रणजी करंडक : या 10 गोष्टींमुळे केला विदर्भाच्या 'पोट्ट्यां'नी 'माहोल'

रणजी करंडक, विदर्भ, क्रीडा, क्रिकेट, महाराष्ट्र. Image copyright Twitter/BCCI
प्रतिमा मथळा रणजी करंडक विजेता विदर्भ संघ.

सातत्य, जिद्द आणि अफलातून प्रदर्शनाच्या बळावर विदर्भवीरांनी रणजी करंडकाच्या जेतेपदाला गवसणी घातली. यंदा पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारण्याचा विक्रम करणाऱ्या विदर्भानं दिल्लीसारख्या ताकदवान संघाला चीतपट करत जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. स्थानिक क्रिकेटमधल्या प्रतिष्ठेच्या रणजी जेतेपदापर्यंतचा विदर्भाचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. काय आहेत विदर्भाच्या विक्रमी जेतेपदाची वैशिष्ट्यं.

1 कोचची कमाल

प्रशिक्षकपदाचा प्रचंड अनुभव असणारे चंद्रकांत उर्फ चंदू पंडित यांची भूमिका विदर्भाच्या विजयात निर्णायक आहे. खेळाडूंची प्रतिभा हेरून त्याला पैलू पाडणं ही पंडित यांची हातोटी आहे.

रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत पाचवेळा खेळाडू म्हणून तर सहा वेळा प्रशिक्षक म्हणून सहभागी होण्याचा मान पंडित यांच्या नावावर आहे.

खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून दमदार प्रदर्शन करवून घेण्यात पंडित माहीर आहेत. हंगामाच्या सुरुवातीपासून आपण जेतेपद पटकावू शकतो हा विश्वास पंडित यांना होता.

Image copyright Twitter/BCCI

दडपणाच्या क्षणी कामगिरी उंचावण्याचं तंत्र पंडित यांनी खेळाडूंकडून घोटून घेतलं. मुंबईच्या प्रशिक्षकपदापासून बाजूला व्हावं लागलेल्या पंडित यांनी कृतीतून टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

2 आधारस्तंभ जाफर

रणजी क्रिकेट स्पर्धेत दहा हजार धावा पटकावण्याचा मान वसिम जाफरच्या नावावर आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या जाफरचा अनुभव विदर्भासाठी मोलाचा ठरला. रणजी स्पर्धांची विक्रमी जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबई संघाचा जाफर अविभाज्य घटक होता.

Image copyright Deshakalyan chowdhury/ getty images
प्रतिमा मथळा वसीम जाफरचा अनुभव विदर्भासाठी मोलाचा ठरला.

मुंबईऐवजी विदर्भासारख्या अनुनभवी संघाकडून खेळण्याचा जाफरचा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता. मात्र 39 वर्षीय जाफरने विदर्भासाठी मुख्य फलंदाज आणि युवा फलंदाजांसाठी मेंटर म्हणून दुहेरी जबाबदारी सांभाळली.

तरुण खेळाडूंना त्यांच्या खेळातील तांत्रिक उणीवा दूर करण्याच्या बरोबरीनं एक मित्र म्हणून जाफरचा अनुभव उपयुक्त ठरला.

3 फैझ फझलचं यशस्वी नेतृत्व

स्थानिक क्रिकेटचा पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या फैझनं युवा आणि अनुभवी खेळाडूंचं मिश्रण असलेल्या संघाची मोट बांधली.

सहकाऱ्यांच्या भावन समजून घेत, त्यांना योग्यवेळी मार्गदर्शन करतानाच फैझनं स्वत:च्या खेळातून संघासमोर आदर्श ठेवला.

Image copyright facebook/faiz fazal
प्रतिमा मथळा फैझ फझलचं नेतृत्त्व विदर्भासाठी निर्णायक ठरलं.

कर्णधारपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर असताना फैझनं यंदाच्या रणजी हंगामात 912 धावा केल्या.

यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत फैझ दुसऱ्या स्थानी आहे. यावरून विदर्भाच्या विजयातलं फैझचं योगदान लक्षात यावं.

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चतुराईनं केलेले बदल फैझच्या नेतृत्व कौशल्याचं गुणवैशिष्ट्य आहे. घरातल्या कर्त्या व्यक्तीप्रमाणे फैझनं संघाची धुरा चोख सांभाळली.

