...या कारणामुळे जर्मनीतील आजींनी सुरू केली भारतात गोशाळा

फ्रेडरिक ब्रुइनिंग Image copyright SAMIRATMAJ MISHRA/BBC
प्रतिमा मथळा फ्रेडरिक ब्रुइनिंग या 40 वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा आल्या होत्या.

फ्रेडरिक ब्रुइनिंग या मूळ जर्मनीची राजधानी बर्लिनच्या रहिवासी. काही वर्षांपूर्वी त्या पर्यटनासाठी भारतात आल्या. तेव्हा त्यांना मथुरा शहर इतकं आवडलं की, त्यांनी दीक्षा घेऊन इथंच एका आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर एके दिवशी, वेदनेत असलेल्या गायीच्या एका घायाळ बछड्याला पाहून त्यांना इतकं वाईट वाटलं की, त्यांनी भारतातच राहून गायींची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

फ्रेडरिक सांगतात की, चाळीस वर्षांपूर्वी त्या भारतात आल्या. भारतासोबतच श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया आणि अन्य काही ठिकाणी त्या पर्यटनासाठी गेल्या.

पण मथुरा आणि वृदांवन शहरांनी त्यांना इतकं प्रभावित केलं की, त्यांना जर्मनीला परत जावं वाटलं नाही. असं असलं तरी, वर्षातून किमान एकदा तरी त्या बर्लिनला जातात.

1200 गायींची गोशाळा

मथुरेतल्या गोवर्धन पर्वताजवळच्या ग्रामीण भागात जवळपास 1200 गायींची एक गोशाळा आहे. तसं तर या भागात अनेक गोशाळा आहेत. पण 'सुरभि गौसेवा निकेतन' ही गोशाळा इतरांपेक्षा केवळ वेगळीच नाही तर खासही आहे.

कारण या गोशाळेत राहणाऱ्या गायी विकलांग, आजारी किंवा काही कारणास्तव अनाथ झालेल्या असतात.

Image copyright SAMIRATMAJ MISHRA/BBC

गोशाळेचा कर्मचारी वर्ग फ्रेडरिक यांना 'इंग्रज ताई' म्हणून हाक मारतो. साठ वर्षांच्या फ्रेडरिक या गोशाळेच्या संचालक आहेत. आणि गेल्या चाळीस वर्षांपासून त्या इथंच राहून गायींची सेवा करत आहेत.

"वीस-एकवीस वर्षांची असताना मी दक्षिण-आशिया फिरायला आली होती. भारतात आले तेव्हा भगवद्गीता वाचल्यानंतर मला अध्यात्माविषयी आवड निर्माण झाली. अध्यात्माबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एका गुरूची आवश्यकता होती. गुरूचा शोध घेत घेत मी ब्रज क्षेत्रात आले. इथंच मला गुरू मिळाले आणि मी त्यांच्याकडून दीक्षा घेतली," फ्रेडरिक सांगतात.

गोरक्षा का?

गायींच्या प्रति जिव्हाळा कसा निर्माण झाला, याबद्दल फ्रेडरिक एक प्रसंग सांगतात, "दीक्षा मिळवल्यानंतर बरीच वर्षं मंत्रोच्चार, पूजा-पाठच करत होती. एके दिवशी मला गायीचं एक बछडं दिसलं. त्याचा एक पाय तुटला होता. सर्व लोक त्याला बघून न बघितल्यासारखं करत होते."

"मला त्या बछड्याची खूप दया वाटली आणि मग मी त्याला रिक्षातून आश्रमात घेऊन गेले. त्याची देखभाल केली. तेव्हापासूनच गायींच्या सेवेचं माझं काम सुरू झालं."

Image copyright SAMIRATMAJ MISHRA/BBC

सुरुवातीला फ्रेडरिक यांच्याकडे फक्त दहा गायी होत्या. नंतर त्यांची संख्या वाढून 100 वर गेली. या गायी दूध देत नाहीत. शिवाय यातल्या बहुसंख्य गायी दूध देत नसल्याने त्यांच्या मालकांनी त्यांना सोडून दिलेलं होतं.

