रघुनाथ माशेलकर: 'विचारवंत' वैज्ञानिकाचा जीवन प्रवास

रघुनाथ माशेलकर Image copyright Twitter/raghunath mashelkar
प्रतिमा मथळा रघुनाथ माशेलकर

ग्रीक विचारवंत प्लेटोनं 'फिलॉसॉफर किंग' किंवा विचारवंत राजाची संकल्पना मांडली होती. राजानं फक्त शासक असून चालणार नाही तर त्यानं विचारशील असावं, ज्ञान ग्रहण करण्याची त्याला आवड असावी असं प्लेटोनं म्हटलं होतं.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ओळख वैज्ञानिक अशी आहेच पण ते केवळ वैज्ञानिकच नाही तर एक विचारवंत देखील आहेत. गांधींजींवर आधारित 'टाइमलेस इंस्पिरेटर' हे पुस्तक संपादित करणाऱ्या माशेलकरांनी सतत तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळं ते देखील एक 'टाइमलेस इंस्पिरेटर' आहेत यात शंका नाही.

रघुनाथ माशेलकरांनी आज आपल्या वयाच्या पंचाहत्तरीमध्ये पदार्पण केलं आहे. गेली पाच दशकं त्यांनी आपलं आयुष्य विज्ञान आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केलं आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बीबीसी मराठीनं त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचं बालपण, गांधींजींच्या विचारांशी असलेली जवळीक आणि संशोधन क्षेत्रातील भारताची स्थिती अशा अनेक विषयांवर त्यांनी त्यांचे विचार मांडले.

बालपण

1 जानेवारी 1943 रोजी गोव्यातल्या माशेल या गावात रघुनाथ माशेलकरांचा जन्म झाला. त्यांना सर्व जण लाडानं रमेश म्हणत. माशेलकर सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली.

Image copyright Raghunath mashelkar
प्रतिमा मथळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक डॉ. बी. डी. टिळक यांच्यासोबत 33 वर्षीय रघुनाथ माशेलकर.

रघुनाथ माशेलकर आपली आई अंजनीताई माशेलकर यांच्यासोबत मुंबई आले. गिरगावमधल्या एका चाळीत ते राहू लागले. महापालिकेच्या शाळेत जाऊ लागले.

त्या वेळी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एका भाषणावेळी माशेलकरांनी आपल्या लहानपणीचा एक प्रसंग सांगितला. त्यावरुन आपल्याला त्यांच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकते. सातवी पास झाल्यानंतर त्यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता पण त्यांच्याकडे प्रवेश फीसाठी पैसे नव्हते.

प्रवेशासाठी लागणारी रक्कम 21 रुपये होती, पण ती गोळा करण्यासाठी त्यांना अनेक कष्टांना सामोरं जावं लागलं होतं. शेवटी त्यांच्या आईनं एका मोलकरणीकडून 21 रुपये उसने घेतले आणि त्यांनी प्रवेश घेतला.

वाचनाची आवड

फक्त गणित आणि विज्ञानच नाही तर त्यांना इतर विषयातल्या वाचनाची प्रचंड आवड होती. पुस्तकं विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसत, पण यामुळे त्यांचा निश्चय कमी झाला नाही. गिरगावात असलेल्या मॅजेस्टिक बुकस्टॉलमध्ये जाऊन ते पुस्तकं उसनी घेत आणि तिथंच वाचून परत करत.

नाटकाचे लेखक-दिग्दर्शक

शाळेत असताना माशेलकरांनी 'सुंठीवाचून खोकला गेला' हे नाटक लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. तसंच त्यांनी यात अभिनय देखील केला होता. हे एक रहस्यमय नाटक होतं असं ते सांगतात.

त्या नाटकाच्या वेळी ते इतके उत्साहित होते की ते त्यांचे संवाद विसरले. ऐनवेळी त्यांनी रंगमंचावरच स्वतःसाठी संवाद लिहिले होते.

पत्रकार व्हायची देखील मिळाली होती संधी

माशेलकर शाळेत असताना एका कार्यक्रमासाठी प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार अनंत काणेकर आले होते. त्यांनी वृत्तांत लेखन कसं करावं याबद्दल विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्या.

