भीमा कोरेगाव: दलितांना इतिहासातल्या आदर्शांचा शोध

भीमा कोरेगाव, दलित, पेशवाई, ब्राह्मण, ब्रिटिशराज्य Image copyright Mayuresh Konnur/BBC
प्रतिमा मथळा जाळपोळीच्या घटनेत गाडीचं झालेले नुकसान

मुंबई-पुणेसह राज्यात हिंसक घटनांची नोंद झाली आहे. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दलित समाजाच्या रॅलीनंतर घडामोडींना हिंसक वळण लागलं. या निमित्तानं दलित अस्मितेच्या महत्वाकांक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरवर्षी हजारो दलित बांधव भीमा कोरेगावला भेट देतात. 1817 मध्ये ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये जोरदार लढाई झाली होती. या लढाईत दलित समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे सैनिक ब्रिटिश सैन्याचा भाग होते. या युद्धात जीव गमावलेल्या बांधवांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दलित समाजाचे हजारो प्रतिनिधी भीमा कोरेगावला भेट देतात.

दलित समाजात महार या जातीचाही समावेश होतो. महार जातीची अनेक माणसं ब्रिटिश सैन्याचा भाग होती. महार समाज आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.

दोनशे वर्षांपूर्वीच्या या लढतीत जीव गमावलेल्या महार समाजातील व्यक्तींना अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1927 मध्ये स्वत: भीमा कोरेगाव येथे आले होते. यंदा या लढाईला दोनशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Image copyright Hulton archive
प्रतिमा मथळा ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईला यंदा दोनशे वर्ष पूर्ण झाली.

हिंदुत्ववादी कार्यकत्यांनी (समस्त हिंदू आघाडी, ऑल हिंदू फ्रंट) हिंसेला खतपाणी घातलं आणि यातूनच एका व्यक्तीची हत्या झाली. असंख्य वाहनं जाळण्यात आली. त्याचवेळी गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी पुण्यातील शनिवारवाडा येथे बोलताना आधुनिक पेशव्यांविरुद्ध म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात बंड पुकारण्याचं आवाहन केलं. शनिवारवाडा ही पेशव्यांचं निवासस्थान होतं.

भीमा कोरेगावच्या युद्धाची खरी कहाणी आज प्रचलित असणारे अनेक गैरसमज मोडीत काढते. ब्रिटिशांना भारतातल्या साम्राज्याचा विस्तार करायचा होता, तर पेशवांना आपल्या स्वराज्याचं संरक्षण करायचं होतं.

मनुष्यबळ हवं होतं

ब्रिटिशांना सातत्यानं कुमक मिळणं आवश्यक होतं. हे मनुष्यबळ त्यांना दलित समाजातून मिळालं. दलित समाजाचा भाग असलेले महार, पारायस आणि नामशूद्र अशा जातींची माणसं ब्रिटिश सैन्यात सामील झाली. कामाप्रतीच्या निष्ठेत ही मंडळी अव्वल होती आणि असं निष्ठावान मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं. म्हणून ब्रिटिशांनी त्यांना आपल्या ताफ्यात दाखल केलं. दुसरीकडे पेशव्यांच्या ताफ्यात अरब सैनिकांचा समावेश होता. यामुळे ही लढाई म्हणजे 'हिंदू विरुद्ध मुस्लिम' हे मिथक निकाली निघालं.

इब्राहिम खान लोधी हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. तर अरब सैनिक बाजीराव पेशवांच्या लष्करात होते. दुर्देवानं, इतिहासातल्या या निर्णायक लढाईकडे आपण जातीपातींच्या चष्म्यातून बघतो. मोठी साम्राज्यं प्रचंड पैसा आणि सामर्थ्याच्या बळावर निर्माण होतात.

परंपरा का मोडली?

थोड्या कालावधीनंतर ब्रिटिशांनी आपल्या सैन्यात दलित/महारांना सामील करणं थांबवलं. उच्चवर्णीय समाज मात्र सैन्यात कनिष्ठ पदांवर कार्यरत होता. हे कर्मचारी सामाजिकदृष्ट्या अस्पृश्य पण सैन्यात वरिष्ठ पदावर कार्यरत दलित अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करत नसत. हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी महार आणि पर्यायानं दलितांना सैन्यात सामील करण्याची परंपरा मोडीत काढली.

ही पद्धत पुन्हा रुजावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. याचाच भाग म्हणून त्यांनी महार रेजिमेंटची संकल्पना मांडली. सामाजिक रचनेत दलितांना स्थान मिळावं यासाठी आंबेडकरांनी महार सैनिकांच्या प्रश्नाला वाचा फोडली.