4 रजनीशच्या गोलंदाजीचं इंजिनियरिंग

इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या रजनीश गुरबानीला त्याच्या शिक्षणाच्या बळावर नोकरी किंवा व्यवसाय करता आला असता.

पण, इंजिनियरिंगच्या अवघड शिक्षणादरम्यानही रजनीशनं क्रिकेटचं वेड जपलं. अजित आगरकरसारखी शरीरयष्टी असणाऱ्या रजनीशनं अभ्यास आणि खेळ हे समीकरण समर्थपणे पेललं.

Image copyright facebook/rajneesh gurbani
प्रतिमा मथळा रजनीश गुरबानी गौतम गंभीरसह.

यंदाच्या हंगामात रजनीशनं सहा सामन्यात 39 विकेट्स पटकावत विदर्भाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

उपांत्य फेरीच्या बलाढ्य कर्नाटकविरुद्धच्या लढतीत रजनीशनं 12 विकेट्स घेत सामन्याचं पारडं फिरवलं. दडपणाच्या अंतिम लढतीत विक्रमी हॅट्ट्रिक नोंदवत रजनीशनं विदर्भाच्या विजयाचा पाया रचला.

5 प्रोफेशनल खेळाडूंची कमाल

अनेक मोठे खेळाडू व्यावसायिक खेळाडू म्हणून छोट्या संघांसाठी खेळतात. या खेळाडूंच्या आगमनामुळे छोट्या संघांना बळकटी मिळते. दबावाच्या प्रसंगी अनुभव कामी येतो. विदर्भ संघाच्या व्यवस्थापनाने ही गोष्ट हेरली.

कर्नाटकचा गणेश सतीश आणि रेल्वेचा करण शर्मा विदर्भाच्या ताफ्यात दाखल झाले आणि संघाची ताकद वाढली.

स्थानिक क्रिकेटचा प्रचंड अनुभव असलेल्या करण शर्मानं मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवत संघाला विजयपथावर नेलं.

कर्नाटकविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातली गणेश सतीशची 81 धावांची खेळी निर्णायक ठरली. आधीच्या हंगामांमध्ये सुब्रमण्यम बद्रीनाथनं विदर्भाच्या फलंदाजीला आवश्यक बैठक मिळवून दिली होती.

6 जबाबदारीचं भान

विदर्भाच्या प्रत्येक खेळाडूनं आपापली जबाबदारी ओळखून खेळ केला. यंदाच्या हंगामात अक्षय वाडकर संघाचा नियमित विकेटकीपर नव्हता.

अंतिम लढतीत अक्षयला संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं. शिस्तबद्ध विकेटकीपिंगच्या बरोबरीनं अक्षयनं 133 धावांची मॅरेथॉन खेळी साकारत दिल्लीच्या गोलंदाजांना नामोहरम केलं.

सिद्धेश नेरळसह शतकी भागीदारी साकारत अक्षयनं दिल्लीपासून विजय हिरावून घेतला.

Image copyright Instagram/faiz fazal
प्रतिमा मथळा करण शर्मा, शलभ श्रीवास्तव, फैझ फझल आणि अक्षय वाखरे.

अष्टपैलू आदित्य सरवटेनं आपल्या अष्टपैलू खेळानं अडचणीत सापडलेल्या संघाला सावरलं. अंतिम लढतीतली आदित्यची 79 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग असल्यानं उमेश यादव अंतिम लढतीत खेळू शकला नाही.

उमेशऐवजी 19वर्षीय आदित्य ठाकरेची निवड झाली. पहिल्या लढतीचं दडपण न घेता आदित्यने विकेट्सच्या बरोबरीने धावांना वेसण घातली.

7 विजयी सातत्य

विजयी संघांच्या वाटचालीची ओळख 'सातत्य' या निकषानं होते. विदर्भानं एकीच्या बळावर अख्ख्या हंगामात अद्भुत सातत्य जपलं.

ऑक्टोबर ते जानेवारी अशा मोठ्या हंगामात आव्हानात्मक खेळपट्ट्या, अव्वल संघ अशा दोन्ही गोष्टींचा सामना करत जिंकण्याची सवय अंगी बाणवली.

