पुण्याची वेदांगी करणार सायकलवरून जगप्रदक्षिणा

वेदांगी कुलकर्णी Image copyright Vedangi Kulkarni
प्रतिमा मथळा वेदांगी कुलकर्णी

इंग्लंडच्या बोर्नमाउथ विद्यापीठात शिकत असलेली पुण्याची वेदांगी कुलकर्णी ही १९ वर्षीय तरुणी येत्या जून महिन्यात सायकलवरून जगप्रदक्षिणा करणार आहे.

दररोज ३२० किलोमीटर वेगानं १०० दिवसांमध्ये पाच खंडांमधून सायकलिंग करत २९,००० किलोमीटरचा पल्ला ती पार करणार आहे. 

वेदांगीची ही राईड 'सेल्फ सपोर्टेड' म्हणजेच कुणाच्याही मदतीशिवाय असेल, हे विशेष. याआधी जगात केवळ दोन महिलांनी वयाच्या तिशीत असा प्रयत्न केला होता.

त्यामुळे कमीतकमी वेळात सायकलवरून जगप्रदक्षिणा करणारी सर्वांत तरुण महिला सायकलस्वार म्हणून तिची आणि तिच्या या प्रवासाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याच्या दिशेनंही वेदांगीची तयारी सुरू आहे.

पाच टप्प्यांमध्ये ही राईड होणार असून ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथूनच सुरुवात आणि सांगता होणार आहे. पहिला टप्पा पर्थ ते ब्रिस्बेन, दुसरा टप्पा न्यूझिलंडमधील वेलिंग्टन ते ऑकलँड, तिसरा टप्पा अँकरेज (अलास्का) ते मॉनर्टियल (कॅनडा) असा असेल. चौथ्या टप्प्यात पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड, रशिया, मंगोलिया आणि चीन असं सायकलिंग करून शेवटचा आणि पाचवा टप्पा पुन्हा पर्थ असा असेल. 

राईडसाठी वेदांगीनं 'स्टेप अप अॅन्ड राईड ऑन' (#StepUpAndRideOn) हे अभियान सुरू केलं आहे.

"मला एकटीनं प्रवास करायला आवडतो. माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता यावेळी पडताळून पाहता येतात," असं वेदांगी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाली. 

Image copyright Callum Howard

बोर्नमाउथ विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या वेदांगीला विद्यापीठ सर्वोतोपरी मदत करत आहे.

संपूर्ण प्रवासाचं डॉक्युमेंटेशन (राईडचा तपशील, छायाचित्रं, व्हिडिओ) वेदांगी राईड करताना स्वत:च करणार असून काही ठिकाणी विद्यापीठाची टीम तिचं चित्रिकरण करणार आहे.

राईडला निघण्याआधी आवश्यक सराव चाचण्या, आहार, शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्तीसाठी आवश्यक ट्रेनिंगमध्येही विद्यापीठ मोलाचं सहकार्य करत आहे.

त्याचप्रमाणे ७८ दिवसांमध्ये सायकलवरून जगप्रवास करणारा मार्क बिऊमाँट आणि भारतातील अल्ट्रा सायकलिस्ट सुमित पाटील वेदांगीला मार्गदर्शन करत आहेत. 

वेदांगी खूप स्वतंत्र विचारांची आणि मेहनती मुलगी असल्याचं तिचे वडील विवेक कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"वेदांगीच्या आतापर्यंतच्या वाटचालीचं कौतुक तर आहेच, पण ती स्वत: घेत असलेले निर्णय आणि तिच्या आवडींबद्दलही आदर आहे," असं मत तिची आई अपर्णा कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.

Image copyright Vivek Kulkarni

वयाच्या १७ व्या वर्षांपासून सायकलिंगला सुरुवात केल्यानंतर जुलै २०१६ मध्ये मनाली-खार्दुंग ला-द्रास या भारतातल्या सर्वांत आव्हानात्मक रस्त्यावर तिनं एकटीनं सायकलिंग केलं.

मागच्या वर्षी इंग्लंडला गेल्यावर खऱ्या अर्थानं तिच्या स्वतंत्रपणे आणि लांब पल्ल्याच्या सायकलिंगला सुरुवात झाली.

बोर्नमाऊथपासून जॉन ओग्रोतस् हा १९०० किलोमीटरचा प्रवास तिनं सायकलवर केला. त्यानंतर इंग्लंडमध्येच नियमितपणे सायकलिंग सुरू केलं. काही दिवसांपूर्वी तिनं मुंबई ते दिल्ली हे १४०० किलोमीटर सायकलिंग करून नववर्षाचं स्वागत केलं.

या राईडमध्ये वेगासोबतच कंम्फर्टही महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे लंडनमधल्या 'आयसन वर्कशॉप'मध्ये वेदांगीसाठी खास सायकल तयार होत आहे.

"तिच्या शरीराची ठेवण, वजन, वेग, पाच खंडातलं हवामान आणि सर्व प्रकारच्या रस्त्यांचा अभ्यास करून ही सायकल तयार करण्यात येत आहे," असं आयसन वर्कशॉपच्या सहसंस्थापक कॅरेन हार्टले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. 

"आम्ही वेदांगीच्या राईडबद्दल खूप उत्सुक आहोत. हा जगप्रवास खूप खडतर आहे. पण वेदांगीला प्रत्यक्षात भेटल्यानंतर आणि तिचं सायकलिंग पाहिल्यानंतर वेदांगी सर्व आव्हानांवर सहज मात करू शकेल, असं आम्हाला वाटतं. पाच खंडांमधून होणारा हा जगप्रवास पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असंही कॅरन म्हणाल्या.  

"सायकलवरून जगप्रदक्षिणा म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासारखं आहे. एवढ्या लहान वयात जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याची चिकाटी ठेवणं हेच सिध्द करतं की या जगात मोठी स्वप्न कुणीही पाहू शकतं. त्याला वयाचं बंधन नसतं," अशी प्रतिक्रिया जागतिक विक्रमवीर मार्क बिऊमाँट यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणतात, "मी वेदांगीच्या सुरू असलेल्या सर्व तयारीला, इतरांना प्रोत्साहन देणाच्या वृत्तीला आणि निश्चयाला सलाम करतो." मार्क बिऊमाँट यांनी ७८ दिवसांमध्ये सायकलवरून जगप्रदक्षिणा पूर्ण केली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)