भीमा कोरेगाव लढाई म्हणजे पेशवाई उलथवून टाकण्यासाठी दलितांनी केलेलं बंड असं म्हणता येईल का?

पेशवाई प्रशासनाचं धोरण ब्राह्मणी वळणाचं होतं यात शंकाच नाही.

शूद्र अर्थात चातुवर्ण्य व्यवस्थेत सगळ्यात शेवटच्या स्थानी असणाऱ्या समाजाला वावरताना मानेभोवती एक भांडं बाळगावं लागे. त्यांच्यामुळे हवा प्रदूषित होऊ नये असं कारण देण्यात येत असे.

शूद्रांना कमरेभोवती एक झाडूही गुंडाळावा लागे. शूद्र ज्या जागी चालतात ती जागा अपवित्र होऊ नये म्हणून जमीन साफ करण्यासाठी झाडू असा या प्रथेमागचा विचार होता. अशा प्रथा कर्मठ जातीव्यवस्थेचं पराकोटीची अवस्था सिद्ध करतात.

Image copyright Samruddha Bhambure/BBC
प्रतिमा मथळा मुंबईत बुधवारी झालेला रेलरोको

ब्राह्मण समाजातील कर्मठतेचं निर्मलून करण्यासाठी ब्रिटिशांनी बाजीरावांविरुद्ध लढा दिला का? तसं अजिबात घडलेलं नाही. व्यापारवृद्धी आणि लूट करण्याच्या उद्देशानं साम्राज्य वाढवणं हे ब्रिटिशांचं एकमेव उद्दिष्ट होतं.

त्याचबरोबरीनं महार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक ब्रिटिशांकडे आपली धनी म्हणून पाहत असत. धन्यासाठी निष्ठावान राहणं हे त्यांचं कर्तव्य होतं. या भावनेतून ते शंभर टक्के योगदान देत होते.

शिक्षणाचा प्रसार

या लढाईनंतर शिक्षणाचा प्रसार होऊ लागला आणि सामाजिक बदलाची नांदी झाली. अवाढव्य पसरलेल्या ब्रिटिश साम्राज्याचं प्रशासन चालवण्यासाठी सुशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता होती. या हेतूने आधुनिक शिक्षणाची रुजवात करण्यात आली. ब्रिटिशांनी भारताला यथेच्छ लुटलं.

या लुटण्याच्या प्रक्रियेदरम्यानच सामाजिक सुधारणांची बीजं रोवली गेली. ब्रिटिशांच्या धोरणाचा तत्कालीन भारतीयांच्या सामाजिक रचनेवर होणारा परिणामांमध्ये त्यांची भूमिका नाममात्र असे.

बदलती सामाजिक समीकरणं लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांच्यासारख्या समाजसुधारकांनी नवा पायंडा पाडला.

पेशव्यांची लढाई राष्ट्रवादासाठी होती आणि दलित सैनिक ब्रिटिशांसाठी लढत होते हा विचार तथ्यहीन आहे.

राष्ट्रवादाची संकल्पना ब्रिटिश भारतावर राज्य करत असतानाच उदयास आली. राष्ट्रवादाचेही दोन विचारप्रवाह आहेत. कारखानदार, उद्योजक, समाजातील सुशिक्षित वर्ग तसंच श्रमिक कामगार यांच्या विचारातून तयार झालेला भारतीय राष्ट्रवाद. धर्माच्या नावावरचा राष्ट्रवाद हा संस्थानांचे सर्वेसर्वा आणि धनाढ्य जमीनदार यांच्या माध्यमातून निर्माण झाला.

सध्या दलित समाजात निर्माण झालेला असंतोष वाढतो आहे. याचं कारण सध्याच्या सरकारनं घेतलेले निर्णय. रोहित वेमुलासारख्या विद्यार्थ्याची झालेली हत्या तसंच उनामध्ये झालेलं नृशंस हत्याकांड यामुळे दलितांमध्ये अस्वस्थता बळावते आहे.

कोरेगावमध्ये दोनशे वर्षापूर्वीच्या लढाईत जीव गमावलेल्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेली लाखोंची गर्दी या असंतोषाचं प्रतीक आहे.

दलितांना इतिहासातल्या योद्धांकडून प्रेरणा घ्यायची आहे. दलितांवर होणारे अत्याचार म्हणजे त्यांच्या महत्वाकांक्षेला चिरडून टाकण्याचा प्रयत्न आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)