बिटकॉईन सारख्या क्रिप्टो करन्सीचा भारतीय अवतार शक्य आहे?

  • ऋजुता लुकतुके
  • बीबीसी मराठी
currency, bitcoin

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारतात बिटकॉईन तयार झाले तर...

भारतात बिटकॉईन सारख्या क्रिप्टो करन्सीवर आरबीआयनं घातलेली बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली आहे.

बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीनं सध्या आर्थिक विश्व आणि एकूणच जग ढवळून काढलंय. काही ठिकाणी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून करोडपती झालेल्या यशोगाथा आहेत, तर काहींनी आपली बँकेतली मुदतठेव मोडून बिटकॉईनमध्ये नव्यानं गुंतवणूक केली.

पण याच सुमारास आणखी एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं. बिटकॉईनसारखीच एखादी क्रिप्टोकरन्सी भारतातच विकसित केली तर?

किंबहुना तशी ती विकसित व्हावी अशी मागणी एका म्युच्युअल फंड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी खुलेआम एका परिषदेत केली. वाढत्या मागणीमुळे रिझर्व्ह बँकेलाही तसा विचार करणं भाग पडलं आहे.

इंडिकॉईनची कल्पना

अधिकाधिक भारतीय लोक बिटकॉईन किंवा त्या सदृश इतर क्रिप्टोकरन्सीकडे आकर्षित होत आहेत. भारतात बिटकॉईनमध्ये व्यवहार करणारे 12 एक्सचेंज स्थापन झाले आहेत. पण एरवी हे व्यवहार परकीय चलनात करावे लागत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे भारतीय क्रिप्टोकरन्सी असेल तर गुंतवणूकदारांना हक्काचं व्यासपीठ मिळेल, हे पहिलं कारण भारतीय क्रिप्टोकरन्सीसाठी दिलं गेलं आहे.

शिवाय क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार ज्या तंत्रज्ञानाच्या आधारे होतात ते ब्लॉकचेन सारखं तंत्रज्ञान भारतातल्या भारतात विकसित करणं सोपं आहे, हा दुसरा युक्तिवाद.

आपल्याकडे 40 कोटीच्या वर लोक संगणक वापरतात. इंटरनेट आता सर्वत्र उपलब्ध आहे. आणि भारत देश माहिती तंत्रज्ञांची खाण समजला जातो. मग अशावेळी इंडीकॉईन विकसित करणं कठीण आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

याविषयी आम्ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ आणि सिंगापूरमधल्या ब्लॉकचेन टेक्नोलॉजीचे उपाध्यक्ष समीर धारप यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेली माहिती उत्साह वाढवणारी आहे.

ब्लॉकचेन प्रणालीवर सध्या भारतात संशोधन होत आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान

क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरलं जातं. ब्लॉकचेन एक अशी ऑनलाईन व्यवस्था आहे जिथे ऑनलाईन व्यवहार करता येतात. ही कुठलीही आर्थिक सेवा नसून फक्त एक आर्थिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. पण ऑनलाईन व्यवहारांसाठी ते सगळ्यांत सुरक्षित मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ब्लॉकचेन तंत्रज्ञानात सुधारणा हवी.

शिवाय त्यामध्ये गुप्तता आहे. आणि व्यवहार फक्त दोन व्यक्ती किंवा संगणकांदरम्यान होतो. त्यामुळे त्यावर इतर कुणाचं नियंत्रण नसतं. म्हणूनच ब्लॉकचेन व्यवहार डेमोक्रॅटिक किंवा मुक्त मानले जातात.

"भारताची क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याचा विचार जोर धरू लागला आहे. फक्त त्यासाठी आपल्याला डिजिटल करन्सी आणि क्रिप्टोकरन्सी यांच्यातला फरक निश्चित करावा लागेल. डिजिटल करन्सीत स्थिरता असते, क्रिप्टोकरन्सीची वेगळी धोरणं ठरवावी लागतील," असं समीर धारप यांनी स्पष्ट केलं.

क्रिप्टोकरन्सीला खरेदी-विक्रीसाठी मान्यता कमी आहे. कारण व्यवहारासाठी लागणारा 10 ते 15 मिनिटांचा वेळ, हॅकिंगचा धोका, व्यवहार सुरक्षित असले तरी ते पूर्ण झाल्यानंतर नेटवर्कमधल्या सगळ्यांना त्याचा तपशील कळणं या गोष्टी ब्लॉकचेन तंत्रज्ञानातल्या त्रुटी आहेत.

"त्या कमी करण्यावर भारतातच काम सुरू आहे," धारप यांनी माहिती दिली. शिवाय ब्लॉकचेन यंत्रणा मुक्त असल्यानं त्यावर कुणाचंही नियंत्रण कसं काय शक्य आहे, असंही त्यांना वाटतं.

नियंत्रणाशिवाय क्रिप्टोकरन्सी शक्य?

भारतीय क्रिप्टोकरन्सीसाठी इतकं सकारात्मक वातावरण तयार झालेलं असताना खरंच अशी क्रिप्टोकरन्सी सुरू होईल का?

"करन्सी सुरू करणं सोपं आहे. पण ती सांभाळणं किंवा साचेबद्ध रूप देणं कठीण आहे. क्रिप्टोकरन्सी सुरू करण्यापूर्वी तिचं नियमन, व्यवहारांवर लागणारा कर याचा आराखडा तयार असणं महत्त्वाचं आहे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणता येईल का?

आयटी विश्लेषक आणि क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्किंग या पुस्तकाचे लेखक अतुल कहाते यांनी बीबीसीला याविषयी अधिक माहिती दिली, शिवाय त्यांनी अशा करन्सीचे धोकेही मांडले.

