सोशल : 'भीमा कोरेगाव हिंसाचारामागे खूप खालच्या पातळीवरचं राजकारण, प्रशासन कमी पडलं'

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या भक्ष्यस्थानी पडलेली गाडी Image copyright BBC / Mayuresh Konnur

महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामधल्या कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यास दलित समाजातले लोक जमले असताना या कार्यक्रमाला हिंसेचं गालबोट लागलं. पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून सुरू झालेली ही हिंसेची लाट मग इतरत्र पसरली. आणि यात एकाचा बळीही गेला.

याचे पडसाद दुसऱ्या दिवशी राज्यभरात उमटले. प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली, ज्या दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना विचारलं की, भीमा कोरेगाव हिंसाचाराचं राजकारण होत आहे का?

यावर वाचकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक वाचकांना या हिंसाचारामागे राजकारण असल्याचं वाटतं. तर, हस्तक्षेप करून राज्य सरकारला हा हिंसाचार टाळता आला असता किंवा रोखता आला असता, असंही काहींना वाटतं.

विवेक दिवे याबाबत सांगतात की, "महाराष्ट्राचं प्रशासन कमी पडलं. पुरेशी पोलीस व्यवस्था नव्हती. जर ही व्यवस्था असती तर भीमा कोरेगाव (प्रकरण) घडलं नसतं. अन् राजकारण करण्याचा प्रश्नही उपस्थित झाला नसता."

Image copyright FACEBOOK

तर, वृषाली प्राजक्त यांनी याबाबत बोलताना सांगितलं, "प्रत्येक असंतुष्ट घटक या गोंधळात आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतोय. यात कोणालाही राज्य, देश, समाज याच्याशी देणघेणं नाही. नेते मूर्ख बनवतात आणि जनता मूर्ख बनते."

Image copyright FACEBOOK

परीक्षित जगताप मात्र, "राजकारणासाठीच हिंसाचार घडवण्यात आला होता," असं ठाम मत व्यक्त करतात. तर, संजय थिटे यांनीही असंच मत व्यक्त केलं असून "राजकारणासाठी हिंसाचार होतो," असं म्हटलं आहे.

तर, श्याम ठाणेदार यांनी कमेंट करताना राज्य सरकारला सल्ला दिला आहे. ते म्हणतात, "आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून या घटनेचा राजकीय लाभ घेऊन समाजात दुही निर्माण करण्यापेक्षा समाजात एकी निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी करावा."

Image copyright FACEBOOK

नंदिनी पाठारे-शेट्ये सांगतात, "खूप खालच्या पातळीवरचं राजकारण खेळलं जात आहे. बंदचं आव्हान करणारे नेते एसीमध्ये बसून होते. आणि रिकामे, डोकं भडकलेले माथेफिरू बंदच्या काळात गाड्या, दुकानांचे नुकसान करत होते. त्यांना हेही समजत नाही आहे की आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. आणि नेते बिळात बसून मजा बघणार आहेत."

Image copyright FACEBOOK

"मराठा विरुद्ध दलित संघर्ष भडकवण्याचा हा कट" असल्याचं मत विश्वास पाटील खराटे यांनी व्यक्त केलं आहे. तर "यात केवळ राजकारणच आहे. बाकी या कृत्याला कसलीही बाजू नाही," असं मत विनीत मयेकर यांनी आपल्या कमेंटमधून मांडलं आहे.

तर, शशांक महाडिक यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. "भाजप विरोधी पक्षात असतं तर त्यांच्या पक्षानंही हेच केलं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आंदोलनातील तोडफोड समर्थनीय नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Image copyright FACEBOOK

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)