प्रेस रिव्ह्यू : अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढण्याची शक्यता

अरुण जेटली Image copyright Getty Images

येत्या लोकसभा निवडणुका क्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला सवलत देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी बातमी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिली आहे.

मध्यमवर्ग हा भारतीय जनता पक्षाचा प्रमुख मतदार असल्यानं हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करणं, आरोग्य विमा तसंच मुदत ठेवींवर सवलती देण्याच्या विचारात सरकार आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विनापरवाना लाऊडस्पीकरवर बंदी

उत्तर प्रदेशमध्ये राज्य सरकारनं विनापरवाना लाऊडस्पीकरवर बंदी घातली आहे.

यासंदर्भातलं वृत्त द हिंदूनं दिलं आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर बसवण्यात आलेले लाऊडस्पीकर काढून टाकावेत, असे आदेश सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत, असं या वृत्तात म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

ज्यांनी विनापरवाना लाऊडस्पीकर बसवले आहेत, त्यांना परवाना घेण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे, असं यात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शक्य

महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीची शक्यता असल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलं आहे.

Image copyright RAVEENDRAN/AFP/Getty Images

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिल्याचं यात म्हटलं आहे.

"दोन्ही पक्षांना लाभकारक ठरत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करण्यात काहीच अडचण नाही. पण ही आघाडी दोन्ही पक्षांना लाभदायक व्हायला हवी," असं त्यांनी म्हटलं आहे.

निवडणूक रोख्यांचा विचार

निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना मिळवणऱ्या निधीत पारदर्शकता आणण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवडणूक रोख्यांचा पुरस्कार केला असल्याची बातमी 'लोकसत्ता'ने दिली आहे.

या संदर्भातील उल्लेख त्यांनी गेल्या अर्थसंकल्पीय भाषणात केला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी या रोख्यांची रूपरेषा संसदेत मांडली आहे.

तसंच त्यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट लिहीलेल्या मजकुरात निवडणूक रोख्यांची गरज अधोरेखित केली आहे. यासंदर्भात आणखी सूचनांचं स्वागत जेटली यांनी केलं आहे.

सचिनच्या मुलीची छेड काढणाऱ्याला अटक

सचिन तेंडुलकरची मुलगी साराला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्याला तरुणाला पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे, अशी बातमी 'एबीपी माझा'नं दिली आहे.

Image copyright INDRANIL MUKHERJEE/AFP/Getty Images

याबाबतची तक्रार सचिननं नुकतीच मुंबईत पोलिसांत दिली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव देवकुमार मिद्दी असं आहे. तसंच तो बऱ्याच वेळा सचिनच्या मुंबईतल्या कार्यालयात येऊन गेल्याचं बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)