ससून डॉकच्या रंगीबेरंगी भिंतींवर बदलत्या मुंबईचं चित्र आणि काही समस्या

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - ससून डॉक : देशी-विदेशी कलाकारांच्या नजरेतून मुंबईचं बदलतं रूप

भल्या पहाटे बंदरात आलेल्या बोटी, त्यांतून मासळी काढण्याची धावपळ, धक्क्यावरची गडबड, कलकलाट, आसपास पसरलेला कचरा... मुंबईच्या ससून डॉकवर एरवी असंच दृष्य दिसायचं. पण याच बंदराचं दोन महिन्यांपूर्वी कलादालनात रुपांतर झालं आणि ससून डॉकच्या परिसरालाच नवी झळाळी चढली.

अगदी पक्के मुंबईकर आणि सी-फूडचे चाहते सोडले, तर अनेकांना मुंबईतल्या या बंदराविषयी फारशी माहिती नाही. पण आता मुंबईकरच नाही तर देशी-विदेशी पर्यटकही वाट मोडून ससून डॉकला भेट देऊ लागले आहेत. त्यामुळं हे जुनं बंदर पुन्हा चर्चेत आलं आहे.

ससून डॉक का महत्त्वाचं?

1875 साली 'डेव्हिड ससून अँड कंपनी'ने या गोदीची निर्मिती केली. पूर्वी या ठिकाणाहून मालवाहतूकही होत असे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे सुपरिंटेंडंट इंजिनियर शेखर लागवणकर ससून डॉकविषयी माहिती देतात.

"मुंबई बंदराचा संपूर्ण विकास ससून डॉकपासून सुरू झाला आहे. आता इथं केवळ मासेमारीचं काम चालतं. दिवसाला इथे सव्वाशे ते दीडशे बोटी येतात. त्यातून चारशे ते पाचशे टन मासळी बंदरात येते."

Image copyright SHARAD BADHE/BBC
प्रतिमा मथळा 'तरदिवशी याठिकाणी सव्वाशे ते दीडशे बोटी येतात. त्यातून चारशे ते पाचशे टन मासळी बंदरात येते'

ससून डॉकच्या परिसरात मासळीची विक्री होते, तसंच मासे साफ करणं, कोलंबी सोलणं, मासळीची साठवणूक, अशी कामंही केली जातात.

अशा परिसरात एखादं आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शन भरवणं ही कल्पनाच नवीन वाटते. पण St+Art संस्थेन तो विडा उचलला.

कलेला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

'ससून डॉक आर्ट प्रोजेक्ट'च्या माध्यमातून कलाकार आणि समाज यांच्यातली दरी मिटवण्याचा Sू+Art चा प्रयत्न आहे.

"जिथे कोणी कल्पनाही करू शकणार नाही अशा ठिकाणी, अशा लोकांपर्यंत कला नेणं हे आमचं उद्दिष्ट आहे. हे कलाप्रदर्शन साकारतानाही स्थानिकांची मदत घेण्यात आली," अशी माहिती या संस्थेचे सहसंस्थापक अर्जुन बहल यांनी दिली.

Image copyright SHARAD BADHE/BBC
प्रतिमा मथळा मुंबईचं ससून डॉकचं असं कलादालनात रुपांतर झालं आहे.

कोळी बांधवांच्या दैनंदिन जीवनापासून प्रेरणा घेऊनच यातील अनेक या कलाकृती साकारल्या आहेत. परिसरात प्रवेश करतानाच अविनाश आणि प्रज्ञेश परमार यांचं 'ड्रीम ऑफ ससून' हे भव्य म्युरल (भित्तीचित्रं) तुमचं लक्ष वेधून घेतं.

मुख्य प्रदर्शन बंदरावरच्या एका वापरात नसलेल्या इमारतीत भरवण्यात आलं आहे, जिथं आधी कोलंबी आणि मासे सोलण्याचं काम चालायचं.

