प्रेस रिव्ह्यू : 'मुंबईत जागा मागण्याऐवजी सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करा'

नितीन गडकरी Image copyright Getty Images

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाला जाहीर कार्यक्रमात खडे बोल सुनावले आहेत. मुंबईत जागा मागण्याऐवजी पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन लढा, असं वक्तव्य गडकरी यांनी केलं.

"माझ्याकडे नौदलाचे काही अधिकारी आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी दक्षिण मुंबईत जागा मागितली. मी त्यांना एक इंचही जागा देणार नाही. प्रत्येकाला दक्षिण मुंबईत घर हवं आहे. यांना दक्षिण मुंबईत घरं का हवीत? त्यापेक्षा पाकिस्तान सीमेवर जाऊन देशाचं रक्षण का करत नाहीत?" असं वक्तव्य त्यांनी केलं.

गडकरी यांनी ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं त्या कार्यक्रमात नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख आणि वाईस अॅडमिरल गिरीश लुथ्रा हे देखील उपस्थित होते.

नौदलानं मुंबईतल्या मलबार हिल इथे तरंगती जेट्टी बांधण्यास नुकताच विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी हे विधान केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

पाच लाख भारतीयांना ग्रीन कार्डची प्रतीक्षा

महाराष्ट्र टाइम्समधील वृत्तानुसार, गुणवत्तेनुसार नागरिकत्व बहाल करणाऱ्या ग्रीन कार्डची संख्या तब्बल ४५ टक्क्यांनी वाढवण्यास परवानगी देणारं विधेयक गुरुवारी अमेरिकेच्या संसदेत सादर झाले.

Image copyright Getty Images

या विधेयकाचा फायदा भारतीयांना होणार आहे. एका अंदाजानुसार, सध्या पाच लाख भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असून दरवर्षी आपल्या एच-१बी व्हिसाची कालमर्यादा वाढवत आहेत. यापैकी काहीजण दशकांपासून ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

इंदू मल्होत्रांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी थेट नियुक्ती

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, ज्येष्ठ विधीज्ञ इंदू मल्होत्रा यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून थेट नियुक्ती करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय समितीनं बुधवारी त्यांच्या नावाची घोषणा केली.

Image copyright Getty Images

मल्होत्रा या सुप्रीम कोर्टातल्या आतापर्यंतच्या सातव्या महिला न्यायाधीश आहेत. मात्र, बार असोसिएशनमधून थेट नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)