'ओेsssकाट!' : संक्रांतीला या 7 गोष्टींमुळे नागपूरचं होतं पतंगपूर!

नागपुरात संक्रांत म्हणजे पतंगबाजी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नागपुरात संक्रांत म्हणजे पतंगबाजी

मकरसंक्रांत म्हटलं की सगळीकडे संक्रमणाचं वातावरण असतं. असं म्हणतात की या दिवशी सूर्य मकर राशीत जातो पण नागपूरच्या मुलांचं संक्रमण घरातून गच्चीत होतं.

जानेवारीच्या सुरुवातीपासूनच संध्याकाळी 4 वाजेपासून 'ओेsssकाट' आणि 'ओेsssपार' च्या आरोळ्या ऐकू येतात. जसजशी संक्रांत जवळ येते तसंतसा या आरोळ्यांचा आवाज वाढू लागतो.

आणि 14 जानेवारीला हा उत्साह शिगेला पोहोचतो. पण पतंगीच्या शौकिनांसाठी या तारखेपूर्वीची तयारी कुठल्याही लग्नघरामधल्या लगबगीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या नागपूरच्या संक्रातीला होणाऱ्या पतंगबाजीविषयी.

1. रात्रभर मांजा घोटणं

मांजा घोटणं म्हणजे पतंग उडवण्याच्या दोऱ्यावर काचेचा थर चढवणं, त्या दोऱ्याला धार लावणं. पतंगबाजांसाठी मांजा घोटणं एक मोठा सोहळाच असतो, अगदी लग्नापूर्वीच्या हळदीच्या कार्यक्रमासारखा.

आणि त्यासाठी नागपूरचे मोठे रस्ते आणि तिथले विजेचे खांब कायम कामास येतात.

आधी बाजारातून सीरस नावाच्या पदार्थ वितळवून त्याला काचेच्या चुऱ्यात गरम करतात. त्याला आवडीचा रंगही दिला जातो. आणि मग थंड झाल्यावर या पातळ मिश्रणात पांढरा मांज्याचं बंडल बुडवतात. आणि मग दोन खांबांमध्ये हा मांजा ताणून त्याला वाळू देतात. संध्याकाळी सुरू होणारा हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालतो.

आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी हा मांजा मग चक्रीत गुंडाळला जातो.

जितके जास्त थर, तितका मजबूत आणि धारदार मांजा. हल्ली बाजारात 'तीन तार', 'नऊ तार' असे अनेक प्रकार मांज्यात येतात, पण घोटलेल्या मांज्याचं एक आगळंच महत्त्व असतं.

जशी एखाद्या योद्ध्यासाठी त्याच्या तलवारीची धार, अगदी तसाच एका पतंगबाजासाठी त्याचा मांज्याची धार त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो.

2. चिनी नायलॉन आणि बरेली

एखादी पतंग कटली आणि घोटलेला मांजा वाया गेला तर त्या दु:खाला पारावार नसतो.

आणि इतर वस्तूंसारखंच या मांजाच्या उद्योगातही चीनने हात घातला आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या चीनी नायलॉन मांजानं देशी मांजाच्या पतंगी जास्त वेळ टिकत नव्हत्या. म्हणून लोकांचीही त्याला पसंती होती.

पण या न तुटणाऱ्या मांजानं गेल्या काही वर्षांत अपघातही वाढत गेले. म्हणून नायलॉनच्या मांज्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. तरीसुद्धा सहा तार नऊ तार या मांज्याचा एक वेगळाच माज आहे.

याबद्द्ल बोलताना पतंगबाजीची आवड असणारे नागपूरचे अनिरुद्ध येनस्कर सांगतात की, "आधी तर संक्रांतीच्या दोन दिवसांआधीच मांजा घोटून तयार असायचा. आता कालानुरूप मांज्याच्या प्रकारात बदल होत आहेत. बरेली पण घोटलेल्या मांज्याची एक वेगळीच मजा असायची. "

3. पतंगाची निवड

या सणात पतंगांची निवड करणं सगळ्यांत महत्त्वाची प्रक्रिया आहे. पतंगांचे अनेक प्रकार असतात अगदी लहान पतंगांपासून ते अजस्त्र ढोलपर्यंत विविध प्रकार असतात.

त्यात चांददार, गोलेदार, चील, खडा सब्बल आणि टोकदारसारख्या डिझाईनर कागदी पतंगी, आणि लवकर न फाटणारी प्लास्टिकची झिल्ली, हे सर्वाधिक ओळखले जाणारे प्रकार. गल्लोगल्ली पतंगांची दुकानं लागतात. आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी बाजारात पतंगबहाद्दरांची गर्दी होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काही पतंगांची दुकानं रात्रभर सुरू असतात

जसा हिरा पारखणारा जोहरी असतो, तसंच पतंग खरेदी करायलाही एक जाणकार व्यक्ती लागतो. तो वेगवेगळ्या पतंगांचा आकार, दर्जा, घासघीस केल्यानंतर काही निवडक पतंगांचा गठ्ठा घरी नेतो. मग सगळ्या पतंगांना सुत्तर बांधण्याचा आणखी एक मोठा सोहळा पार पडतो. आणि मग रणशिंग फुंकलं जातं.