फ्रेडरिक पुढे सांगतात, "काही वर्षांनंतर माझे वडील इथे आले. मला असं गायींसोबत, एका छोट्याशा घरात राहताना बघून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी मला परत घरी यायला सांगितलं. पण आता या गायींना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं."

वडिलांची मदत

3,500 स्केअर फूट परिसरात उभारलेल्या या गोशाळेत आज जवळपास 1200 गायी राहतात. त्यातल्या बहुतेक गायी आजारी तर काही विकलांग आहेत. काही गायी तर आंधळ्या आहेत.

सुरुवातीला १० गाईंची देखभाल करणं सोपं होतं, पण आता गायींची संख्या वाढल्यानं त्यांच्या देखभालीचा खर्चगी झेपेनासा झाला. मग फ्रेडरिक यांनी वडिलांना आर्थिक मदत मागितली, कारण त्यांना दुसऱ्या कुणावर अवलंबून रहायचं नव्हतं.

बाबांनीही मग त्यांना खूप सारे पैसे पाठवले आणि आजही दर महिन्याला पैसे पाठवत आहेत.

Image copyright SAMIRATMAJ MISHRA/BBC

गोशाळेच्या सुसज्जीकरणासाठी आणि गायींच्या इलाजासाठी दरवर्षी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो.

ही सगळी सेवा फ्रेडरिक कोणत्याही सरकारी मदतीविना करतात, हे विशेष. कारण भारतात अनेक स्वयंसेवी संस्था वेळोवेळी सरकारकडून अनुदान घेऊन गायींची देखभाल करतात.

फ्रेडरिक सांगतात की, "काही लोक गायींना लागणारा चारा आणि इतर बाबीही पुरवतात. पण मी स्वत:हून मदतीसाठी कुणाकडेही हात पसरत नाही. लोक स्वेच्छेने काही सामान-सामग्री पुरवतात."

'सुरभि गौसेवा निकेतन'

'सुरभि गौसेवा निकेतन' तीन भागांत विभागली आहे. बाहेरच्या बाजूस असलेल्या दोन भागांमध्ये गायींसाठी मोकळी जागा आहे, जिथं गायींना चारा खायला घातला जातो.

एका भागात गायींच्या खाण्यापिण्याचं सामान ठेवलं जातं. आणि गेटच्या आतील भागात सकाळ-संध्याकाळ येणाऱ्या गायींना भुसामिश्रित चारा खायला दिला जातो.

Image copyright SAMIRATMAJ MISHRA/BBC

याच भागात एक छोटीशी खोली आहे जिच्या भिंती आणि जमीन शेणानं सारवलेलं आहे. याच खोलीत फ्रेडरिक राहतात. आणि इथंच गायींची औषधं ठेवलेली असतात. वेळोवेळी डॉक्टर येऊन गायींची तपासणीही करतात.

आता आसपासच्या गावातले जवळपास 70 लोक फ्रेडरिक यांना या गोशाळेत सहकार्य करतात. काही लोक रात्रीही गोशाळेत थांबतात, जेणेकरून काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ते फ्रेडरिक यांना मदत करू शकतील.

गोशाळेत अनेक वर्षं काम करणारे सतीश सांगतात, ते फ्रेडरिक यांना दीदी (ताई) म्हणून हाक मारतात. ते पुढे सांगतात, "दिवसा इथं अपघात झालेल्या किंवा आजारी असलेल्या अनेक गाई येतात. आम्ही त्यांच्यावर इथं उपचार करतो."

"काही गायीच्या पिलांना दुसऱ्या गायींचं दूध पाजलं जातं. दुसरी गाय तसं करण्यास नकार देत असेल तर ताई पिलांना बाटलीने दुध पाजते."

