रजनीकांत राजकारणातले 'बॉस' ठरतील का?

रजनीकांत Image copyright AFP/GETTY IMAGES

31 डिसेंबरला अख्खं जग 2018च्या स्वागताची पार्टी करत असताना, रजनीकांत नवीन पक्ष काढतील का? ते तामिळनाडूत जयललितांनंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढतील का?

चेन्नईतला आर. के. नगर मतदारसंघ सतत चर्चेत असतो. आधी जयललिता इथून लढून पुन्हा मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण त्यांच्या निधनानंतर गेल्या वर्षभरात या राज्यातल्या घडामोडींनंतर इथे पुन्हा निवडणुका झाल्या.

AIADMKच्या दोन गटांमध्ये बराच संघर्ष झाला.

पण यामुळे एक सिद्ध झालं, की जयललिता यांच्या मृत्यूनंतर AIADMKची वोट बँक ठीकठाक आहे. तुम्ही दिनाकरन यांना पक्षापासून वेगळं बघू नका. त्यांना पक्षाचाच एक भाग म्हणून बघता येऊ शकतं.

एकीकडे जयललिता यांचं निधन झालं आणि दुसरीकडे DMK प्रमुख करुणानिधी तब्येतीमुळे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत. अशातच तामिळनाडूमध्ये एक तिसरी शक्ती उदयाला येत आहे.

पण राजकारणात जायचं की नाही, याबद्दल रजनीकांत यांच्या मनात अजूनही काही स्पष्टता नाही. गेल्या एक वर्षात त्यांनी जी वक्तव्यं केली आहेत, त्यावरून तरी त्यांना विजयाची शाश्वती नाही, असं दिसत आहे.

ते सांगतात की राजकारणात जिंकणं फार महत्त्वाचं आहे. पण त्यांना भरवसा नाही. फक्त चाहत्यांच्या बळावर मतं मिळतील का?

बहुतांश लोक अभिनेता MGRचं उदाहरण देतात. त्यांनी कसं पक्ष स्थापन करून पाच वर्षांतच राज्यात सरकार स्थापन केलं, याचे दाखले देतात. पण लोक एक गोष्ट विसरतात की MGR हे DMKचे सदस्य आणि आमदारही होते.

Image copyright AFP/Getty Images

1972 साली जेव्हा पक्षांनं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, तेव्हा DMKचे अनेक नेते आणि पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर बाहेर पडले. म्हणून MGR राजकारणात यशस्वी झाले.

जयललिता यांच्याकडे AIADMKचा आधार होता. त्यांनी या आधाराचा स्वत:साठी वापर केला. रजनीकांत आणि कमल हासन यांच्याकडे असा आधार नाही. त्यांचा आधार केवळ त्यांचे चाहते आहेत.

गेल्या 20 वर्षांपासून रजनीकांत सांगत आहेत की ते राजकारणात येणार, पक्ष काढणार. पण ते कधी, हे मात्र त्यांनाच माहिती नाही. असा फिल्मी डायलॉग लोकांची मतं आकर्षित करू शकत नाही.

कमल हासन तर राजकारणापासून दूरच होते. जयललितांच्या निधनापूर्वीच्या काळात त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही.

असं वाटतं की दोघांनाही राजकारणात यशस्वी होण्याचा विश्वास नाही. राजकारणाबद्दल दोघंही गंभीर आहे. पण हा विचार कसा पुढे घेऊन जाता येईल, हे माहिती नाही. जयललिता यांच्या मृत्यूनंतर एक जागा निर्माण झाली आहे याची त्यांना कल्पना आहे.

Image copyright AFP/Getty Images

कमल हासन यांनी ते एक राजकीय पक्ष काढणार, असं म्हटलं होतं. मग म्हणाले की ते आधीपासूनच ते राजकारणात आहेत, जेव्हा ते तरुण होते तेव्हासुद्धा ते राजकारणात होते.

रजनीकांत आणि कमल हासन दोघांनीही प्रत्यक्षात राजकीय पातळीवर काम केलं नाही.

