मुंबईच्या छात्र भारतीच्या सभेला परवानगी का नाकारली?

JUHU Image copyright Prashant Nanavare
प्रतिमा मथळा छात्र भारतीच्या मुलांची जुहू पोलीस स्टेशनच्या आवारात निदर्शनं केली.

मुंबईच्या भाईदास सभागृहात गुरुवारी आयोजित छात्र भारतीच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली. गुजरातचे दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी उमर खालिद या सभेत भाषण करणार होते.

सकाळी या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलिसांनी भाईदास हॉल येथे कार्यक्रमासाठी आलेल्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस व्हँनमध्ये भरून विलेपार्ले रेल्वे स्टेशनला सोडलं.

जुहू पोलिस स्टेशनमध्ये सुमारे 200 तरुण-तरुणी पोलीस स्टेशनच्या आवारात जमिनीवर बसून गाणी गात होती. या आंदोलकांना व्हॅनमध्ये भरून पोलिसांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात नेलं आणि दुपारी उशीरा सर्वांना सोडून देण्यात आलं.

छात्रभारती कार्यकर्ता अनुप संखे यांनी बीबीसीला सांगितलं, "आजच्या कार्यक्रमाला तीन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी परवानगी दिली होती. परंतु कालच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज परवानगी नाकारण्यात आली."

पोलिसांनी भाईदास हॉल येथून 125 विद्यार्थ्यांना गाडीत भरून विलेपार्ले रेल्वे स्टेशनला सोडलं. तिथून विद्यार्थी ठिकठिकाणी निघून गेले.

प्रतिमा मथळा परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप

राष्ट्रीय छात्र संमेलनात बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या अलाहाबादच्या रिचा सिंग आणि हरयाणाचे प्रदीप नरवाल या विद्यार्थी नेत्यांनादेखील सांताक्रूज पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र दुपारी उशीरा त्यांनादेखील सोडून देण्यात आलं.

Image copyright Prashat Nanavare/BBC

पुण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर 31 डिसेंबर रोजी पुण्यात शनिवारवाडा इथं केलेल्या भाषणात तेढ निर्माण करणारे विधान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात अक्षय बिक्कड यांनी केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Image copyright Prashant Nanavare/ BBC

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात शनिवारवाडा इथं 31 डिसेंबर रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यात केलेल्या भाषणात या दोघांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ आणि द्वेषाची भावना निर्माण झाली, अशी तक्रार करण्यात आली होती.

या विधानांमुळे अज्ञात व्यक्तींनी भीमा-कोरेगाव विजयस्तंभ परिसरात दगडफेक आणि जाळपोळ केली, असं तक्रारीत म्हटलं होतं. त्यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)