जातीवरून अपमान झाल्यानं डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: 'इथं आल्यापासूनच मला जात, धर्म, भाषा यांच्यावरुन भेदभावाचा सामना करावा लागला.'

अहमदाबादमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची उपाचारासाठी लांबच-लांब रांग नेहमीप्रमाणे होती. त्याच हॉस्पिटलमध्ये एका बेडवर एक तरुण दु:खात बुडालेला होता. हाताला सलाईन होतं, पण आसपास देखभाल करणारं कुणीही नाही.

हा मुलगा होता वैद्यकीय शाखेच्या तिसऱ्या वर्षात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी - डॉ. मारी राज. डॉक्टरच पेशंटच्या बेडवर? असं का?

डॉ. मारी राज यांनी नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कारण, त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा चार-चौघात वरिष्ठांनी खूप अपमान केला होता. आणि त्यांचा हा अपमान त्यांच्या जातीवरून झाला असल्याचंही ते म्हणाले.

मूळ तामिळनाडूचे असलेले डॉ. राज यांनी, जून 2015 पासून आपल्याला जातीवरून भेदभाव आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं बीबीसीला सांगितलं. यामुळे त्यांनी 9 डॉक्टरांविरुद्ध तक्रारही दाखल केली आहे.

"जातीवाद, वर्णद्वेष आणि भाषाद्वेषाला मी बळी पडलो. मला आता आपल्या घरी परत जाऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे," असं डॉ. राज यांचं म्हणणं आहे.

डॉ. राज यांना गेल्या शनिवारीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातल्या एका शेतकरी कुटुंबातून वर आलेले आहेत.

प्रतिमा मथळा डॉ. मारी राज

"देशातल्या कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत असतानाही मी गुजरातमध्ये शिकायला आलो," ते सांगतात. "पण मला आता माझ्या घरी परत जायचं आहे." असं त्यांनी बीबीसी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. या संभाषणादरम्यान खोलीत ते एकटेच होते.

"5 जानेवारी 2018ला वरिष्ठांनी जाहीररित्या माझा माझ्या जातीवरून अपमान केल्यानं मी आत्महत्येचा निर्णय घेतला," असं त्यांनी सांगितलं.

खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या घेतल्यानं त्यांना तत्काळ हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं.

त्यांनी साहिबाग पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. माझ्या जातीमुळे मला योग्य काम दिलं गेलं नाही, असं त्याचं म्हणणं आहे.

याबाबत बीबीसीशी बोलताना महाविद्यालयात मारी राज काम करत असलेल्या विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत मेहता म्हणाले की,"राज यानीं केलेले सगळे आरोप निराधार आहेत. मी त्यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून आहे. यात मला फार कमी वेळ त्यांच्याशी बोलण्यासाठी मिळाला आहे. बहुजन पार्श्वभूमीचे इतरही अनेक विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात असून त्यांनी कधीही अशी वागणूक मिळाल्याची तक्रार केलेली नाही."

दरम्यान, सर्व नऊ आरोपींनी त्यांच्याविरोधातल्या तक्रारीला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका बुधवारी गुजरात हायकोर्टात दाखल केली आहे. हे प्रकरण आता मुख्य न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला यांच्यासमोर सुनावणीसाठी येणार आहे.

दलित कार्यकर्त्यांनी याबाद्दल पोलिसांना जबाबदार धरलं आहे. स्थानिक दलित कार्यकर्ते कांतीलाल परमार यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "अहमदाबाद पोलीसांनी आरोपींना अटक करण्यात वेळ दवडला. त्यामुळेच त्यांना कोर्टात जाण्यास वेळ मिळाला."

अहमदाबादमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्येच बी. जे. मेडीकल वैद्यकीय महाविद्यालय आहे. आशियातलं सगळ्यांत मोठं हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल ओळखलं जातं. गुजरातमधलं हे पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आहे. जवळपास अर्धा डझन मेडिकल इन्स्टिट्यूट या हॉस्पिटलशी संलग्न आहेत.