Image copyright Getty Images

नोव्हेंबरमध्ये त्यांच्या जन्मदिवशी कमल हासन म्हणाले की ते जानेवारीत तामिळनाडूचा दौरा करणार, पण त्यांच्या कामात ज्या प्रकारचा वेग अपेक्षित होता, तो सध्या नाही.

स्थानिक लोकांना रजनीकांत राजकारणात येतील, असा विश्वास नाही. कमल हासन अजूनही आपले मनात काय, हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवू शकले नाही आहेत.

तामिळनाडूत 50 वर्षांपासून लोक DMK आणि AIADMKचं राज्य आहे, म्हणून लोकांना बदल हवा आहे. बदल घडवण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेकदा झाला आहे.

तामिळनाडूत राष्ट्रीय पक्षाचं अस्तित्व नाही

2016 साली विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांबरोबरच एक तिसरी आघाडी उदयास आली होती. 'People's Welfare Alliance' असं त्या आघाडीचं नाव होतं, ज्याचं नेतृत्व विजयकांत यांनी केलं होतं. त्यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते, पण निवडणुकीत ते पडले.

तामिळनाडूत द्रविडेतर पक्षाचं सरकार कधीही आलेलं नाही. आर. के. नगर पोटनिवडणुकांमध्ये तर विविध राज्यांच्या निवडणुका जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला नोटापेक्षासुद्धा कमी मतं मिळालीत. इथे राष्ट्रीय पक्षांचं अस्तित्वच नगण्य आहे.

चाहते खूप आहेत पण...

तामिळनाडूमध्ये लोकांना चित्रपट अभिनेत्यांचं भलतंच वेड असतं. ते तर आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या कटआऊटला दुग्धाभिषेकही करतात. पण भक्तिभावावर विश्वास असणाऱ्या चाहत्यांचा एक वर्ग आहे.

त्यांचा आवडता अभिनेता कोणत्याही पक्षात गेला तरी त्यांना मतं देतात. पण चाहते दुसऱ्या पक्षात असतात. स्वाभिकवपणे त्यांच्या राजकीय आकांक्षा वेगळ्या असू शकतात.

Image copyright AFP/GETTYIMAGES

आता रजनीकांतचंच उदाहरण घ्या.

ते सांगत आले आहेत की मी 1996 पासून राजकारणात आहेत. त्यावेळी त्यांनी DMK आणि तामिल मनिला काँग्रेस (TMC) यांना पाठिंबा दिला होता. ते प्रचंड बहुमताने विजयी झाले होते आणि जयललितांचा निवडणुकीत पराभव झाला होता. पण दोन वर्षांनी 1998 साली पाठिंबा असूनसुद्धा DMK-TMCचा निवडणुकीत पराभव झाला.

2004 साली त्यांनी DMK विरुद्ध भाजप-AIADMK युती असा सामना होता. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या चाहत्यांनी या युतीला समर्थन द्यावं. पण ही युती एकही जागा जिंकू शकली नाही.

त्याकाळी रजनीकांतची लोकप्रियता तर आजच्या पेक्षाही जास्त होती. पण सगळ्याच चाहत्यांनी त्यांना मत दिलं नाही. DMKने त्या निवडणुकीत सर्व 40 जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ असा आहे की चाहते स्वतंत्रपणे विचार करतात.

म्हणूनच बॉक्स ऑफिसवरचं कलेक्शन आणि मतपेटींमधून बाहेर येणारे निकाल यांच्यातला अंतर अजूनही रजनीकांत समजून घेत आहेत, असं दिसत आहे. त्यामुळे पडद्यावरचं त्यांच्याभोवतीचं वलय राजकीय पटलावरही उमटू शकेल का, आणि ते जयललितांची पोकळी भरून काढू शकतील का, यासाठी त्यांची 31 डिसेंबरची घोषणा आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर सर्वांचं लक्ष राहील.

हे वाचलं का?

(बीबीसी प्रतिनिधी विनीत खरे यांच्याशी झालेल्या मुलाखतीवर आधारित)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)