अशी जिंकली कांगारुंनी 'अॅशेस'!

अॅशेस, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, क्रिकेट, खेळ Image copyright Cameron Spencer/Getty Images
प्रतिमा मथळा अॅशेस विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ.

दमदार सांघिक खेळासह ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिकेवर कब्जा केला. सिडनी कसोटीत इंग्लंडला एक डाव आणि 123 धावांनी नमवत ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली.

क्रिकेटविश्वातल्या बहुचर्चित अशा या मालिकेत दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियानं जागतिक स्तरावर आपली हुकूमत सिद्ध केली.

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर चोख कामगिरी बजावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या विजयाची गुणवैशिष्ट्यं.

1. स्टीव्हन स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं पाच सामन्यात मिळून 137.40च्या सरासरीसह 687 धावा चोपून काढल्या.

इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांना नामोहरम करत स्मिथनं दणदणीत वर्चस्व गाजवलं. स्मिथला आऊट करण्याचा फॉर्म्युला इंग्लंडला शेवटपर्यंत सापडला नाही.

तीन शतकं आणि दोन अर्धशतकांसह स्मिथनं संघातील सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ 687 धावांसह अॅशेस विजयाचा शिल्पकार ठरला.

संघ अडचणीत असताना प्रत्येकवेळी मॅरेथॉन खेळी करणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या या अॅशेस विजयाचा शिल्पकार ठरला.

या मालिकेतल्या अद्भुत सातत्यामुळे स्मिथची तुलना महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांच्याशी होऊ लागली आहे.

2 निवड समिती

अॅशेस विजयात निवडसमितीची भूमिका निर्णायक ठरली. अॅशेस मालिकेपूर्वी निवडसमितीनं काही धक्कादायक निर्णय घेतले.

हे निर्णय अंगलट ठरून संघाला पराभवाला सामोरं जावं लागेल अशी टीका तीव्र झाली होती. मात्र मालिकेअखेरीस निवडसमितीचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं.

डेव्हिड वॉर्नरचा सहकारी म्हणून सलामीवीर मॅट रेनशॉला डच्चू देऊन निवडसमितीनं कॅमेरून बॅनक्रॉफ्टला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

याच मालिकेत बॅनक्रॉफ्टनं पदार्पण केलं. पहिल्याच लढतीत 82 धावांची खेळी करत बॅनक्रॉफ्टनं निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवला.

पुढच्या सामन्यांमध्ये बॅनक्रॉफ्टला चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र वॉर्नरला भागीदारीत चांगली साथ दिली.

दुखापतींमुळे सातत्यानं संघाच्या आतबाहेर होणाऱ्या शॉन मार्शला निवडसमितीनं आठव्यांदा कसोटी पुनरागमनची संधी दिली.

कलात्मक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मार्शनं या संधीचं सोन केलं. पाच सामन्यात 74.16च्या सरासरीनं 445 धावांची लूट केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शॉन आणि मिचेल मार्श बंधुंनी अॅशेस मालिका गाजवली.

अॅडलेड कसोटीतील शॉनच्या शतकानं मालिकेचं चित्रच पालटलं. पीटर नेव्हिल आणि मॅथ्यू वेड या नियमित विकेटकीपर्सना बाजूला सारत सात वर्षांपूर्वी कसोटी खेळलेल्या टीम पेनला संघात स्थान देत निवडसमितीनं आश्चर्याचा धक्का दिला.

पेननं पाच सामन्यात 25 कॅच आणि 1 स्टंम्पिंगसह उपयुक्त धावा करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

दोन कसोटींनंतर निवडसमितीनं धावांसाठी झगडणाऱ्या पीटर हॅड्सकॉम्बऐवजी मिचेल मार्शला संघात घेतलं.

सातत्यानं दुखापतग्रस्त होणाऱ्या मिचेलनं पर्थ कसोटीत 181 तर सिडनी कसोटीत 101 धावांची खेळी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.

3 कर्दनकाळ चौकडी

एखादी कसोटी जिंकण्यासाठी गोलंदाजांनी 20 विकेट्स घेणं आवश्यक असतं. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजानं प्रत्येकी वीसहून अधिक विकेट्स घेत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इंग्लंडच्या फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज- (डावीकडून उजवीकडे) मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन आणि पॅट कमिन्स

पॅट कमिन्स (23), मिचेल स्टार्क (22), जोश हेझलवूड (21) आणि नॅथन लियॉन (21) विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.

वेग, स्विंग, स्पिन आणि अचूकता या सगळ्या आघाड्यांवर आग ओकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या या चौकडीनं विजयाचा पाया रचला.

4. मानसिक आक्रमण

मैदानाबाहेरच्या घटनांचा पुरेपूर उपयोग करून घेत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला निरुत्तर केलं. सप्टेंबर महिन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ब्रिस्टमधील नाइटक्लबबाहेर वादावादीप्रकरणी अटक करण्यात आली.

स्टोक्सची जामिनावर सुटका झाली मात्र आचारसंहितेच्या उल्लंघनामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं स्टोक्सची अॅशेस संघात निवड केली नाही.

