छऱ्यांनी डोळे गेले पण तिनं हिंमत सोडली नाही

इंशा मुश्ताक Image copyright BILAL BAHADUR/BBC
प्रतिमा मथळा इंशा मुश्ताक

भारत प्रशासित काश्मीरमध्ये दहावीचे निकाल नुकतेच घोषित झाले. त्यात 62 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दक्षिण काश्मीरच्या शोपियाँ भागातल्या इन्शा मुश्ताकही यंदा दहावी पास झालेल्यांमधली एक आहे. पण इन्शाची गोष्ट इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी आहे.

16 वर्षीय इन्शाची दृष्टी 2016 साली छर्रा लागल्यामुळे गेली. इन्शानं त्या वेळची दहशत आणि शारीरिक दुर्बलेतेवर मात करत दहावीची परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाली.

छर्रे लागल्यामुळे वेदना तर झाल्याच पण त्यानंतर कायकाय बदललं याविषयी बोलताना ती सांगते की, तिला यादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

ती सांगते, "छर्रे लागल्यावर मला अनेक अडचणी आल्या. आधी शाळेत मला एकदा सांगितल्यावर सगळं लक्षात रहायचं. पण छर्रे लागल्यावर मला प्रत्येक गोष्ट अनेकदा विचारावी लागते तेव्हा मला लक्षात राहतं. तरी कधी कधी मी विसरते."

पॅलेटगनमुळे दृष्टी गेली

बुरहान वानी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर जवळजवळ सहा महिने भारताविरोधी झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार झाला. यात 80पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोक जखमी झाले. अनेक लोक पॅलेटगनमुळे जखमी झाले होते. अनेकांची दृष्टी गेली होती.

Image copyright BILAL BAHADUR/BBC

त्यापैकी एक इन्शा. आज इन्शाच्या घरी उत्साहाचं वातावरण आहे. इन्शाच्या अनेक मित्रमैत्रिणींनी तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या यशानंतर घरात उत्साहाचं वातावरण आहे. पण हे यश मिळवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.

छर्रे लागल्यावर इन्शावर दिल्ली आणि मुंबईमध्ये तीन शस्त्रक्रिया झाल्या. इन्शाला चालण्यासाठी आजही दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो.

गणिताची परीक्षा पुन्हा देणार

इन्शा सांगते, "मला माझ्या वडिलांनी निकाल सांगितला. त्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं. त्यानंतर माझ्या अनेक मित्रांनी माझं अभिनंदन केलं. मी खूप खूश आहे."

इन्शाला काही महिन्यांनंतर गणिताची परीक्षा पुन्हा द्यायची आहे. पण ती अकरावीत प्रवेश घेऊ शकते.

Image copyright BILAL BAHADUR/BBC

तिनं गणिताऐवजी संगीत हा विषय घेतला होता आणि दहावीच्या परीक्षेत तोच पेपर दिला होता.

ती सांगते, "जितके मार्क मिळाले आहेत, त्यापेक्षा मला जास्त मार्कांची अपेक्षा होती."

जखमेवर थोडंसं मलम

इन्शाचे वडील मुश्ताक मुलीच्या यशामुळे खूप आनंदात आहेत. त्यांच्या मुलीनं अशक्य वाटत होतं ते केलंय, असं ते म्हणतात.

ते सांगतात, "ती दहावीची परीक्षा उत्तीर्ण होईल अशी मलापण अपेक्षा नव्हती. पण तिनं हे केलं. मला खूप आनंद होत आहे. लोकांचे सारखे फोन येत आहेत आणि ते अभिनंदन करत आहेत. आम्ही सगळे खूप खूश आहोत. इन्शा पास झाल्यामुळे आमच्या जखमेवर थोडंफार तरी मलम लागलं आहे."

इन्शाचे पेपर लिहिण्यासाठी शाळेच्या प्रशासनानं तिच्यापेक्षा खालच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला नेमलं होतं. इन्शाचा तो लेखनिक बनला होता.

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तिचं अभिनंदन केलं आहे आणि हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाइज उमर फारुख यांनी ट्वीटच्याच माध्यमातून इन्शाला शुभेच्छा दिल्या.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे जरूर वाचा