सोशल : सिनेमागृहांत राष्ट्रगीत सक्तीचं नाही

चित्रपटगृह Image copyright DOMINIQUE FAGET/GETTY IMAGES

सिनेमागृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. आपला आधीचा निर्णय बदलत सुप्रीम कोर्टाने हा नवा आदेश मंगळवारी दिला आहे. चित्रपटगृहांत राष्ट्रगीतावेळी उभं न राहिल्यामुळे प्रेक्षकांमध्ये वादावादीचे बरेच प्रकार घडले होते.

केंद्र सरकारच्या भूमिकेनंतर सुप्रीम कोर्टाने 30 नोव्हेंबर, 2016 रोजी दिलेल्या एका आदेशाद्वारे सर्व चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणं सक्तीचं केलं होतं.

मात्र केंद्र सरकारने सोमवारी कोर्टात नवी भूमिका मांडत राष्ट्रगीताबाबत नवे नियम तयार करण्यासाठी मुदत मागितली. तोपर्यंत आपला राष्ट्रगीतसक्तीचा निर्णय स्थगित करावा, अशी विनंती केली होती. तसंच सहा महिन्यांत राष्ट्रगीताचे नवे नियम तयार करण्यात येतील, असं प्रतिज्ञापत्र केंद्राने सुप्रीम कोर्टात दिलं आहे.

या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने हा निर्णय दिला.

दरम्यान, या निर्णयाबाबत आम्ही वाचकांना विचारलं होतं -

त्यावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी या काही निवडक प्रतिक्रिया. अनेक वाचकांनी सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीताच्या सक्तीला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी सिनेमा पाहताना राष्ट्रगीताची किंवा राष्ट्रभक्तीची काय गरज, असा सवाल केला आहे.

सचिन पोटरे यांना वाटतं की, राष्ट्रगीत ऐकून सर्वसामान्यांमध्ये देशप्रेम वाढेल. तर या उलट, भूषण गवळी यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे - "जर राष्ट्रगीत लावल्यानं लोकांमध्ये देशभक्ती जागृत होत असेल तर सिनेमा हॉल मध्ये कधी न गेलेल्या लोकांचं काय?"

Image copyright Facebook

सक्ती केलीत तर त्याचा विरोध म्हणून काही प्रेक्षक राष्ट्रगीताच्या वेळेस उभारणार नाहीत. सक्तीच्या नावाखाली जर असाच आपल्या राष्ट्रगीताचा अपमान होणार असेल तर त्या सक्तीचा काहीच अर्थ नाही, असं मयूर अग्निहोत्री यांना वाटतं.

Image copyright Facebook

"दोन मिनिटं राष्ट्रगीतासाठी उभं राहणं जड जात असेल तर स्वतःला भारतीय म्हणून घेणं चूक आहे," असं मत हर्ष मराठे यांना व्यक्त केलं आहे. तर मयूर दीक्षित यांनी "मध्यंतरला "वदनी कवळ घेता"ची पण सक्ती करा," अशी उपरोधक प्रतिक्रिया दिली आहे.

"राष्ट्रभक्ती मनापासून असावी, केवळ दाखवण्यासाठी नको," असं सागर नाईक यांना वाटतं. तर "फक्त उभा राहणं म्हणजे देशप्रेम का?" असा प्रश्न चंद्रकांत कांबळे यांनी विचारला आहे.

Image copyright Facebook

तर अनिल बनसोडे यांनी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती "चित्रपटगृहात नको. कारण त्यावेळेस प्रेक्षकांची मानसिकता वेगळीच असते," असं म्हटलं आहे. सोबतंच, "ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती आणि इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी कार्यालय सुरू झाल्यावर राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे," असंही म्हटलं आहे.

सचिन पाटील यांना वाटतं की राष्ट्रगीताची सक्ती असायलाच हवी. "तिकिटाच्या लायनीत तासभर उभे राहाल पण राष्ट्रगीतसाठी 52 सेकंद उभं राहू शकत नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)