पाहा फोटो : जेव्हा चर्चगेटच्या पुढे होतं कुलाबा स्टेशन!

colaba Image copyright Western Railway
प्रतिमा मथळा कुलाबा स्टेशनची बिल्डिंग

आज चर्चगेट स्टेशन 148 वर्षांचं झालं. म्हणजे 10 जानेवारी 1870ला प्रथम इथून रेल्वे धावली होती.

पश्चिम रेल्वेचं अंतिम स्टेशन असणाऱ्या चर्चगेटला आज मान आहे. पण त्या आधी हा मान कुलाबा स्टेशनचा होता.

आजही चर्चगेटचा तो मान आहेच, पण इतिहासात हरवलेल्या कुलाबा स्टेशनचं काय झालं? जाणून घ्या...

कुलाबा टर्मिनस

कुलाबा स्टेशनची शान काही औरच होती. पूर्वीच्या बॉम्बे, बडोदा अॅण्ड सेंट्रल इंडिया (BB&CI) म्हणजे आताच्या पश्चिम रेल्वेचं कुलाबा हे टर्मिनस होतं.

चर्चगेटच्या पुढं दोन छोटे प्लॅटफॉ़र्म, पादचारी पूल, दक्षिणेकडं लेव्हल क्रॉसिंग, अशी त्याची रचना होती.

चर्चगेटच्या पुढं म्हणजे आता जिथे इरॉस थिएटर आहे तिथून हा मार्ग जायचा.

आता इरॉसलगत आर्ट डेको बिल्डिंगची रांग आहे.

द वुडहाऊस रोडवरून जाणारी ही रेल्वे लाईन मोठ्या रेल्वे यार्डात संपायची. आता त्या जागेवर बधवार पार्क आहे.

हे बधवार म्हणजे, भारतीय रेल्वे बोर्डाचे पहिले अध्यक्ष फतेहचंद बधवार.

Image copyright Western Railway
प्रतिमा मथळा चर्चगेट स्टेशनच्या बाहेरचं दृश्य

कुलाबा स्टेशन प्रवासी वाहतुकीसाठी 1863मध्ये खुलं झालं.

तर, चर्चगेटहून 10 जानेवारी, 1870 पासून पाच गाड्यांसह वाहतूक सुरू झाली.

बॅकबे रेक्लमेशनसाठी...

पण 1930ला बॅकबे रेक्लमेशन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी कुलाबा स्टेशन बंद करण्यात आलं.

कॉटन ग्रीन हे कापसाच्या व्यापारांचं केंद्र. पूर्वी ते स्टेशन टाऊन हॉल, म्हणजेच, आताच्या हॉर्निमन सर्कलपाशी होतं.

घोड्याच्या मदतीनं खेचली जाणारी ट्राम हेही त्या काळाचं वैशिष्टयं.

कुलाब्यात सध्या जिथं इलेक्ट्रीक हाऊस आहे, तिथंच या ट्रामचं कार्यालय होतं. ही 1863ची गोष्ट.

त्याच वर्षी कुलाबा स्टेशन खुलं झालं.

ट्राम आणि रेल्वे

ट्राम आणि रेल्वे एकाचवेळी पाहणं ही त्याकाळात फारच मजेशीर गोष्ट होती.

हळूहळू कुलाब्याला प्रवासी संख्या वाढू लागली. त्यामुळे छोट्या स्टेशनचं टर्मिनसमध्ये रूपांतर झालं.

Image copyright Western Railway
प्रतिमा मथळा आता चर्चगेटचं हे प्रवेशद्वार बंद झालं आहे.

कुलाब्याचा विस्तार व्हायला तीन दशकं लागली. देखणी स्टेशन बिल्डिंग, रेल्वे यार्ड हे 7 एप्रिल 1896 मध्ये खुलं झालं.

याच वर्षी मुंबईवर प्लेगचं संकट आलं होतं.

44 पैकी 40 फेऱ्या

19व्या शतकाच्या सुरुवातीला विरारला 44 फेऱ्या होत होत्या. त्यापैकी 40 फेऱ्या कुलाब्यातून सुरू व्हायच्या .

1920 मध्ये बॅकबे प्रकल्पानं पुन्हा जोर धरला. बॉम्बे डेव्हल्पमेंट डिपार्टमेंट म्हणजेच, BDDनं बॅकबे रेक्लमेशनचा पुढील टप्पा हाती घेतला.

त्यात कुलाबा स्टेशनचा अडथळा होता. तिथूनच, कुलाबा स्टेशनचा अध्याय संपण्यास सुरुवात झाली.

1928 मध्ये कुलाबा ते बोरिवली या मार्गावर पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली.

Image copyright Western Railway
प्रतिमा मथळा चर्चगेट स्टेशनबाहेरील कुंपण

अखेर, 31 डिसेंबर 1930च्या मध्यरात्री कुलाबा स्टेशनवरून वाहतूक थांबवण्यात आली.

चर्चगेट आता टर्मिनस

1 जानेवारी 1931पासून चर्चगेट हे पश्चिम रेल्वेवरील शेवटचं स्टेशन झालं.

स्टेशन आणि यार्डाच्या जागेवर बधवार पार्क ही रेल्वे अधिकाऱ्यांची सोसायटी बांधण्यात आली. आजही ही सोसायटी तिथं उभी आहेच.

कुलाबा स्टेशनची आठवण म्हणून मूळ लोखंडी कुंपण कायम ठेवण्यात आलं आहे.

(रेल्वेच्या इतिहासाचे अभ्यासक आणि पत्रकार राजेंद्र आकलेकर यांच्या Halt Station India, The Dramatic Tale of Nation's First Line या पुस्तकातील माहितीवर आधारित)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)