नऊपैकी सात लढतीत विजय मिळवत आणि दोन लढती अनिर्णित राखत विदर्भानं जेतेपदाला गवसणी घालताना हंगामात अपराजित राहण्याचा मानही पटकावला.

8 विश्वास

रणजी स्पर्धेचं आयोजन 1934 पासून होतं आहे. विदर्भाचा संघ 1957 पासून रणजी स्पर्धेत सहभागी होतो आहे.

मात्र 60 हंगाम जेतेपदाविना राहिल्यानंतरही विदर्भाने जिद्द सोडली नाही. महाराष्ट्रातले तीन संघ (मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ) रणजी स्पर्धेत खेळतात.

या स्पर्धेची तब्बल 41 जेतेपदं मुंबईकडे आहेत तर महाराष्ट्रानं दोनदा जेतेपदाला गवसणी घातली.

या दोन संघांच्या तुलनेत विदर्भाचा संघ पिछाडीवरच राहिला. गुणवान खेळाडू असूनही विदर्भाचा रणजी स्पर्धेतला प्रवास अधुरा राहत असे.

2014 पर्यंत रणजी स्पर्धा फॉरमॅट एलिट आणि प्लेट अशा पद्धतीनं होत असे. अव्वल संघ एलिट गटात असत.

विदर्भाचा संघ प्लेट गटात असे. प्लेट गटात असल्यानं अव्वल संघांविरुद्ध खेळण्याच्या संधी मर्यादित राहत असत. पण तीन वर्षांपूर्वी ही संरचना बदलल्यानंतर विदर्भानं जिद्दीनं खेळ करत जेतेपद प्रत्यक्षात साकारलं.

9 विदर्भ क्रिकेट अकादमीची भूमिका

2009 मध्ये सुरू झालेल्या विदर्भ क्रिकेट अकादमीचा या जेतेपदात महत्त्वाचा वाटा आहे. प्रतिभेला योग्य दिशा मिळवून देण्याचं काम या अकादमीनं केलं आहे.

रणजीविजेत्या विदर्भाच्या संघातील अनेक खेळाडू या अकादमीतूनच पुढे आले आहेत.

विदर्भ क्रिकेट संघटनेचा उपक्रम असलेल्या या अकादमीमुळे वयोगट स्पर्धांसाठी विदर्भाचा तगडा संघ खेळू लागला. 23, 19, 17 वर्षांखालील गटात विदर्भासाठी शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची फौज रणजी संघासाठी दमदार कुमक ठरली.

10 ग्रामीण प्रतिभा

विदर्भातल्या अनेक छोट्या गावातल्या खेळाडूंनी या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे.शहरांमध्ये प्रशिक्षणाच्या संधी मुबलक प्रमाणावर उपलब्ध असतात.

गावांमध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं पण शास्त्रोक्त आणि सर्वसमावेशक प्रशिक्षणाच्या संधी दुर्मीळच.

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अनेकांनी क्रिकेटची आवड जोपासली. तालुका-जिल्हा पातळीवर कार्यरत असंख्य प्रशिक्षक तसंच क्लब्स, जिमखाने यांचं विदर्भाच्या विजयात मोलाचं योगदान आहे.


अंतिम लढत

दिल्ली 295 (ध्रुव शोरे 145; रजनीश गुरबानी 6/59)

विदर्भ 547 (अक्षय वाडकर 133; नवदीप सैनी 5/103)

दिल्ली 280 (नितीश राणा 64; अक्षय वाखरे 4/ 95)

विदर्भ 1 बाद 32 (वसीम जाफर 17; कुलवंत खेजरोलिया 1/21)

सामनावीर- रजनीश गुरबानी


विदर्भ संघाचा जेतेपदापर्यंतचा प्रवास

विरुद्ध ठिकाण निकाल
पंजाब मोहाली एक डाव आणि 117 धावांनी विजयी
छतीसगढ नागपूर अनिर्णित
सर्व्हिसेस नागपूर 192 धावांनी विजयी
बंगाल कल्याणी 10 विकेट्सनी विजयी
गोवा पोरव्होरिम एक डाव आणि 37 धावांनी विजयी
हिमाचल प्रदेश नागपूर अनिर्णित
केरळ सूरत 412 धावांनी विजयी
कर्नाटक कोलकाता 5 धावांनी विजयी
दिल्ली इंदूर 9 विकेट्सनी विजयी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)