"मी जे तुम्हाला शिकवलं आहे, त्याचा वापर करून तुम्ही एक वृत्तांत लिहा." असं काणेकरांनी त्यांना सांगितलं. त्यानुसार माशेलकरांनी वृत्तांत लिहिला. ते वृत्तांत लेखनात पहिले आले. त्यांनी लिहिलेला वृत्तांत काणेकरांना इतका आवडला की, त्यांनी थेट माशेलकरांना नोकरीचा प्रस्ताव दिला.

Image copyright Raghunath Mashelkar
प्रतिमा मथळा तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पद्मविभूषण स्वीकारताना रघुनाथ माशेलकर.

"विविध वृत्तसाठी लेखन करशील का? असं काणेकरांनी मला विचारलं होतं," अशी आठवण माशेलकरांनी बीबीसीला सांगितली.

"शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमचे शिक्षक प्रयत्न करत त्यातूनच आम्ही घडलो," असं ते म्हणाले.

माशेलकर बोर्डाच्या परीक्षेत राज्यात 11 वे आले होते. पण पुढील शिक्षण कसं घ्यायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. शिक्षण सोडण्याचा देखील विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण त्यांच्या आईनं त्यांना धीर दिला. त्याबरोबरच सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप त्यांना मिळाली आणि त्यांनी जय हिंद कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतलं.

Image copyright Twitter/mashelkar
प्रतिमा मथळा रघुनाथ माशेलकर आणि अब्दुल कलाम.

त्यानंतर एका मित्राच्या सल्ल्यावरून मुंबईतल्या इंस्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगला त्यांनी प्रवेश घेतला. केमिस्ट्रीमध्ये त्यांनी पीएचडी देखील मिळवली. त्यांच्या या कार्याकडे पाहून त्यांना लंडनच्या सॅलफोर्ड विद्यापीठाची शिष्यवृती मिळाली.

माशेलकर लंडनमध्ये असताना राष्ट्रीय रसायन शाळेचे (NCL) संचालक डॉ. बी. डी. टिळक यांनी एक निरोप पाठवला. "काउंसिल ऑफ साइंटिफिक अॅंड इंडस्ट्रियल रिसर्चचे (CSIR) महासंचालक डॉ. नायुदम्मा यांना जाऊन भेटा," असं त्यांनी म्हटलं होतं. टिळकांच्या सांगण्यानुसार ते नायुदम्मा यांना जाऊन भेटले. "तुम्ही भारतामध्ये जाऊन विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काम करा," असं त्यांनी माशेलकरांना म्हटलं.

परदेशात इतक्या संधी असताना तुम्हाला भारतात का परतावं वाटलं? असं विचारलं असता ते म्हणाले, "अवघ्या 2100 रुपये पगारावर मी नोकरीवर रूजू झालो. संशोधनाच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर पैशांकडं पाहून चालत नाही. हे व्यापक कार्य आहे. त्यातून आपण जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाचं काम करू शकतो ही भावना महत्त्वाची आहे."

1989 मध्ये त्यांनी राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेच्या संचालकपदाची सूत्रं हाती घेतली. मुलभूत संशोधनाला उद्योजकेतेची सांगड घालून कार्य करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला.

त्यातूनच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांची फळी निर्माण झाली. 1995मध्ये त्यांनी काउंसिल ऑफ साइंटिफिक अॅंड इंडस्ट्रियल रिसर्चची या संस्थेची सूत्रं हाती घेतली. देशात असलेल्या 40 वेगवेगळ्या संशोधन संस्थांना त्यांनी एकत्र आणलं आणि संशोधन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला.

हळदीचं पेटंट परत भारताकडे कसं आणलं?

इतिहासामध्ये हल्दीघाटीची लढाई प्रसिद्ध आहे. पण विज्ञान क्षेत्रात एक वेगळीच 'हल्दीघाटी'ची लढाई प्रसिद्ध आहे. हजारो वर्षांपासून ज्या हळदीचा वापर भारतीय करत आहेत त्या हळदीवर अमेरिकेनं दावा केला होता. हळदीच्या औषधी गुणांच्या शोधाचं पेटंट अमेरिकेनं आपल्या नावावर केलं होतं. त्यांच्या या दाव्याला माशेलकरांनी आव्हान दिलं होतं.