"यात परतावा निश्चित नसतो. ट्रेडिंग करणार असाल तर किंमत सतत वर-खाली होणार. करन्सीचा दर पुढे किती आणि कसा वाढणार याविषयी शाश्वती नाही. अशावेळी गुंतवणूकदारांचं हित बघणारी एखादी यंत्रणा हवीच," असं कहाते म्हणाले.

शिवाय करन्सीतले व्यवहार मुक्त म्हणायचे तर बिटकॉईनचंच एक उदाहरण त्यांनी दिलं. " एकूण बिटकॉईनपैकी शंभर लोकांकडे 40% बिटकॉईन आहेत. मग सगळ्यांना समान संधी, हा न्याय गेला कुठे?"

क्रिप्टोकरन्सीच्या अचानक झालेल्या वाढीमागे काही काळंबेरं असल्याची शंका जाणकारांनी व्यक्त केली आहे. सायबर हॅकिंगच्या माध्यमातून आणि रॅनसमवेअरमधून मिळवलेले पैसे लोकांनी बिटकॉईनमध्ये गुंतवले, अशी एक शंका व्यक्त केली जाते.

त्याचाच आधार घेऊन कहाते यांनीही शंका उपस्थित केली आहे. "भारतातही काळा पैसा गुंतवण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा आधार घेतला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड वापरणं अनिवार्य करण्याची गरज आहे. त्यासाठीच नियंत्रण महत्त्वाचं आहे," असं कहाते यांचं म्हणणं आहे.

भारतीय क्रिप्टोकरन्सीची आव्हानं

क्रिप्टोकरन्सीची मागणी तर होत आहेच, पण आव्हानंही भरपूर आहेत. या करन्सीचं नियमन आवश्यक असल्याचं अर्थविश्लेषक अजित जोशी यांनीही मान्य केलं.

पण त्याचबरोबर क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरचा विश्वासही व्यक्त केला.

फोटो स्रोत, Getty Images

"क्रिप्टोकरन्सीचा वापर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. शिवाय ब्लॉकचेन प्रणालीही सुरक्षित आहे. अशावेळी आर्थिक व्यवहारांसाठी या दोन्ही गोष्टी भविष्यात महत्त्वाच्या ठरणार आहेत. तिकडे कानाडोळा करून चालणार नाही."

"आता क्रिप्टोकरन्सीकडे फक्त चलन म्हणून बघणार म्हणजेच ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी त्याचा वापर करणार की नफा कमावण्यासाठी ट्रेडिंग करणार," असा प्रश्न अजित जोशी उपस्थित करतात.

आणखी एक मुद्दा त्यांनी मांडला. तो म्हणजे, मुक्त वापर हा क्रिप्टोकरन्सीचा गाभा असल्यामुळे देशात एकमेव केंद्रीय करन्सी उभी राहू शकत नाही.

ज्याला कुणाला भारतात क्रिप्टोकरन्सी सुरू करायची असेल त्यांना ती करता आली पाहिजे. म्हणजे करन्सी एक असणार नाही, पण नियामक यंत्रणा एक असू शकते जी सगळ्यांवर अंकुश ठेवेल.

कसे असावे भारतीय क्रिप्टोकॉईन?

शेवटी डिजिटल असलं तरी क्रिप्टोकरन्सी हे एक चलन आहे. आतापर्यंत आपल्याकडच्या नोटा आपली केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक सांभाळत आली आहे. आताही क्रिप्टोकरन्सीवर अंकुश आणणं हे त्यांचंच काम आहे.

केंद्रीय बँकेत त्यावर जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. वेळोवेळी रिझर्व्ह बँकेनं गुंतवणूकदारांना इशाराही दिला आहे. पण आपलं याबाबतच धोरण मात्र त्यांनी उघड केलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारतीय क्रिप्टोकरन्सी विषयी भारतीय धोरण सुस्पष्ट पाहिजे.

अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजीत फडणीस यांनी त्याविषयी बोलताना सांगितलं की, इतर देशातल्या घडामोडींवर नजर ठेवून आस्ते कदम चालण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.

चलन म्हणून क्रिप्टोकरन्सी किती परिणामकारक होऊ शकेल?

डॉ. फडणीस यांचं मत स्पष्ट आहे, "ऑनलाईन व्यवहार पारदर्शक असतात. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापराला आडकाठी असण्याचं कारण नाही. पण ट्रेडिंग होणार असेल तर सावध राहण्याची गरज आहे."

शिवाय क्रिप्टोकरन्सी जर खरंच चलन असेल तर त्यासाठी त्याचा दर स्थिर ठेवणं रिझर्व्ह बँकेसाठी महत्त्वाचं आहे. त्यातले चढउतार सामान्य गुंतवणूकदाराचं नुकसान करणारे असू शकतात.

"आपल्याला पैसे मिळतात ते श्रमाचा मोबदला म्हणून. पण बिटकॉईन मिळवण्यासाठी जी संगणकीय गणितं सोडवावी लागतात, त्यात विशिष्ट प्रकारचं तंत्र आत्मसात करावं लागतं. म्हणजे ते तंत्र आत्मसात न केलेल्यांसाठी बिटकॉईन कमाईचा मोठा मार्ग बंद होतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी काही ठराविक लोकांकडेच जमा होण्याचा धोका आहे," असं फडणीस सांगतात.

तज्ज्ञांमध्ये इतकी चर्चा होत असताना आणि क्रिप्टोकरन्सीवर इतकं काही बोललं जात असताना बिटकॉईनचा दर ऑनलाईन एक्सचेंजवर चढाच आहे.

17000 डॉलरचा टप्पाही आता सर झाला आहे. अशावेळी भारत क्रिप्टोकरन्सीपासून कितीवेळ दूर राहणार हा प्रश्नच आहे.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)