सतीश सांगतात की, "काही गायी दूध देतात. पण ते इथल्या सर्व पिलांची भूक भागवेल एवढ्या प्रमाणात नसतं. त्यामुळे दररोज 40 ते 50 लीटर दुध दररोज बाहेरून विकत आणावं लागतं, जेणेकरून ज्या पिलांना आई नाही त्यांनाही दूध मिळतं."

गायीच्या मृत्युनंतर शोक

पण गायी मरतात तेव्हा त्यांचं काय करता? फ्रेडरिक सांगतात, "गायींच्या मृत्युनंतर इथंच त्यांचं दफन केलं जातं. दफन करतेवेळी त्यांच्या तोंडात गंगाजल टाकलं जातं. तसंच त्यानंतर लाऊडस्पीकर लावून शांति-पाठ म्हटला जातो."

Image copyright EPA

कथित गोरक्षकांबद्दल विचारल्यावर फ्रेडरिक हसत-हसत सांगतात, "हो. गोरक्षक इथंही येतात. पण ते इथं आजारी गायींना सोडण्यासाठी येतात. त्यांच्या स्वत:च्या आणि इतरही काही गायींना इथं ठेवून जातात."

गुरूकडून दीक्षा घेतल्यानंतर फ्रेडरिक यांचं नाव सुदेवी दासी पडलं. पण कागदोपत्री आजही त्या फ्रेडरिक ब्रुइनिंगच आहेत.

फ्रेडरिक सांगतात की, सुरुवातीला त्यांना हिंदी भाषा बोलता येत नव्हती. पण गुरूच्या आश्रमात असताना त्या हिंदी शिकल्या. त्यासाठी धर्म ग्रंथांची त्यांना खूप मदत झाली. आता तर त्या एकदम अस्खलित हिंदी बोलतात.

हिंदी तर त्या इथंच शिकल्या आणि त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली नाही, असं त्या पुढे सांगतात.

प्रचारापासून दूर

फ्रेडरिक यांना मथुराच काय तर वृदांवनमध्येही जास्त लोक ओळखत नाहीत. कारण त्या तर बहुतांश वेळी आश्रमात गायींची सेवा करण्यात व्यस्त असतात. प्रचार-प्रसारापासून त्या दूरच राहण्याचा प्रयत्न करतात.

Image copyright Thinkstock

मथुरातले सामाजिक कार्यकर्ते राकेश शर्मा सांगतात, "फ्रेडरिक खऱ्या अर्थानं गोसेवक आहेत. मथुरा-वृंदावन परिसरात हजार गायींना सामावू शकतील अशा गोशाळा आहेत, पण त्यापासून लोक लाखो रुपये कमावतात. पण या इंग्रज आज्जी तर स्वत:च्या पैशातून आजारी गायींची सेवा करत आहेत."

परिसरातल्या लोकांशी फ्रेडरिक जास्त संबंध ठेवत नसल्या तरी देश-विदेशातल्या घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. राजकारण, समाजकारण सर्वांवर त्यांची नजर असते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिन्यनाथ हे सुद्धा गायींची सेवा करतात, हे फ्रेडरिकना ठाऊक आहे.

गायींची दुर्दशा होऊ नये यासाठी आणि लोक स्वत:हून गायींच्या सुरक्षेकडे लक्ष देतील यासाठी फ्रेडरिक एक उपाय सुचवतात. त्या सांगतात, "जर गायींच्या पालनासाठी जागेची व्यवस्था केली आणि शेणाच्या खरेदीसाठी काही व्यवस्था केली तर लोक आपल्या गायींना सोडून देणार नाहीत. कारण त्यामुळे गायीचं फक्त दूधच नाही तर शेणंही विकलं जाऊ शकतं, याची लोकांना खात्री पटेल. आणि त्यातून आलेल्या पैशातून गायींच्या चाऱ्यापाण्याची व्यवस्था होऊ शकेल."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)