'माझ्या वहिनीलाही टिकली आणि सिंदूर काढायला लावला होता'- दलजीत

पाकिस्तान, मानवाधिकार, भारत Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सरबजीत सिंह यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.

'मला 'कृपाण' (स्वसंरक्षणासाठीचं हत्यार) बाजूला ठेवा असं सांगण्यात आलं. पूजनीय असं कृपाण उंचावर ठेवतील असं वाटलं होतं. पण त्यांनी कृपाण चपलांच्या जवळच ठेवलं. हुज्जत घालण्यात अर्थ नव्हता कारण मला माझ्या भावाला भेटायचं होतं. मला माझ्या भावाला भेटायचंच होतं'.

पाकिस्तानामध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी आपल्या भावाला भेटण्यासाठी पाकिस्तानला भेट देणाऱ्या सरबजीत सिंह यांच्या भगिनी दलजीत कौर यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

सरबजीत सिंग यांची पत्नी, बहीण दलजीत कौर आणि दोन मुली 2008 मध्ये त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्या होत्या.

सुरुवातीपासूनच अपमानास्पद वागणूक

'आम्ही नुकतेच लाहोरला पोहोचले होतो. प्रसारमाध्यमांमुळे आमची गाडी रोखण्यात आली. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी गाडीच्या काचा उघडून आम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आम्ही काय खातोय-पितोय, कुठे जातोय-येतोय या सगळ्यांचं थेट प्रक्षेपण सुरू होतं. तेव्हापासूनच अपमानास्पद वागणुकीला सुरुवात झाली', असं दलजीत सांगतात.

Image copyright foreignofficepk
प्रतिमा मथळा कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्ताननं दिलेली वागणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर सरबजीत यांच्या कुटुंबीयांना सरबजीत यांना भेटता आलं. कुलभूषण यांच्याप्रमाणेच सरबजीत यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलं होतं.

'जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा पाकिस्तान सरकारचे अनेक अधिकारी, पोलीस, आयएसआय तसंच गुप्तचर संघटनेचे अधिकारी उपस्थित होते. आम्हाला केसांचा अंबाडा सोडायला लावला. सरबजीतच्या मुलींच्या वेण्या सो़डवून दाखवायला लावल्या. सरबजीतच्या पत्नीला टिकली काढायला सांगण्यात आलं. रुमालानं सिंदूर पुसायला लावला', असं दलजीत यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, 'कृपाण, सिंदूर काढणं आमच्या संस्कृतीत अपशकुन मानलं जातं. कृपाणचा अपमान करण्यात आला. हुज्जत घालण्यात अर्थ नव्हता कारण मला माझ्या भावाला भेटायचं होतं. मनमोहन सरकारला या सगळ्याची कल्पना दिली. मात्र कोणीही पाकिस्तानकडे याची तक्रार केली नाही. जाधव कुटुंबीयांना 22 महिन्यांनंतर आपल्या माणसाला भेटण्याची संधी मिळाली. मात्र आम्हाला 18 वर्ष प्रतीक्षा करावी लागली'.

लहान मुलींचीही गय नाही

'आम्ही सरबजीतला भेटून परतलो तेव्हा प्रसारमाध्यमांनी आमच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सरबजीतची मुलगी पूनमला विचारलं की, तुझे बाबा दहशतवादी आहेत. शाळेत तुमच्याशी कसं वागतात? लोक तुम्हाला कोणत्या नजरेने बघतात? आम्हाला विचारलं की, एका खुन्याला भेटून कसं वाटतं? पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी आमच्या भावनांना पायदळी तुडवत अपमान केला'.

Image copyright PAKISTAN FOREIGN OFFICE
प्रतिमा मथळा कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी त्यांची पाकिस्तानात भेट घेतली.

दलजीत पुढे सांगतात, 'जाधव कुटुंबीयांना अशी वागणूक मिळणार नाही अशी आशा होती कारण त्यांना परराष्ट्र मंत्रालयाचा आधार होता. मात्र आमच्याप्रमाणेच त्यांच्या पदरी अपमानच आला. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल याची आम्हाला कल्पना आली'.

'आम्हाला सरबजीतला भेटण्यासाठी जेमतेम पन्नास मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यापैकी अर्धा तास आमच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. सरबजीतची अवस्था पाहून आम्ही घाबरलो होतो. जाधव कुटुंबीय आणि कुलभूषण यांच्यात काचेची भिंत होती. सरबजीत आणि आमच्यात....'

'जाधव कुटुंबीयांच्या भावना मी समजू शकते. मला भावाला कडकडून मिठी मारायची होती. त्याला समोर प्रत्यक्ष पुरेपूर पाहायचं होतं. तसंच काहीसं कुलभूषण यांच्या आईलाही वाटलं असेल. माझ्या वहिनीलाही नवऱ्याला भेटण्याची इच्छा होती. सरबजीतचा हात हातात घेऊन तुम्ही कसे आहात विचारायचं होतं. कुलभूषण यांच्या पत्नीलाही तसंच वाटलं असेल'.

तो क्षण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही

सरबजीतच्या भेटीचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. म्हणूनच कुलभूषण यांच्या कुटुंबीयांच्या भेटीचे फोटो जाणीवपूर्वक प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

Image copyright PAKISTAN FOREIGN OFFICE
प्रतिमा मथळा कुलभूषण आणि त्यांच्या कुटंबीयांमध्येही काचेची भिंत होती.

'गुरुद्वारात लंगरमध्ये जेवतानाही आमच्या प्रत्येकाबरोबर त्यांचा एक माणूस असे. त्यावेळी या सगळ्याचे फोटो जगासमोर आले नाहीत. कारण सरबजीतवर पाकिस्तानच्या न्यायालयात खटला सुरू होता. मात्र जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानची भूमिका वेगळी आहे. आम्ही भारताच्या दहशतवाद्याला पकडलं आहे आणि तरीही त्याला कुटुंबीयांना भेटण्याची संधी दिली, याचा फायदा पाकिस्तानला उठवायचा होता'.

भावाच्या आठवणीने दलजीत भावुक होतात.

'सरबजीतला काही पदार्थ खाऊ घालण्याची आमची इच्छा होती. तसं सांगितल्यावर त्यानं एक वाडगा आमच्यासमोर धरला. तो क्षण काळीज हेलावून टाकणारा होता. तो क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही'.

सरबजीतचा लाहोर तुरुंगात मृत्यू

लाहोर आणि फैसलाबाद येथे 1990 मध्ये झालेल्या बाँबस्फोटप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं सरबजीत सिंहला फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या दाव्यानुसार 2013 मध्ये सरबजीतवर तुरुंगातील अन्य कैद्यांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर सहा दिवसात 2 मे 2013 रोजी सरबजीतचा मृत्यू झाल्याचं पाकिस्ताननं सांगितलं.

आणखी वाचा-

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)