सोशल : 'लोकशाहीवर विश्वास नसणार्‍या नेत्यांचं काय करायचं?'

हंसराज अहीर Image copyright Twitter

"डॉक्टरांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालून मारू," असं विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केलं आहे.

चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालयात माफक दरात रुग्णांना औषध उपलब्ध करण्यासाठी मेडिकल स्टोअर सुरू करण्यात आलं. त्याचं लोकार्पण अहीर यांच्या हस्ते झालं.

या कार्यक्रमाला अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक गैरहजर असल्यानं अहिर संतापले. "संबधित अधिकारी आणि डॉक्टरांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी नक्षलवादी व्हावं, आम्ही त्यांच्या छातीत गोळ्या घालू," अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं त्यांच्या वाचकांना विचारलं होतं की, तुम्हाला हंसराज अहीर यांच्या या वक्तव्याविषयी काय वाटतं? बहुतांश वाचकांना अहीर यांचं विधान पटलेलं नाही.

मारोती कदम विचारतात, "लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या नेत्यांचं काय करायचं?"

Image copyright Facebook

हरिष तायडे लिहितात, "यामध्ये काही नवीन नाही. सरकारी अन्यायाला विरोध करणाऱ्यांना नक्षलवादी ठरवून नेहमीच गोळ्या घातल्या जातात."

तर आशिष गांधी म्हणतात, "मंत्र्यांच्या कार्यक्रमात गैरहजर राहणाऱ्यांपेक्षा संसदेत गैरहजर राहणारे गंभीर दोषी असतात."

Image copyright Facebook

श्रेयस खराडे यांच्या मते कट्टरवादी लोकांकडून दुसरी अपेक्षा नाही. तर पुर्णा मौर्य लिहितात, "यांना डॉक्टरची गरज पडत नाही का?"

Image copyright Facebook

सचिन पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारनं बोलण्याची आचारसंहिता ठरवण्याची मागणीच केली आहे.

Image copyright Facebook

"साहेब, कॅज्युअल्टीमध्ये एक दिवस राहून पाहा मग समजेल डॉक्टर काय असतात," सचिन मापारी सांगतात.

Image copyright Facebook

गुरुराज देशपांडे यांचं मत थोडं वेगळं आहे. ते म्हणतात, "बरोबरच आहे अहीरांचं. उच्चपदस्थ अधिकारी महत्त्वाच्या दिवशी रजा टाकून गेले. सरकार जनतेचा पैसा देतंय तर त्यांनी उपस्थित राहायला हवं."

Image copyright Facebook

तर अमित बनसोडे म्हणतात, "हा सत्तेचा माज आहे, दुसरं काही नाही."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे वाचलंत का?