प्रेस रिव्ह्यूः तिहेरी तलाकबंदी विधेयक आज राज्यसभेत

मुस्लीम महिला Image copyright Getty Images

तिहेरी तलाकबंदी विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. हे विधेयक सुधारणांशिवाय मंजूर करण्याची भाजपला घाई आहे. तर विधेयक समितीकडे पाठवण्याचा आग्रह विरोधकांकडून होण्याची शक्यता , अशी बातमी लोकमतनं दिली आहे.

'लोकमत'नं दिलेल्या वृत्तानुसार, तिहेरी तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारं आणि अशा तलाक पद्धतीवर बंदी घालणारं विधेयक केंद्र सरकार बुधवारी राज्यसभेमध्ये मांडणार आहे.

या विधेयकासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या सूचनांकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं आहे. मुस्लीम महिलांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत विलंब व्हावा असं काही लोकांचे प्रयत्न सुरू असले तरी ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे.

राज्यसभेमध्ये सध्या विरोधी पक्षांचं बहुमत आहे. हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर व्हावं, असाच केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. तर या विधेयकातील काही तरतुदींच्या पुनर्विचारासाठी ते चिकित्सा समितीकडे पाठवावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविले गेल्यास ती आपला अहवाल फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देईल. मात्र हे विधेयक इतक्या लांबणीवर टाकण्याची भाजपाची आणि केंद्र सरकारची तयारी नाही.

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून 6 जणांची हत्या

मानसिक संतुलन बिघडलेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यानं सोमवारी मध्यरात्री लोखंडी सळीनं मारहाण करून सहा जणांचा जीव घेतल्याची घटना हरयाणातील पलवल येथे घडली. नरेश धनकड असं या ४५ वर्षीय अधिकाऱ्याचं नाव असून त्यानं पोलिसांवरही हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीनुसार, नरेश हा वल्लभगडजवळील मच्छगर येथील रहिवासी आहे. लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर तो कृषी विभागामध्ये कार्यरत होता. सोमवारी मध्यरात्री २ ते ४ दरम्यान, आग्रा चौक ते कँप कॉलनीदरम्यान त्याने सहा जणांचा जीव घेतला. प्रथम त्याने एका खासगी रुग्णालयाबाहेर झोपलेल्या अंजूम नावाच्या महिलेला मारलं. त्यानंतर त्यानं आग्रा रोडवरील तिघांना आणि त्यापासून थोड्या अंतरावर दोघांना मारलं.

पोलिसांना पहाटे या घटनेची माहिती मिळताच त्यांनी नरेशला पकडण्याचे प्रयत्न केले. त्या वेळी त्याने पोलिसांवरही हल्ला केल्याची माहिती पलवलच्या पोलिस अधीक्षक सुलोचना कुमारी यांनी दिली.

'ताज'च्या पर्यटकसंख्येवर मर्यादा

आठवड्याच्या अखेरीस किंवा सुटीच्या दिवशी ताज महाल पाहण्यासाठी होणाऱ्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दर दिवशी 40000 पर्यटकांनाच ताज पाहू देण्याचा प्रस्ताव असून तो या आठवड्यापासून लागू केला जाण्याची शक्यता आहे.

Image copyright Getty Images

यासंदर्भातले वृ्त्त 'इंडियन एक्सप्रेस'नं दिले आहे. गर्दीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आर्कियालॉजीकल सोसायटी ऑफ इंडियानं दिलेल्या प्रस्तावावर केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयानं विचार केला आहे. ताज महाल पाहण्याचा आनंद सगळ्यांना घेता यावा आणि तिथं कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून हा निर्णय घेत आहोत, असं केंद्रिय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी स्पष्ट केलं.

ताज पाहण्यास आत गेलेल्या पर्यटकाला तीन तासांचा अवधी देण्यात येणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)