डॉ. मेहता पुढे म्हणाले, "5 जानेवारीला डॉ. राज यांनी सर्जरी करू देण्याची मागणी केली होती. विभागाप्रमुख या नात्यानं मी कोणत्याही विद्यार्थ्याला सर्जरी करू देत नाही. गेल्या दोन महिन्यांत त्यानं 22 सर्जरींमध्ये सहभागही घेतला होता."

हॉस्पिटलच्या ज्या डॉक्टरांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यात डॉ. मेहता यांचंही नाव आहे.

प्रतिमा मथळा डॉ. मारी राज

अहमदाबादमधल्या F विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया म्हणाले की, "तपास सुरू करण्यात आला असून सध्या आम्ही साक्षीदारांचं जबाब नोंदवून घेत आहोत. अद्याप कोणालाही अटक झालेला नाही. आम्हाला ज्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळतील त्यांना आम्ही अटक करू."

5 जानेवारीला झालेल्या या घटनेबद्दल बोलताना डॉ. राज म्हणाले, की त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी त्यांचा छळ केला. "त्यांनी माझ्याबद्दल अपशब्द उच्चारले."

डॉ राज यांच्यानुसार त्यांनी यापूर्वीही असा भेदभाव झाल्याची तक्रार केली होती. 2015 साली रुग्णालय व्यवस्थापनाकडे त्यांनी याविषयी तक्रार केली होती. "पण तेव्हाही हा भेदभाव थांबवायला कोणतीही कारवाई झाली नाही," असं ते पुढे म्हणाले.

राज यांनी सांगितलं की, वरिष्ठांनी अनेकदा त्यांना स्वत:ची खुर्ची रिकामी करायला सांगितली, तसंच सगळ्यांसाठी विविध खाद्यपदार्थ आणण्यासारखी कामं करायला लावली.

मला माझ्या कुवतीप्रमाणे कधीच काम करू दिलं नाही, अशी तक्रार त्यांनी केला.

"मी तृतीय वर्षात शिकतो. त्यामुळे मला ज्येष्ठ डॉक्टरांबरोबर शस्त्रक्रियेत महत्त्वाचं काम करू देण्याची संधी मिळायला हवी. पण ते करू देण्याऐवजी माझ्याबरोबर नेहेमीच भेदभाव झाला," असं त्यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "मला नोकरासारखी वागणूक देण्यात आली आणि मला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सिक्युरिटी गार्डसारखं उभं करण्यात येत होतं."

सर्व निवासी डॉक्टरांना त्यांच्या विभागात सेमिनार घेण्याची परवानगी देण्यात येते. पण मला त्यातून वगळण्यात आलं, असंही ते पुढे म्हणाले.

त्यांना 5 तारखेपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सोमवारपासून डॉक्टरांनीही त्यांना पाहायला येणं बंद केलं आहे, असं ते सांगतात. "मला कोणतेही उपचार मिळत नाहीत. खायला दिलं जात नाही. बंदोबस्ताला असलेले पोलीस माझ्यासाठी खायला आणतात."

हॉस्पिटलच्या खोलीत राज एकटेच आहेत. डॉ.राज यांचा मोठा भाऊ जपानमध्ये वैज्ञानिक आहे तर लहान भाऊ तामिळनाडूत MBBSचं शिक्षण घेतो आहे.

मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये राज यांच्या आई एम. इंदिरा यांनी National Commission of Schedule Casteच्या अध्यक्षांना पत्र लिहून राज यांच्याबरोबर होणाऱ्या भेदभावाविषयी कळवलं होतं.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)च्या 2016 च्या आकडेवारीनुसार, अनुसूचित जातींच्या लोकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गुजरात पहिल्या दहा राज्यांमध्ये आहे. तसंच NCRBच्या माहितीनुसार मागासवर्गीय जातींवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे,पण या खटल्यांच्या सुनावणीचं प्रमाण कमी झालं आहे.

महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणामुळे दलितांविरुद्धचा अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)