कुटुंबीयांची इंदोरे गावातील विहीर

"अशावेळी गाव नामशेष होणार असं वाटत असताना एक विहीर गावाला बक्षीस म्हणून मिळाली आणि गावाचं चित्रच बदलून गेलं. त्या एका विहीरीनं 750 लोकसंख्या असलेलं दुष्काळी गाव आज 3000 लोकसंख्येचं बागायती शेतीसंपन्न गाव झालं आहे."

दरगोडे न थांबता आपल्या आठवणी सांगत होते. ते म्हणाले की, "ती विहीर होती झुल्फिकार अली भुत्तो यांची. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांनी नाशिक सोडलं आणि ते पाकिस्तानात स्थायिक झाले. यावेळी ती विहीर त्यांनी गावाला बक्षीस म्हणून दिली."

हे सगळं वाचून वेगळं वाटत असलं तरी पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि 10वे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो नाशिक जवळच्या या इंदोरे गावात राहत असत. पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे ते वडील.

फोटो स्रोत, PRVIN THAKARE

फोटो कॅप्शन,

या मातीच्या घराच्या शेजारील पडक्या जागेत कोणेएके काळी भुत्तो यांचा वाडा होता. वाडा रिकामा झाल्यावर ग्रामस्थांनी त्याचे दगड बांधून घरे उभारली.

त्यामुळे पाकिस्तानचे नेते झुल्फिकार अली भुत्तो आणि त्यांची कन्या आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा महाराष्ट्रातल्या नाशिकशी वेगळाच ऋणानुबंध आहे.

झुल्फिकार यांचे वडील हे तत्कालीन जुनागढ संस्थानचे दिवाण होते. त्यांच्याकडे परंपरागतरित्या नाशिक भागातल्या जहागिरी होत्या. उच्चशिक्षित झुल्फिकार हे ब्रिटिश लष्करासाठी काम करत असत.

त्यावेळी त्यांचे वास्तव्य नाशिक मधील ब्रिटिश लष्करी छावणीत, देवळाली कॅम्प इथं होतं. तेव्हा त्यांनी इंदोरे गावात स्थायिक होण्याचा निश्चय केला. इथल्या रामशेज किल्ल्याच्या आसपासची सर्व गावं त्यांच्या परंपरागत जहागिरीचा भाग होती.

नाशिकमधल्या जमिनीवर भुत्तोंची मालकी

त्यांनी जहागिरीतील बहुतांश जमीन कुळांना कसण्यासाठी दिलेली होती. आजही काही कुळे त्यांचा दाखला देतात. इंदोरे या गावी एकंदर 14 गटांमध्ये बेनझीर यांच्या वडीलांची जमीन होती. साधारणपणे तत्कालीन एका गटात 1500 हेक्टर जमीन होती.

इंदोरे गावातील हनुमान मंदिराजवळ त्यांचा मोठा बंगला होता आता फक्त काही अवशेष शिल्लक राहिले आहेत. तसंच त्यांचं खानदानी कब्रस्तान देखील इथे असल्याची माहिती गावातील 84 वर्षीय ग्रामस्थ मोहम्मद अली सय्यद अली यांनी दिली.

झुल्फिकार अली भुत्तोंचा 8 सप्टेंबर 1951 ला विवाह झाला. यावेळी भुत्तो नाशिकमध्ये राहत असत तर त्यांचे रानडे म्हणून एक वकील हे शेतसारा वसूल करून नाशिकला त्यांच्या मुक्कामी पोहचवत असत. तर कधी स्वतः गावकरी हा शेतसारा नाशिकला त्यांच्याकडे पोहचवत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

झुल्फिकार अली भुत्तो

खंडेराव दरगोडे यांना त्यांच्या वयाच्या 93 व्या वर्षीही लहानपणीच्या आठवणी लख्ख आठवतात. दरगोडे देखील लहानपणी वडिलांसोबत भुत्तो यांच्या घरी शेतसारा देण्यासाठी गेल्याचं त्यांनी सांगितलं.