इंग्लंड संघाचा अविभाज्य घटक असलेला स्टोक्स या मालिकेत संघात नसल्याचा ऑस्ट्रेलियाला फायदा झाला.

सातत्यानं स्टोक्सच्या बेशिस्त वर्तनाची चर्चा कायम राखत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर दडपण आणलं. मालिकेदरम्यान इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जॉनी बेअरस्टो शिस्तभंग प्रकरणात अडकला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो (सगळ्यात उजवीकडचा) फलंदाजीपेक्षा हेडबटमुळे चर्चेत राहिला.

दोन संघांमधील सदिच्छा भेटीदरम्यान बेअरस्टोनं ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला हेडबट अर्थात डोक्यानं धक्का लगावत अभिवादन केलं.

हँडशेक किंवा आलिंगनाची अपेक्षा असणारा बॅनक्रॉफ्ट बेअरस्टो चक्रावून गेला. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी बेअरस्टो प्रकरणाला वारेमाप प्रसिद्धी दिली.

कुप्रसिद्धी मिळाल्यानं दडपणाखाली असणाऱ्या बेअरस्टोला पाच सामन्यात मिळून 306 धावाच करता आल्या.

इंग्लंड लायन्स अर्थात इंग्लंड युवा संघाच्या आणि मुख्य संघातला राखीव खेळाडू बेन डकेटनं एका बारमध्ये संघ सहकारी जेम्स अँडरसनवर ड्रिंक ओतलं.

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी डकेटला आर्थिक दंड ठोठावण्यात आला आणि मायदेशी पाठवण्यात आलं.

5. भागीदाऱ्यांचं गमक

कसोटी क्रिकेटमध्ये भागीदाऱ्या रचणं अतिशय महत्त्वाचं असतं. पाच सामन्यात मिळून ऑस्ट्रेलियानं नऊ शतकी भागीदाऱ्यांसह विजयाचं पारडं आपल्या बाजूनं झुकवलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोठ्या भागीदाऱ्यांसह ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दडपण आणलं.

विकेट पडल्यावर नवीन फलंदाजांवर दडपण आणण्याची संधी गोलंदाजांना मिळते. परंतु ऑस्ट्रेलियानं सातत्यानं मोठ्या भागीदाऱ्यांसह प्रतिस्पर्ध्यांनाच अडचणीत आणलं.

6. कॅचेसची कमाल, रनआऊटची धमाल

या मालिकेसाठी विशेषत्वानं ऑस्ट्रेलियानं फिल्डिंग ड्रिल्सवर प्रामुख्यानं भर दिला होता.

धावा आटतात, विकेट्स मिळेनाशा होतात तेव्हा कॅचेस किंवा रनआऊट मदतीला धावून येतात याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियानं दिला.

ऑस्ट्रेलियाचा संघ एरव्हीही अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. पण ही मालिका जिंकायची असेल तर कोणतीही कसूर सोडून चालणार नाही, हे ऑस्ट्रेलियाने जाणलं.

उडणारा प्रत्येक झेल टिपालयाच हवा असा पवित्रा ऑस्ट्रेलियाच्या खेळात दिसून आला.

अॅडलेड कसोटीत मोईन अलीचा नॅथन लियॉननं स्वत:च्या गोलंदाजीवर टिपलेला झेल संपूर्ण मालिकेदरम्यान चर्चेत राहिला.

याच कसोटीत वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं स्वत:च्या गोलंदाजीवर घेतलेल्या जॉनी बेअरस्टोचा अफलातून झेल टिपला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनचा अफलातून झेल.

ब्रिस्बेन कसोटीत जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर नॅथन लियॉननं एका हातानं थ्रो करताना जेम्स विन्सला रनआऊट केलं.

इंग्लंडचा संघ सुस्थितीत असल्यानं ऑस्ट्रेलियाला विकेटची गरज होती. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडचे फलंदाज चांगली वाटचाल करत असताना लियॉननं केवळ एक स्टंप दिसत असतानाही अचूक थ्रोसह विन्सला माघारी धाडले.

पर्थ येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा डेव्हिड मलान भरात होता. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू पीटर हँड्सकॉम्बनं भन्नाट झेल टिपत मलानला परतीचा रस्ता दाखवला.

दोन झेल सोडल्यानं स्टीव्हन स्मिथवर टीका झाली होती, मात्र शेवटच्या आणि पाचव्या कसोटीत स्मिथनं मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर सुरेख झेल टिपत डेव्हिड मलानला तंबूत धाडलं.


अॅशेस दृष्टिक्षेपात

ठिकाण निकाल
ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया 10 विकेट्सनी विजयी
अॅडलेड ऑस्ट्रेलिया 120 धावांनी विजयी
पर्थ ऑस्ट्रेलिया 1 डाव आणि 41 धावांनी विजयी
मेलबर्न अनिर्णित
सिडनी ऑस्ट्रेलिया 1 डाव आणि 123 धावांनी विजयी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)