कोण हे चार न्यायमूर्ती ज्यांनी सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित केले?

सुप्रीम कोर्ट Image copyright Supreme Court
प्रतिमा मथळा न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ

इतिहासात पहिल्यांदाच, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी माध्यमांसमोर येऊन सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात सुरू असलेल्या अनियमिततेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली.

या न्यायाधीशांमध्ये जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश आहे.

जाणकारांनी या घटनेला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक म्हटलं आहे. कोण आहेत हे चार न्यायाधीश, ज्यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या आवारात ही पत्रकार परिषद घेतली.

न्या.जे. चेलमेश्वर

जे चेलमेश्वर यांचा 23 जुलै 1953 रोजी आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात जन्म झाला. चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यानंतर आंध्र विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा न्यायमुर्ती जे. चेलमेश्वर

13 ऑक्टोबर 1995 रोजी चेलमेश्वर यांची अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशाची भूमिका बजावल्यानंतर 2011 साली ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाले.

न्या. रंजन गोगोई

18 नोव्हेंबर 1954 साली जन्मलेले रंजन गोगोई 1978 साली वकील झाले. गुवाहाटी उच्च न्यायालयात दीर्घकाळ वकिली केल्यानंतर त्यांची 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

त्यानंतर 9 सप्टेंबर 2010 साली त्यांची बदली पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात झाली. आणि 23 एप्रिल 2012 रोजी ते सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झाले.

सौम्या खून खटल्यावर ब्लॉग लिहिण्यावरून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमू्र्ती मार्कंडेय काटजू यांना सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्या खंडपीठात न्या. रंजन गोगोई यांचा समावेश होतो.

न्या. मदन भीमराव लोकूर

न्या. मदन लोकूर यांचा जन्म 31 डिसेंबर 1953 साली झाला. दिल्लीच्या मॉडर्न स्कूल मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर लोकूर यांनी दिल्ली विद्यापीठातल्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासाची पदवी घेतली. आणि 1977 साली दिल्ली विद्यापीठातूनच कायद्याची पदवी घेतली.

त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टात वकिली केली. त्यांनी 1981 साली परीक्षा उत्तीर्ण केल्यावर त्यांची सुप्रीम कोर्टात Advocate on record म्हणून नोंदणी झाली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सुप्रीम कोर्ट

सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिट्युशनल लॉ, आणि रेवेन्यू आणि सर्व्हिस लॉ विषयांमध्ये लोकूर तज्ज्ञ आहेत. डिसेंबर 1990 ते 1996 या काळात त्यांनी केंद्र सरकारचे अधिवक्ता म्हणून काम केलं आहे तसंच अनेक खटल्यांमध्ये केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व केलं आहे.

1997 साली ते ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले. त्यांना 4 जून 2012 रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं.

न्या. कुरियन जोसेफ

न्या. कुरियन जोसेफ यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1953 रोजी केरळमध्ये झाला. त्यांना तिरूवनंथपूरमच्या केरळ लॉ अॅकेडमी लॉ कॉलेज मधून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1977-78 साली ते केरळ विद्यापीठातून अॅकेडमिक काउंसिलचे सदस्य झाले.

1979 साली केरळ उच्च न्यायालयात वकिली सुरू केल्यानंतर 1987 साली सरकारी वकील झाले. 1983-85 पर्यंत कोच्ची विद्यापीठात सिनेट सदस्य होते. आणि 1994-96 ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम बघितलं.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा न्यायाधीश कुरियन जोसेफ

1996 साली त्यांची ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली आणि 12 जुलै 2000 रोजी ते केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.

2006 ते 2008च्या दरम्यान ते केरळ न्यायिक अॅकादडमीचे अध्यक्ष झाले. 2008 साली लक्षद्वीप लीगल सर्व्हिस अॅथोरिटीचे ते अध्यक्ष झाले.

त्यांनंतर 8 फेब्रुवारी 2010 ते 7 मार्च 2013 साली ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांनंतर लगेच 8 मार्च 2013ला न्या. कुरियन सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश झाले.

येत्या 29 नोव्हेंबर 2018ला ते निवृत्त होणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)