"नंतरच्या काही दिवसांतच फाळणीचे परिणाम दिसून लागले होते. झुल्फिकार अली भुत्तो यांच्या पत्नी त्यावेळी गरोदर होत्या. फाळणीनंतर झुल्फिकार यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी त्यांची जमीन कुळांना दिली तर दुष्काळग्रस्त इंदोरे गावाला त्यांच्या वापरातील विहीर भेट म्हणून दिली," असं दरगोडे यांनी सांगितलं.

...तर बेनझीर नाशिककर असत्या

यावेळी भुत्तो यांच्या पत्नीला आठवा महिना सुरू होता. जर त्यावेळी भूत्तो कुटुंबीय सिंध प्रांतात नसतं गेलं तर महिनाभरातच बेनझीर भुत्तोंचा जन्म नाशिकमध्ये झाला असता. अशा आठवणी खंडेराव दरगोडे आणि इंदोरे गावातील अन्य ग्रामस्थांनी सांगितल्या.

बेनझीर भुत्तो या जन्मानंतर पुन्हा या गावात आल्या नसल्या तरी त्यांनी अनेकदा जाहीररित्या त्यांचं या गावाशी असलेलं नातं बोलून दाखवलं आहे. त्यांच्या वडिलांचा उमेदीचा काळ या गावात गेल्यानं बेनझीर यांनी या गावातल्या नागरिकांप्रती नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

बेनझीर भुत्तो या जन्मानंतर पुन्हा या गावात आल्या नसल्या तरी त्यांनी अनेकदा जाहीररित्या त्यांचं या गावाशी असलेलं नातं बोलून दाखवलं आहे.

विहीरीजवळच पानबंदी या नावानं ओळखला जाणारा जमिनीचा १३ एकर हिस्सा अजूनही भुत्तो यांच्या वारसांच्या नावानं आहे. गावात हनुमानाचं पुरातन मंदिर असून मंदिराशेजारीच चांदशावाली बाबा दर्गा आहे. दोन्ही धर्मियांचे उत्सव भुत्तो यांच्या काळापासूनच सलोख्यानं सुरू आहेत.

गावातील खंडेराव दरगोडे आजोबा आणि मोहम्मद अली सय्यद अली यांनी साऱ्या आठवणी बीबीसीशी बोलताना सांगितल्या. भुत्तो परिवाराबद्दल असलेलं प्रेम आजही या ग्रामस्थांच्या बोलण्यात जाणवतं.

बेनझीर यांच्या हत्येचा निषेध...

आपल्या शेजारी राष्ट्राच्या दोन राष्ट्रप्रमुखांशी आपला जवळचा संबंध होता याबद्दल त्यांना वाटणारं अप्रूप त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी झळकत होतं.

कारण, झुल्फिकार यांना ज्या दिवशी फाशी देण्यात आली त्यादिवशी गावानं निषेध व्यक्त करत बंद पाळला होता. तर, बेनझीर भुत्तो यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण गाव हळहळलं होतं. ग्रामस्थांनी एकत्र येत बेनझीर यांना श्रद्धांजली वाहिली होती.

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE

फोटो कॅप्शन,

इंदोरे गावातील खंडेराव दरगोडे आणि आणि मोहम्मद अली सय्यद अली भुत्तो कुटुंबीयांच्या आठवणी सांगताना त्याकाळात हरवून गेले होते.

बेनझीर यांच्या हत्येच्या निषेधार्थ गावात एकमुखी निषेध व्यक्त करण्यात आला होता.

आज बेनझीर भुत्तो यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गावातली जुनी जाणती मंडळी, बेनझीर भुत्तोचं स्मरण करण्यासाठी जमतात.

आणखी वाचा -

तुम्ही हे पाहिलं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : चार्ली चॅप्लिन यांची मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ: प्रवाळांची सुंदर दुनिया धोक्यात...

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)