प्रेस रिव्ह्यू : 'आधार'ला मिळणार व्हर्च्युअल कवच!

आधार, केंद्र सरकार
प्रतिमा मथळा आधार कार्डाला आता व्हर्च्युअल कवच मिळणार आहे.

आधार कार्डाच्या गोपनीयतेबाबतत देशभरात चर्चेला उधाण आले असताना, UADAIने आभास ओळख क्रमांकाची अर्थात व्हर्च्युअल आयडीची संकल्पना मांडली. लोकसत्ताने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हा आभासी क्रमांक म्हणजे वापरकर्त्याने दिलेला 16 आकडी क्रमांक राहणार असून, बायोमेट्रिकसह मोबाइल कंपनीसारख्या एखाद्या अधिकृत एजन्सीला हा क्रमांक दिल्यानंतर कुठल्याही पडताळणीसाठी आवश्यक असा नाव, पत्ता आणि छायाचित्र एवढीच माहिती पुरवण्यात येईल.

कुठलाही वापरकर्ता त्याला हवे असतील तितके व्हर्च्युअल आयडी तयार करू शकेल. नवा आयडी तयार झाला की जुना आपोआप रद्द होणार आहे.

या सुविधेमुळे प्रमाणीकरणाच्या वेळी आपला आधार क्रमांक न देण्याचा पर्याय वापरकर्त्याला उपलब्ध होणार आहे. 1 मार्च 2018 पासून व्हर्च्युअल आयडीची संकल्पनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त UADAIनं मर्यादित केवायसीची संकल्पनाही सादर केली आहे. त्यानुसार एखादी विशिष्ट सेवा देणाऱ्या यंत्रणेला वापरकर्त्याचे मर्यादित तपशील दिले जातील.

मुंबईत सापडला क्रूड बाँब

मुंबई सेंट्रलला मेट्रोसाठी खोदकाम सुरू असताना एक क्रूड बाँब सापडल्याने खळबळ उडाली. बाँब निकामी करण्यात आला आहे, अशी बातमी सकाळने दिली आहे.

प्राथमिक पाहणीत बाँब बराच जुना असल्याचं दिसतं, असं बातमीत म्हटलं आहे. हँडमेड बाँब लपवण्याच्या उद्देशाने लपवण्यात आला असावा आणि चार भाग एकत्र करून मोठा बाँब बनवण्याचा प्लॅन असावा, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सकाळनं म्हटलं आहे.

एअर इंडियात आता 50 टक्के परकीय गुंतवणूक

देशातील एकमेव हवाई वाहतूक कंपनीच्या खासगीकरणाला पूर्णविराम देताना केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये 49 टक्के परकीय विमान कंपन्यांना गुंतवणुकीला परवानगी दिली.

Image copyright RAVEENDRAN/Getty Images
प्रतिमा मथळा एअर इंडियात आता 50 टक्के परकीय गुंतवणुक होऊ शकते.

आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून किरकोळ व्यापार क्षेत्रात अर्थात सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीचा मार्ग केंद्र सरकारने मोकळा केला. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात बातमी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरिक्त बांधकाम क्षेत्रही परकीय गुंतवणुकीसाठी पूर्णपणे खुलं करण्यात आलं आहे. सिंगल ब्रँड रिटेलमध्ये सुरू केल्या जाणाऱ्या विक्री केंद्रासाठी 30 टक्के कच्चा माल भारतातूनच खरेदी करणं गुंतवणुकदारांसाठी बंधनकारक असेल.

भिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका-प्रकाश आंबेडकर

संभाजी भिडे यांच्या हस्तकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. लोकसत्ताने यासंदर्भात बातमी दिली आहे.

Image copyright Raju Sanadi
प्रतिमा मथळा संभाजी भिडे

रावसाहेब पाटील नावाच्या व्यक्तीने समाजमाध्यमांवर प्रक्षोभक मजकूर लिहिला. पाटील हा संभाजी भिडे यांचा अनुयायी आहे. राजकीय पक्ष या नात्याने आमचे आणि मुख्यमंत्र्यांचे मतभेद आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की एकमेकांचा खून करावा.

त्यामुळे संभाजी भिडे हे एकप्रकारे हफीज सईदसारखे आहेत, हा आमचा आरोप सत्य असल्याचं सिद्ध होतं असं आंबेडकर यांनी सांगितलं.

राज्यावर आठ लाख कोटींचा बोजा

पायाभूत प्रकल्पांच्या कामासाठी सध्या साडेतीन लाख कोटींचे कर्ज काढले जात आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे आठ लाख कोटींचा बोजा पडणार आहे. सकाळने यासंदर्भात बातमी दिली आहे.

यातच जीएसटी लागू झाल्याने महसुलात घट अपेक्षित असल्यानं राज्याच्या आर्थिक संकटात आणखी भर पडणार आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरात अनेक प्रकल्प सुरू असून, या सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च 3 लाख 41 हजार कोटींचा आहे.

नाण्यांच्या निर्मितीला सरकारचा ब्रेक

भारत सरकारच्या देशभरातील विविध टांकसाळीमधील नाण्यांची निर्मिती सोमवारपासून थांबवण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारने आदेश दिले होते. यानुसार नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद येथील टांकसाळीतील नाण्यांची निर्मिती थांबवण्यात आली आहे. सकाळने याबाबत वृत्त दिले आहे.

नाण्यांचा साठा करणारी गोदामं पूर्णपणे भरलेली असल्यानं नाणेनिर्मिती बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)