प्रेस रिव्ह्यू : संभाजी भिडे यांच्या लालबागमध्ये होणाऱ्या व्याखानाला परवानगी नाकारली

संभाजी भिडे Image copyright Raju Sanadi

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांचं मुंबईतलं नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आयोजकांनी हा निर्णय घेतला.

मुंबईतल्या लालबागमध्ये 7 जानेवारीला भिडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं हे व्याख्यान होणार होतं, असं 'लोकमत'नं म्हटलं आहे.

मुंबईचं वातावरण गढूळ झालं आहे. मराठा, ब्राम्हण आणि दलित अशी फूट पाडण्याचा प्रयत्न समाजविघतक संघटना करत आहेत असा आरोपही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई विभाग प्रमुख बळवंत दळवी यांनी केला आहे.

पोलिसांच्या विनंतीवरून व्याख्यान पुढे ढकलत आहोत. खरा सूत्रधार सापडल्यावर पुन्हा सभेचं आयोजन केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

उथळ राजकारणाला उकळी फुटली आहे, सावधान!

"कुठे दलित समाज 'बंद' पुकारीत आहे तर कुठे हिंदुत्ववादी संघटना मोर्चे काढत आहेत. एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र समृद्धीच्या महामार्गानं जाताना दिसत नसून तो जातीय अराजक आणि विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे," असं भाष्य 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आलं आहे.

Image copyright PUNIT PARANJPE/GETTY IMAGES

"राज्य मनानं दुभंगलं आहे. १८१८ मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तरी वेगळं काय झालं आहे? उथळ राजकारणाला उकळी फुटली आहे, सावधान," असा इशाराही या अग्रलेखात देण्यात आला आहे.

कमला मिलमधील आग हुक्क्यामुळे

कमला मिलमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टोपब्सना आगीच्या खेळामुळे आग लागली असल्याचा अहवाल मुंबई अग्निशमन दलानं दिला आहे.

मोजो पबमध्ये सुरू असलेल्या आगीच्या खेळामुळे ही भीषण आग लागल्याचं अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल अग्निशमन दलानं आयुक्तांकडे दिला, असं वृत्त 'झी २४ तास'नं दिलं आहे.

मोजोतील अग्निशमन यंत्रणेत त्रुटी असल्याचंही अग्निशमन दलानं अहवालात म्हटलं आहे.

कमला मिलप्रकरणी नेत्यांकडून दबाव - पालिका आयुक्त

कमला मिल आगीनंतर मला राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले, असा आरोप मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केला. मात्र, नावं उघड करणार नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.

'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, महापालिका आयुक्तांनी सभागृहात शुक्रवारी या संदर्भात निवेदन दिलं.

माझ्याकडे 17 ते 18 हॉटेल्स आणि बारची यादी आहे, त्यांच्यासाठी माझ्यावर दबाव होता. मी नाव उघड करणार नाही. विरोधी पक्षनेते ती नावं सांगू शकतील, असंही मेहता म्हणाले.

२०१७-१८ मध्ये GDPची घसरण्याचा अंदाज

आर्थिक आघाड्यांवर अनेक आव्हानांचा समाना करत असलेल्या मोदी सरकारला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा (GDP) दर घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Image copyright Getty Images

'लोकसत्ता'नं दिलेल्या वृत्तानुसार, सरकारच्याच सांखिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं (CSO) हा अंदाज वर्तवला आहे. सरकार सध्या आगामी आर्थिक वर्ष २०१८-१९च्या अर्थसंकल्पाची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर हा अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे.

वित्तीय वर्ष २०१७-१८च्या जीडीपी वाढीचा दर ६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ७.१ टक्क्यांपेक्षा हा दर खूपच कमी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)