मकरंद नाफडे हे अगदी लहानपणापासूनचे पतंगवीर. सध्या ते नोकरी करतात, पण आजही संक्रांतीला ते आवर्जून सुटी घेतात. ते सांगतात "हल्ली आधीसारखा वेळ मिळत नाही. पण तरी मी वेळ काढतो. आधी मी अख्खा जानेवारी महीना पतंग उडवायचो. पण आता तर वीकेंडलाच पतंग उडवतो."

ते पुढे सांगतात, "आता पतंगांचा खर्च देखील वाढला आहे. आम्ही दोन तीन लोक मिळून पतंग उडवतो. त्यामुळे दोन ते तीन हजार रुपयांची पतंग खरेदी करतो."

4. प्रत्यक्ष दिवस

प्रत्यक्ष दिवस हा तर अत्यंत गजबजलेला असतो. डोळ्यांवर चष्मा, डोक्यावर टोपी आणि बोटांना चिकटपट्ट्या लावून सगळे पतंगवीर अगदी सकाळपासूनच घराच्या गच्चीवर असतात. ज्यांच्या घरांना गच्ची नाही, ते थेट जवळचं मैदान गाठतात.

आधी ते वाऱ्याचा अंदाज घेतात, मग पहिली पतंग झेप घेते. मग पेचा लागते आणि मग खरी रंगत येते. खऱ्या पतंगबाजाचं कौशल्य या क्षणाला पणाला लागलेलं असतं. साथीला डीजेचा दणदणाट, गाण्यांचा धडाका आणि चक्री पकडणारा साथीदार असतो.

पतंग फाटला तर चिकटवायला आदल्या दिवशीचा भात असतो. हे सगळं होत असताना घराघरातून तीळगूळाचा सुगंध दरवळत असतोच. घरांच्या गच्चींवरून शीतयुद्ध झडत असतात.

मधूनच एखादी कटलेली पतंग वाऱ्यावर तरंगत गच्चीवर येते. ही पतंग पकडण्याचा आनंद तर एकदम भारीच असतो. एक तर फुकट पतंग आणि मांजा मिळतो. मांजा चांगला असेल तर तोच मांजा चक्रीवर लपेटला जातो.

5. स्पेशल तिरंगा पतंग

जेव्हा पेचा लागते तेव्हा पतंग उडवणाऱ्याला आणखी कशाचीही पर्वा नसते. एका दिवसात किती पतंग कापल्या, आपल्या किती पतंग कापल्या गेल्या, याचा हिशोब होतो.

दिवसाअखेरीस मांजा धरून, ओढून बोटं कापलेली असतात. त्या कापलेल्या बोटांना मलम लावलं जातं, आणि बोटांवर चिकटपट्ट्यांची जागा बँडएड घेतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तिरंगा पतंग

तसं तर नागपूरच्या आकाशात महिन्याभराआधीरपासूनच पतंग दिसू लागते. पण 14 जानेवारीच्या शिगेच्या क्षणानंतर हा उत्सव अखेर 26 जानेवारीला संपतो. यादिवशी उडवण्यासाठी विशेष तिरंगा पतंग मिळतात.

6. संक्रांतीवरही संक्रांत

नागपुरात संक्रांतीला पतंगबाजी कितीही उत्साहात असली तरी त्यानं काहींना त्रासही होतो. गच्च्यांवरून अनेकांचा तोल जाऊन मृत्यू होतो, आणि मांज्याने तर दुचाकीचालकांचा अनेकदा चक्क गळा कापला जातो. म्हणूनच नागपुरातले मुख्य उड्डाणपूल या सणाला बंद ठेवले जातात.

मांज्याने अनेक पक्षीसुद्धा जखमी होतात, काहींचा मृत्यूही होतो. त्यांच्यासाठी पक्षीमित्र विशेष कँप स्थापित करतात.

7. 'पतंगबाजीमुळे चष्मा लागला'

पण नागपुरातली अनेक मंडळी आता कामासाठी बाहेरगावी असल्याने, तसंच गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या नवनव्या निर्बंधांमुळे आता पतंगबाजीचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत आहे.

मूळ नागपूरच्या महाल भागातले अनिरुद्ध येनसकर आता पुण्यात एका IT कंपनीत नोकरी करतात. ते सांगतात, "आता मी नागपूरची संक्रांत खूप मिस करतो. इथे काही कंपन्यांमध्ये काईट फ्लाईंग फेस्टिवल आयोजित केला जातो. पण त्या गच्चीच्या 'ओsssकाट'ची मजा त्यात नाही."

"आजही माझ्या घरी एक चक्री आणि एक पतंग आहेच," अत्यंत उत्साहात सांगत होते. पतंगबाजीने काही दुष्परिणाम झाले का? ते हसत सांगतात, "हो ना! मला चष्माच त्यामुळे लागला."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)