मोदी समर्थकाची भाजप मंत्र्यांसमोरच विष घेऊन आत्महत्या

प्रकाश पांडे Image copyright Prakash Pandey

देहरादूनमध्ये लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी उत्तराखंडचे कृषी मंत्री सुबोध उनियाल यांनी जनता दरबार बोलावला होता. त्याच वेळी प्रकाश पांडे नावाचे एक व्यवसायिक आले आणि त्यांनी विष प्यायलं आहे हे सांगितलं. त्यांना ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तीन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला.

नोटाबंदी आणि GSTमुळं माझ्या व्यवसायात मंदी आली आणि त्यामुळं मी विष घेत असल्याचं प्रकाश पांडे यांनी बीजेपी कार्यलयात सांगितलं होतं.

दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचे मीडिया सल्लागार रमेश भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं या घटनेची न्यायलयीन चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे पर्याय शोधत असल्याचंही ते म्हणाले.

प्रकाश पांडे यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या पत्नी कमला पांडे या बीबीसीशी बोलताना सांगितलं, "व्यवसाय आधीच बंद पडला होता, आता तेही गेले. आता तर सगळं काही संपलं आहे. कुणीतरी त्यांची विनवणी ऐकायला पाहिजे होती."

Image copyright PRAKASH PANDEY

त्या पुढे सांगतात, "चांगलं काम करणाऱ्याला कुणी विचारत नाही. पण वाईट काम करणारे आपल्या मुलांबाळांबरोबर सुखानं राहत आहेत, आता तर असंच म्हणावं लागेल."

पती इतक्या दडपणात आहेत की ते असं एकेदिवशी अचानक सोडून जातील, याची त्यांना चाहूलही लागली नाही, याचं पांडे यांच्या पत्नीला खूप वाईट वाटतं.

"एवढ्या सगळ्या आर्थिक अडचणीनंतर ते घरी सगळयांना हसत-खेळत बोलायचे. व्यवसायातली मंदी आणि कर्जबाजारीपणामुळे ते आतून तुटले होते, याची जाणीवही कुणाला होऊ दिली नाही."

नोटबंदी आणि जीएसटीमुळं व्यवसाय मंदावला

एका व्हीडिओमध्ये प्रकाश पांडे यांनी नोटाबंदी आणि GSTमुळं त्यांच्या व्यवसायात मंदी आल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियामध्ये हा व्हीडियो खूप शेअर केला जात आहे.

उत्तराखंडमधील हल्दवानीमध्ये राहणाऱ्या प्रकाश पांडे यांनी 8-9 वर्षांपूर्वी ट्रांसपोर्टचा व्यवसाय सुरू केला होता. हळूहळू कारभार वाढत गेला आणि एका गाडीनं सुरुवात करत त्यांनी चार गाड्या खरेदी केल्या.

सहसा हे व्यवसायिक या गाड्या कर्ज घेऊन खरेदी करतात. पांडे यांनीही तेच केलं होतं.

त्यांच्या पत्नी सांगतात की, "दीड वर्षांपूर्वी सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. कर्जाचे हफ्ते वेळेवर जात होते. काही तणाव नव्हता. पण नोटाबंदीनंतर कामकाज कमी होत गेलं."

त्यांच्या पत्नीलाही हेच कारण वाटतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी संध्याकाळी अचानक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली होती.

त्याचबरोबर केंद्र सरकारनं संपूर्ण देशात एक कर प्रणाली लागू करण्यासाठी 1 जुलै 2017 पासून GST (वस्तू आणि सेवा कर) कायदा लागू केला.

दरम्यान नोटाबंदीमुळं व्यवसायावर परिणाम झाल्यानं त्यांनी यासंबंधी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पांडे यांनी पत्र लिहीलं होतं.

मोदी समर्थक आणि विरोधक

प्रकाश पांडे फेसबुकवर सक्रीय होते. त्यांच्या फेसबुकवरील पोस्टवरून ते नरेंद्र मोदींचे चाहते होते, हे स्पष्ट होते.

नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यावर पांडे यांनी फेसबुकवरून या निर्णयाचं समर्थन केलं होतं. व्यवसायात अडचणी आल्या तरी आपण मोदींच्या निर्णयाचं स्वागत करू, असं त्यांनी लिहीलं होत.

12 डिसेंबर 2016 रोजी लिहीलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहीलं होतं की, "आदरणीय मोदी जी, नोटबंदी में हम आपके साथ है!"

पण काही काळानंतर त्यांनी या निर्णयाचा नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. मे 2017 मध्ये त्यांनी पहिल्यांदा फेसबुकवर लिहीलं होतं, की सरकारनं यावर लवकर पाऊलं उचलावीत.

त्यांनी आपल्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचं त्यांच्या पत्नी कमला पांडे यांनी सांगितलं.

विष पिऊन व्हीडिओ पोस्ट केला होता?

प्रकाश पांडे यांनी विष पिऊन एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये ते मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांच्या विशेष सेवा अधिकाऱ्याबरोबर खूप दिवसांपासून संपर्कात होते आणि व्यवसायातल्या अडचणी त्यांना वारंवार सांगितल्या होत्या, असं ते म्हणाले होते.

या व्हीडिओमध्ये, "मी सरकारी विभागात अडकलेले पैसे मागत होतो. बीजेपी सरकारने नाकीनऊ करून सोडलं आहे. व्यवसायिकांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं आहे. मी विष प्यायलं आहे. आता मी वाचेन असं वाटत नाही. पण मला वाटतं की दुसऱ्या व्यवसायिकांबरोबर असं घडू नये," असं ते म्हणाले होते.

मृत्यूची चौकशी होणार?

दरम्यान, उत्तराखंड सरकार प्रकाश पांडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचे मीडिया सल्लागार रमेश भट्ट यांनी बीबीसीशी सांगितलं की, "उत्तराखंड सरकार आणि मुख्यमंत्री यांना या घटनेबद्दल वाईट वाटत आहे. सरकार हे त्यांच्या परिवाराला मदत करण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे. तसंच संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल."

ते पुढं म्हणाले, "मृताचा (प्रकाश पांडे) याअगोदर विष पिणार असल्याचा व्हीडिओ प्रसारीत झाला होता. त्यानंतर त्यांना बीजेपी मुख्यालयाकडं कुणी आणलं हा चौकशीचा विषय आहे. ते कुणाच्या राजकीय षडयंत्राचा बळी तर ठरले नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे."

'सरकारनं गंभीर विचार केला पाहिजे'

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यानुसार, GST आणि नोटाबंदीमुळं प्रकाश पांडे यांनी केलेली आत्महत्या हा सरकारला इशारा आहे.

Image copyright Twitter

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "हे एक प्रकारे आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. प्रकाश यांनी आपल्या जबाबात नोटाबंदीमुळं व्यवसायात मंदी आणि GSTमुळं त्रासल्यानं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे."

"त्यांनी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि आणखी काही ठिकाणी विनंती केली. पण त्यांचं कुणी न ऐकल्यानं शेवटी आत्महत्या केली. मध्यमवर्ग हा GST आणि नोटाबंदीमुळं त्रासला आहे. यावर गंभीर विचार केला पाहिजे जेणेकरून अजून कुणी असं पाऊल उचलणार नाही," असंही रावत पुढे म्हणाले.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)