कर्नाटक : व्हॉट्सअपवरील जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या!

पोस्टर Image copyright AFP

कर्नाटकमध्ये एका मुस्लीम मुलाबरोबर मैत्री केल्यामुळे एका हिंदू तरुणीला व्हॉट्सअपवर जाचाला सामोरं जावं लागलं. त्याचा तिला इतका मनस्ताप झाला की तिने आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीची एका मुस्लीम मुलाबरोबर मैत्री होती. त्यावर काही लोकांनी आक्षेप घेतल्यावर, तिने 'आपल्याला मुस्लीम लोक आवडतात', असं तिनं एका मित्राला व्हॉट्सअपवर सांगितलं होतं. पुढे या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्यावरून एका हिंदुत्ववादी संघटनेच्या पाच जणांनी शनिवारी तिच्या घरी जाऊन तिच्या पालकांना या प्रकरणी तंबी दिली होती. त्या 20 वर्षीय तरुणीनं त्याच दिवशी अखेर आत्महत्या केली.

पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी आत्महत्येमुळे मृत्यू झाल्याची नोंद केली होती. मात्र सोमवारनंतर या प्रकरणात सोशल मीडियाचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली.

त्या तरुणीनं आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती, असं कर्नाटकच्या चिकमंगळूरचे ज्येष्ठ पोलीस अधिकारी, के. अन्नामलाई यांनी बीबीसीला सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, "तिनं त्या पत्रात लिहून ठेवलं होतं, की एका दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीसोबत तिचा एक फोटो होता. त्या फोटोवरून अनेकांनी तिच्या चारित्र्याबाबत शंका व्यक्त केली होती."

त्यांनंतर पाच जण तिच्या घरी येऊन तिच्या पालकांना तिचं एका मुस्लीम मुलावर प्रेम असल्याचं सांगून गेले होते. यातल्या एकाला पोलिसांनी अटक केली असून इतरांचा पोलीस शोध घेत असल्याचं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

'एका तरुणीचा हकनाक बळी'

बीबीसी हिंदीच्या इमरान कुरेशी यांनी पाहिलेल्या काही स्क्रीनशॉटनुसार, लोक तिला दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीमध्ये जास्त गुंतून जाऊ नको, असा दम देत होते.

त्यांना उत्तर देत, 'पण मला मुस्लीम लोक आवडतात', असं तिनं म्हटलं होतं. इतर धर्मातल्या व्यक्तीसोबत मैत्री करण्यात काहीही गैर नाही, असंही तिनं पुढे म्हटलं आहे.

"तिच्यावर व्हॉट्सअपवर, फेसबुकवर ज्या कोणी टीका केली असेल, त्या प्रत्येकाला अटक केली जाईल," असं पोलिसांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

'लव्ह जिहाद' या मु्द्द्यावरून गेल्या काही वर्षांत भारतात हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे.

'लव्ह-जिहाद' ही संकल्पना काही हिंदू गटांनी पुढे आणली आहे. या हिंदू गटांचा आरोप आहे की, हिंदू महिलांना मुस्लीम धर्मांत आणण्यासाठी मुस्लीम मुलांकडून कट रचले जातात.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)