Image copyright INDRANIL MUKHERJEE/getty
प्रतिमा मथळा 14 महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर हळदीचं पेटंट भारताला परत मिळालं.

त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सलग 14 महिने न्यायालयीन लढा द्यावा लागला. हा प्रश्न फक्त हळदीचाच होता असं नाही, तर यामुळं स्वामित्व हक्क कायद्यात मोठे बदल घडले.

या विजयामुळं पेटंट वर्गीकरणाच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली. या न्यायालयीन लढ्यानंतर अनेक माध्यमांनी त्यांचा गौरव 'हल्दीघाटीचा योद्धा' म्हणून केला होता.

गांधीवादी अभियांत्रिकी

विज्ञानाचा उपयोग मानव जातीच्या कल्याणासाठी व्हावा या महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी गांधीवादी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची संकल्पना मांडली. 2008 साली त्यांचा कॅनबेरातल्या ऑस्ट्रेलियन अॅकेडमीतर्फे सन्मान करण्यात येणार होता. त्यावेळी त्यांना भाषण द्यायचे होतं.

या भाषणासाठी त्यांनी 'गांधीवादी अभियांत्रिकी' या विषयावर बोलायचं ठरवलं. त्यांनी गांधीवादाची मांडणी अगदी वेगळ्या पद्धतीनं केली आणि त्यांच्या या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली.

"गांधीजी नेहमी म्हणत असत, निसर्ग सर्वांच्या गरजा भागवण्यास समर्थ आहे, पण तो सर्वांची हाव भागवू शकणार नाही. गांधींजींच्या या विचारातून प्रेरणा घेऊन लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आपण सोडवायला हव्या असं मला वाटलं," असं माशेलकर सांगतात.

दोन वर्षे सातत्यानं यावर चिंतन केल्यावर त्यांनी आणि सी. के. प्रल्हाद यांनी मिळून गांधीवादी अभियांत्रिकीवर एक प्रबंध सादर केला. हा प्रबंध हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये 2010 साली प्रसिद्ध झाला आहे.

"कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल, अशी उत्तम कामगिरी करणं," हे गांधीवादी अभियांत्रिकीचं सार आहे असं ते सांगतात.

पुरस्कार आणि मानसन्मान

2014साली पद्मविभूषण हा सन्मान देऊन भारत सरकारनं त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्याआधी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळाले आहेत.

Image copyright Twitter/mashelkar
प्रतिमा मथळा 38 विद्यापीठांनी माशेलकरांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.

त्यांना 1982मध्ये शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची फेलोशिप त्यांना मिळाली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नेतृत्वासाठी त्यांना जे. आर. डी. टाटा कार्पोरेट लीडरशिप अॅवार्ड (1998) मिळाला आहे. तसंच आतापर्यंत 38 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.

तरुणांना संदेश

"कोणतंही काम केलं तरी त्यात नैपुण्य मिळवा. आपलं काम जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाला कसं येईल याचा विचार करा," असा संदेश ते तरुणांना देतात. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना खूप संधी आहेत असं ते म्हणतात.

Image copyright Twitter/raghunath mashelkar
प्रतिमा मथळा रघुनाथ माशेलकर

"पूर्वीच्या तुलनेत आता तुमच्या हाती खूप सारी साधनसंपत्ती आहे. आधी सायंटिफिक जर्नल आमच्या हाती येईपर्यंत तीन-चार महिने लागत असत, पण आता इ-जर्नलमुळं ते तात्काळ मिळतात," असं ते म्हणतात.

"विदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी जरुर जा. त्यातून तुम्हाला नवे अनुभव मिळतील. जेव्हा तुम्ही भारतात परत याल तेव्हा या नव्या अनुभवांचा फायदा इथल्या लोकानांच होईल," असं ते म्हणतात.

आशावाद

नव्या पिढी विषयी, तरुणांविषयी आणि एकूणच भविष्याविषयी माशेलकर कमालीचे आशावादी आहेत.

"भारतीय तरुणांमध्ये खूप क्षमता आहे, भारत हा देश देखील तरुण आहे. त्यामुळे भारताचं भविष्य उज्ज्वल आहे यात तीळमात्र शंका नाही," असं ते म्हणतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)