'भिडे समर्थकांचा नगरमधला मोर्चा हा सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न'

भीमा-कोरेगाव, दलित, सामाजिक, आंबेडकर अनुयायी.

पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावमध्ये आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याला एक आठवडा पूर्ण होत आहे. या प्रकरणी ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला, त्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर कारवाई करू नये, या मागणीसाठी सांगली आणि अहमदनगरमध्ये शिवप्रतिष्ठान आणि काही इतर संघटनांनी मोर्चे काढले.

भीमा कोरेगावमध्ये हल्ला घडवून आणण्यासाठी चिथावणी दिल्याच्या आरोपावरून शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडी या संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पण भिडेंचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि ते तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी अहमदनगरच्या मोर्चात करण्यात आली.

भीमा कोरेगावमध्ये हिंसाचारात जे नुकसान झालं, त्याची भरपाई एल्गार परिषदेच्या आयोजकांकडून वसूल करण्यात यावी, अशा आशयाचे फलक या मूक मोर्चात होते.

प्रतिमा मथळा मुंबईत पोलीस कार्यकर्त्यांची पकड करताना.

"भिडे गुरुजींवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे सरकारने सन्मानाने मागे घ्यावेत तसेच ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्यांची चौकशी करावी अशी आमची भूमिका आहे. गुरुजींच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याची शिवप्रतिष्ठानची भूमिका नसून ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. जातीपातीवर आमचा विश्वास नाही. गुरूजींवरच्या आरोपांनंतर काही दलित संघटनाही अस्वस्थ असून त्या कार्यकर्त्यांनी गुरुजींन पाठिंबा व्यक्त केला आहे," असं शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पण अहमदनगरमधल्या या मोर्चापासून मुख्य हिंदुत्ववादी संघटनांनी अंतर राखलं, असं लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

"जो मोर्चा भिडेंच्या समर्थनासाठी काढला गेला, त्यात बहुतांशी शिवप्रतिष्ठान संघटनेचेच कार्यकर्ते होते. हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा म्हणून हा मोर्चा काढला गेला असला तरी त्यामध्ये इतर मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग नव्हता. हा मोर्चा म्हणजे कारवाई टाळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचाच प्रकार आहे. घटना भीमा कोरेगावमध्ये घडली आणि मोर्चे मात्र नगर-सांगलीत निघतायेत. म्हणजे हा राज्य पातळीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे."

सरकार दबावापुढे काय करणार?

भिडेंचे पाठीराखे मोर्चा काढून सरकारवर दबाव आणत असतील, तरी त्याला न जुमानता सरकारनं कारवाई करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक समर खडस यांनी व्यक्त केली.

Image copyright Raju Sanadi
प्रतिमा मथळा संभाजी भिडे

"भिडे 1984 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून सांगलीत काम करत होते आणि त्यानंतरही शिवप्रतिष्ठान संघटनेच्या माध्यमातून ते सांगलीत 30 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत आहेत. त्यामुळे तिथं समर्थक असणे आणि त्यांनी मोर्चा काढणे हे अपेक्षितच आहे. नगरलाही थोडे फार समर्थक असू शकतात. पण जर पोलिसांनी प्राथमिक गोष्टी तपासून गुन्हा दाखल केलेला आहे तर त्यांनी मोर्चांना महत्त्व न देता कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करणे अपेक्षित आहे. शासन संस्थेवर खरोखरच दबाव येत असेल आणि सरकार कारवाई करत नसेल, तर त्यातून चुकीचा पायंडा पडेल. समाजात प्रतिक्रिया काय उमटते याचा विचार न करता कायद्याने आपले काम केले पाहिजे," असं खडस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

'भिडेंना सरकार संरक्षण देतंय?'

भिडेंच्या समर्थनासाठी काढलेल्या मोर्चांना विशेष महत्त्व देण्याची गरज नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांचं म्हणणं आहे.

"संभाजी भिडे यांनी लोकांना चिथावणी दिली आणि त्यातूनच स्थानिक लोकांनी गोविंद गायकवाड यांच्या समाधीची नासधूस केली होती अशी प्राथमिक माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोर्चेकऱ्यांवर दगडफेक झाली आणि त्यांच्या गाड्याही जाळल्या आहेत. तिथं प्रत्यक्षात संभाजी भिडे असो नसो, पण त्यांनी चिथावणी दिली होती, त्यांच्या संघटनेचे लोक तिथं होते अशी माहिती आहे. अशा वेळी त्यांच्यावर कारवाई करू नये या मागणीसाठी काढल्या जाणाऱ्या मोर्चांना काही महत्त्व देण्याची गरज नाही."

Image copyright Sai Sawant
प्रतिमा मथळा उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.

मोर्चांकडे लक्ष न देता खरंतर आता सरकारकडून कारवाईची अपेक्षा असल्याचं आसबे यांचं मत आहे. "भिडेंवर अट्रॉसिटीची केस आहे पण अजूनही अटक झालेली नाही. ते पूर्वी राष्ट्रीय स्वसंसेवक संघाशी संबंधित असल्यानं सरकार त्यांना संरक्षण देतंय का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. या संपूर्ण प्रकरणात सरकारचं अपयश ठळकपणे दिसून आलं आहे."

'उदयनराजेंपेक्षा पवारांची भूमिका महत्त्वाची'

कोणत्याही पक्षानं किंवा राज्यव्यापी संघटेनेनं संभाजी भिडेंना पाठिंबा दिला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उघडपणे भिडेंची पाठराखण केली.

"भिडे गुरूजी वडीलधारी आहेत. त्यांचा (या घटनेशी) संबंध नाही," असं म्हणत उदयनराजेंनी भिडेंना क्लीन चिट दिली.

उदयनराजे भोसले यांनी संभाजी भिडेंना दिलेल्या पाठिंब्याबद्दल खडस म्हणाले की, "उदयनराजे भोसले ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत, त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे की, कोरेगाव भीमामध्ये जे काही घडले ते योग्य नाही आणि यामध्ये हिंदुत्ववादी शक्तींचा हात आहे. उदयनराजेंचं भिडेंबद्दल जे मत आहे त्यापेक्षा मला शरद पवार यांची भूमिका राजकीय विश्लेषक म्हणून अधिक महत्त्वाची वाटते. कारण उदयनराजे हे राष्ट्रवादीतल्या अनेक लोकप्रतिनिधींपैकी एक लोकप्रतिनिधी आहेत."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)