कंडक्टर ते सुपरस्टार : रजनीकांत यांच्याबद्दल या 12 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?

रजनीकांत Image copyright AFP

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेशाची घोषणा केली आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली क्रेझ सर्वश्रूत आहे.

2021 ला तामिळनाडू विधानसभा निवडणुका त्यांचा पक्ष लढवणार आहे. पण वेळच सांगेल की लोक त्यांना फक्त अभिनेता म्हणून पाहतात की नेता म्हणूनही स्वीकारतात?

रजनीकांत यांच्याबद्दल 12 महत्त्वाच्या गोष्टी

1. जिजाबाई आणि रामोजीराव यांच्या 4 मुलांतील सर्वात लहान मुलगा म्हणजे शिवाजीराव होय. 12 डिसेंबर 1950ला बेंगलुरूमध्ये शिवाजीराव यांचा जन्म झाला. हेच शिवाजीराव पुढे जाऊन रजनीकांत बनले.

2.रजनीकांत यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर घर चालवणं कठीण होतं. रजनीकांत यांनी घर चालवण्यासाठी हमाली केली. सुपरस्टार बनण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टर होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रजनीकांत आणि नाना पाटेकर

3. रजनीकांत यांचे मित्र राज बहादूर यांनी त्यांचं अभिनेता बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं. बहादूर यांनीच त्यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायला सांगितलं. दोघे आजही मित्र आहेत.

4. बालचंद्र यांचा सिनेमा 'अपूर्वा रागनगाल' हा त्यांचा पहिला तामिळ सिनेमा होय. यात कमल हसन आणि श्रीविद्या यांच्याही भूमिका होत्या.

5. रजनीकांत यांनी अभिनयाची सुरुवात कन्नड नाटकांतून केली. त्यांनी साकारलेली दुर्योधनची भूमिका गाजली होती.

6. सुरुवातीला नकारात्मक भूमिका केल्यानंतर रजनीकांत पहिल्यांदा नायक म्हणून समोर आले ते एस. पी. मुथुरमन यांच्या 'भुवन ओरु केल्विकुरी' या सिनेमातून! या सिनेमानंतर एस. पी. मुथुरमन आणि रजनीकांत यांची जोडी चांगलीच जमली. त्यानंतर दोघांनी एकत्र 25 सिनेमे केले.

Image copyright V CREATIONS

7. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे 'बिल्ला' होय. 1978ला आलेला अमिताभ बच्चन यांचा 'डॉन' हा सिनेमा याच सिनेमाचा रिमेक होता.

8. रजनीकांत यांनी 'मुंदरू मूगम' या सिनेमात तिहेरी भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

9. टी रामा राव यांचा 'अंधा कानून' हा रजनीकांत यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. यात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि रिना रॉय यांच्याही भूमिका होत्या.

Image copyright LYCA PRODUCTIONS

10. 1985ला त्यांनी 100 सिनेमे पूर्ण केले. 'श्री. राघवेंद्र रजनीकांत' हा त्यांचा 100वा सिनेमा होता. त्यात त्यांनी संत राघवेंद्र स्वामी यांची भूमिका केली होती.

11. रजनीकांत यांच्या 'राजा चायना रोजा' या सिनेमात प्रथमच अॅनिमेशनचा वापर करण्यात आला होता.

12. रजनीकांत यांनी तामिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलुगू सिनेमांसोबतच 'भाग्य देबता' या बंगाली सिनेमातही भूमिका साकारली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)