Fire Safety: आग लागली तर काय करायला हवं? या 6 गोष्टी ठेवा लक्षात

आग

फोटो स्रोत, Getty Images

आग लागण्याची शक्यता कुठेही नाकारता येत नाहीच, विशेषतः अशा सार्वजनिक ठिकाणी जिथे फायर सेफ्टी ऑडिट झालेलं नसतं. पण अचानक आग लागली तर त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा? मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी कैलास हिवराळे यांच्याकडून जाणून घ्या...

1) आग लागू नये म्हणून काय कराल?

प्रत्येक ठिकाणी आग लागतेच असं नाही. पण हल्ली विद्युत पुरवठ्याचा वापर वाढला आहे. कंसिल्ड वायरिंग असतं, ते तपासायला हवं. घराचं वायरिंग करताना आपण उत्तम दर्जाच्या वायर आणि इतर गोष्टी वापरत आहोत, याची काळजी घ्यायला हवी.

आजकाल सुशोभीकरण करण्यासाठीही वीजेच्या दिव्यांचा वापर होतो. तिथंही याच प्रकारची खबरदारी घ्यायला हवी.

2) आग लागली, तर काय?

तुम्ही एखाद्या फ्लॅटमध्ये आहात आणि तुमच्या किंवा बाजूच्या घरात आग लागली, तर प्रत्येक इमारतीला इमर्जन्सी एक्झिट असते. घरातून बाहेर पडताना गॅस, वीज वगैरे सगळं बंद असल्याची खात्री करून घ्यायला हवी.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे डोकं ताळ्यावर ठेवणं गरजेचं आहे. धूर तुमच्या घराकडे येत असेल, तर ओला कपडा तोंडावर बांधावा. धूर जास्त प्रमाणात येत असेल, तर रांगत रांगत भिंतीच्या सहाय्यानं जिन्याच्या दिशेने सरकावं.

3) मॉलमध्ये आग लागली तर?

प्रत्येक मॉलमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा लावलेली असते. तसंच रिसेप्शन एरियामध्ये मॉलचा संपूर्ण नकाशा असतो. त्या नकाशावर आत येण्याचा मार्ग, बाहेर जाण्याचा मार्ग, आपत्कालीन स्थितीत बाहेर जाण्याचा मार्ग या सगळ्याची नोंद असते.

नकाशाबरोबरच मॉलच्या प्रत्येक मजल्यावर फ्लुरोसंट रंगात 'एक्झिट'च्या खुणा रंगवलेल्या असतात. या खुणांचा माग काढत तुम्ही योग्य जागी पोहोचू शकता.

मॉलसारख्या गर्दीच्या ठिकाणी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अजिबात गोंधळून जायचं नाही. गोंधळून गेलात की, चेंगराचेंगरीला आमंत्रण मिळतं. त्यातून वेगळीच दुर्घटना घडण्याची शक्यता असते.

एखाद्या ठिकाणी आग लागल्याचं तुम्हाला कळलं, तर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून द्या. तिथं उपलब्ध असलेल्या अग्निरोधक यंत्राचा वापर करून अगदी छोटी आग विझवता येते.

तसंच फायर अर्लामचं बटण दाबून इतरांनाही धोक्याची सूचना देणं आवश्यक आहे.

4) ऑफिसच्या जागी काय करावं?

हल्ली अनेक कंपन्यांच्या इमारती काचेच्या असतात. अशा इमारतींना एका ठरावीक प्रमाणात व्हेंटिलेशनची व्यवस्था ठेवणं अनीवार्य आहे. अनेक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. पण ते घातक आहे.

बायोमॅट्रिक प्रणाली वापरणाऱ्या ऑफिसमध्ये किमान दोन ठिकाणी तरी आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची व्यवस्था असणं आवश्यक आहे.

इमारतींवर वापरली जाणारी काच खूप टणक असते. ती इतर खिडक्यांच्या काचांसारखी सहजासहजी फुटत नाही. ती फोडण्यासाठी एका विशेष प्रकारच्या हातोडीची गरज असते. ही हातोडी फक्त काही प्रोफेशनल लोकांकडेच असते.

त्यामुळे काचा फोडण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक प्रणाली असलेल्या ऑफिसमध्ये आपल्याला उघडता येतील, अशा खिडक्यांची मागणी करायला हवी.

5) हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काय करायचं?

सगळ्यात पहिले म्हणजे अतिगर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. चिंचोळ्या जागी असलेल्या हॉटेलमध्ये जाणं तर नक्कीच टाळलं पाहिजे. अशा ठिकाणी आग लागली, तर कोणतीही गडबड-गोंधळ न करता त्या ठिकाणाहून बाहेर कसं पडता येईल, हे बघितलं पाहिजे.

धूर असला, तर मगाशी सांगितलेली पद्धत वापरायची.

6) काळजी घेणं ही दुर्घटना टाळण्याची पहिली पायरी

अपघात टाळता येत नाहीत. पण तरीही मुंबई अग्निशमन दलानं काही स्वयंसेवक तयार केले आहेत. एखाद्या ठिकाणी आग लागली किंवा इमारत कोसळली, तर या स्वयंसेवकांचं पहिलं काम असतं ते म्हणजे, संबंधित भाग इतरांसाठी बंद करणं!

पोलीस, अग्निशमन दल यांना तातडीनं पाचारण करायला हवं. हे फक्त स्वयंसेवकांचं काम नाही, तर सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. सामान्य नागरिकांचं सहकार्य मिळालं, तर आमचं काम उत्तम होतं.

एखाद्या सामान्य माणसाला कुठेही आग लागल्याचं कळलं आणि त्याने फोन करून आम्हाला त्या आगीच्या स्वरूपाबद्दल माहिती दिली की, आम्ही लगेच कामाला लागतो.

आम्हाला कळवणारी व्यक्ती त्या इमारतीतील किंवा त्या भागातील असावीच, असं काही नाही. कोणताही माणूस आम्हाला सूचना देऊ शकतो.

फोटो स्रोत, JANHAVEE MOOLE/BBC

फोटो कॅप्शन,

कमला मिलमधली सकाळची स्थिती

आमच्या स्वयंसेवकांना आम्ही प्रशिक्षण दिलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे छोटी आग लागली असेल, तर आमचे स्वयंसेवक ती आग विझवू शकतात.

घरात आपण आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घेतो, तसंच अग्निसुरक्षेची काळजी घ्यायला हवी. विद्युत पुरवठा, इंधन यांवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करताना योग्य काळजी घेतली, तर आग लागणार नाही.

तुम्ही हे वाचलंत का?

हे पाहिलं का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)