माटुंग्याचं महिला राज : केवळ महिला कर्मचाऱ्यांच्या माटुंगा स्टेशनची लिम्का बुकमध्ये नोंद!

  • राहुल रणसुभे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईतलं माटुंगा स्टेशन हे संपूर्णपणे महिला कर्मचारी असलेले भारतातलं पहिलं रेल्वे स्टेशन ठरलं आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्येही झाली आहे.

माटुंगा स्टेशनच्या अधीक्षक ममता कुलकर्णी या 1992 पासून मध्य रेल्वेच्या सेवेत आहेत. त्या मुंबई मंडळातल्या पहिल्या सहाय्यक स्टेशन मॅनेजर आहेत.

"या स्टेशनमध्ये एकूण 41 महिला कर्मचारी काम करतात. यामध्ये 17 तिकिट बुकिंग क्लर्क, 6 रेल्वे सुरक्षा बल, 1 मॅनेजर, 8 तिकिट चेकींग स्टाफ, 5 पॉईंट कर्मचारी, 2 उद्घोषक तसंच 2 सफाई कर्मचारी आहेत. यांचं काम 24x7 असतं," अशी माहिती ममता कुलकर्णी यांनी दिली.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव आल्यानं त्या आनंदात आहेत. त्या म्हणाल्या, "आम्हाला फार आनंद झाला. मी तर इथे सुरुवातीला 12-12 तास बसून काम केलं आहे. आधी थोड्या अडचणी जाणवायच्या. तेव्हा आमचे कर्मचारी रात्री-बेरात्रीही मला कॉल करत. पण आता सहा महिने झाले. आता सर्व सुरळीत झालं आहे."

फोटो कॅप्शन,

हरियाणाच्या रुबी जाठ. त्या आरपीएफमध्ये आहेत

या स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) कर्मचारी रूबी जाठ यांच्याशीही बीबीसीनं संवाद साधला. मूळ हरियाणाच्या असलेल्या रुबी सांगतात, "मला नोकरीत रुजू होऊन दोन वर्षं झाली आहेत. मला मराठी येत नसल्यानं थोडी अडचण होती. मात्र इथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मला सांभाळून घेतलं."

त्या पुढे सांगतात, "आमचं काम तीन शिफ्टमध्ये चालतं - सकाळी 8 ते दुपारी 4, दुपारी 4 ते रात्री 11, रात्री 11 ते सकाळी 8. प्रत्येक शिफ्टमध्ये 2 RPF महिला कर्मचारी ड्युटीवर असतात."

अर्चना माने गेल्या 20 वर्षांपासून माटुंगा स्टेशनवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्या स्टेशनवरील अनेक घडामोडींच्या साक्षीदार आहेत.

फोटो कॅप्शन,

सफाई कर्मचारी अर्चना माने

"मी इथं अनेक स्टेशन मास्तरांबरोबर काम केलं आहे. आता हे पूर्णपणे महिलांचं स्टेशन झाल्यानं मला छान वाटतं आहे," असं त्या म्हणाल्या.

महिला संचलित रेल्वे स्टेशन या मागची भूमिका स्पष्ट करताना, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी म्हणाले की, "माटुंगा हा भाग शिक्षणाचं हब म्हणून ओळखला जातो. इथं अनेक शाळा आणि कॉलेज आहेत. इथल्या प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना प्रेमानं, लाडानं बऱ्याच गोष्टी समजावून सांगते, सांभाळते, त्याचप्रमाणे या मुलांसोबत या महिला कर्मचारी वागतील असाही एक विचार होता."

फोटो कॅप्शन,

महिला कर्मचारी माटुंगा स्टेशनवर तिकीट तपासताना

महिलांच्या सुरक्षेबाबत सांगताना ते म्हणाले की, माटुंगा स्टेशनच्या एका बाजूला माटुंगा वर्कशॉप आहे आणि दुसऱ्या बाजूला दादर स्टेशन आहे. त्यामुळे एखादी अप्रिय घटना जर कधी चुकूनही घडली तर तिथे दोन मिनिटात सुरक्षा कर्मचारी पोहोचू शकतात.

अर्थात, गेल्या सहा महिन्यांत अशी कोणतीही तक्रार माटुंगा स्टेशनमधून आलेली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)