Image copyright SHARAD BADHE/BBC
प्रतिमा मथळा कलाप्रदर्शन साकारतानाही स्थानिकांची मदत घेण्यात आली

याच मुख्य दालनाच्या दर्शनी भागात वेगवेगळे भाव दाटलेले चेहरे तुमच्याकडे डोकावून पाहतात. ससून डॉक परिसरातल्या लोकांची ही छायाचित्र आहेत.

मुंबईचं बदलतं रूप

या प्रदर्शनात देशी-विदेशी कलाकारांच्या नजरेतून मुंबईचं बदलतं रूपही पाहायला मिळालं. 'अर्थात कलेक्टिव्ह'नं साकारलेला 'डेड फिश' पाहताना झपाट्यानं वाढणारं मुंबई शहर म्हणजे मृत व्हेल माशाचा सांगाडा, ही कल्पनाच हादरवून टाकते.

Image copyright SHARAD BADHE/BBC
प्रतिमा मथळा बदलती मुंबई म्हणजे मृत व्हेल माशाचा सांगाडा?

क्युरियट आणि रोमिना या लॅटिन अमेरिकन कलाकारांनी रंगवलेला 'शून्य' हा ड्रॅगन असो वा ऑस्ट्रेलियन कलाकार गिडो वॅन हेल्टननं दोन मजली हॉलच्या भिंतीवर साकारलेली पेंटिंग्ज, यांचाही विशेष उल्लेख करायलाच हवा.

या प्रकल्पामुळं केवळ प्रदर्शनाचं दालनच नाही तर या संपूर्ण इमारतीवर आणि आसपासच्या परिसरातही रंगांची उधळण झाली आहे.

ससून डॉकवरील कर्मचारी आणि कोळीबांधवांनीही आता काम करण्यासाठी आणखी उत्साह वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सुशोभिकरण झालं, सुविधांचं काय?

या कलाप्रदर्शनानं ससून डॉकच्या समस्यांकडेही लक्ष वेधून घेतलं आहे. मासळी सोलण्याचं काम करणाऱ्या अनिता राठोड यांनी आपल्या अडचणी आमच्यासमोर मांडल्या.

"परदेशाचे लोक येतात, सगळं बघतात. छान वाटतं. पण यातून आमचा काय फायदा? आमच्यासाठी काही सोयी नाहीत. कुठे खायची, बसायची सोय नाही."

Image copyright SHARAD BADHE/BBC
प्रतिमा मथळा 'आमच्यासाठी काही सोयी नाहीत. कुठे खायची, बसायची सोय नाही.'

मच्छीमार हातगाडी संघाचे प्रमुख केरू थोरात मात्र आशावादी आहेत. "असे उपक्रम असतील तर त्यानिमित्तानं स्वच्छताही जास्तीत जास्त राहीलच," असा विश्वास थोरात व्यक्त करतात.

मुंबई पोर्ट ट्रस्टही या गोष्टींवर भर देत असल्याचं अनुपमा करणम यांनी स्पष्ट केलं. त्या सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टसाठी टाऊन प्लॅनर म्हणून काम करत आहेत.

"ससून डॉकवर मासळीवर प्रक्रिया करण्याची सुविधा आणि ती साठवण्यासाठी जागा, महिला कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघरं, कचऱ्याचं नियंत्रण, फिश म्युझियम, छोटे रेस्टॉरन्ट्स, अशा गोष्टींचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं अनुपमा यांनी सांगितलं.

Image copyright SHARAD BADHE/BBC
प्रतिमा मथळा अजून बरंच काही करण्याची गरज आहे, पण हे प्रदर्शन ही एक चांगली सुरुवात आहे, असं बहल सांगतात.

अडचणी संपलेल्या नाहीत, पण अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत याकडे अर्जुन बहल यांनी लक्ष वेधलं आहे.

"ससून डॉकच्या साफसफाईसोबतच या जागेकडे आणि इथल्या लोकांकडे सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात आम्हाला यश आलं आहे. कोळी समाजानं मुंबईच्या वाटचालीत मोठं योगदान दिलंय," असं अर्जुन सांगतात.

"अजून बरंच काही करण्याची गरज आहे, पण हे प्रदर्शन ही एक चांगली सुरुवात आहे." असं अर्जुन बहल यांनी नमूद केलं.

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)