पानिपतचे रोड मराठा, जे लढाईनंतरही हरियाणात थांबले

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ पानिपतावर शौर्यदिवस साजरा करणारे हे मराठे कोण?

तुम्ही कधी भूपिंदर भोसले आणि सतिंदर पाटील अशी नावं ऐकली आहेत का? शक्यता तशी कमीच आहे. कारण अनेक जणांना हरियाणातील रोड मराठा समाजाविषयी माहीत नाही. हरियाणातील रोड समाजाला नवी ओळख मिळवून देणारी कथा ही त्यांच्या अस्तित्वात येण्याच्या कथेसारखीच रोमांचक आहे.

हे सगळं सुरू झालं 257 वर्षांपूर्वी! जेव्हा सध्याच्या हरियाणातल्या पानिपत इथं सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दाली याच्याशी युद्ध करण्यासाठी पोहोचलं होतं.

14 जानेवारी 1761ला झालेल्या या युद्धात मराठा सैन्य पराभूत झालं. या युद्धात जवळपास 40,000 ते 50,000 मराठा सैनिक मारले गेल्याचं म्हटलं जातं.

Image copyright Facebook/CSVP
प्रतिमा मथळा 14 जानेवारी हा दिवस रोड मराठा शौर्यदिवस म्हणून साजरा करतात.

"काही मराठा सैनिकांनी तिथून पळ काढला. ते आजूबाजूच्या परिसरात लपून राहिले. मराठा म्हणून ओळखले जाऊ, अशी भीती त्यांच्या मनात होती. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी या परिसरातील एक राजा रोडच्या नावानं स्वतःची ओळख करून देण्यास सुरुवात केली," अशी माहिती इतिहासतज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी दिली.

Image copyright RAVINDRA MANJREKAR/BBC
प्रतिमा मथळा पानिपत इथं उभारण्यात आलेलं युद्ध स्मारक

मोरे यांनी रोड मराठ्यांवर दहा वर्षं संशोधन केलं आहे.

"रोड समाजाला त्यांच्या मुळाविषयी माहिती नव्हती. पण त्यांनी आपल्या प्रथापरंपरा जपण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. या समाजातील अनेक प्रथा या महाराष्ट्रातील परंपरांशी मिळत्याजुळत्या आहेत. काही मराठी शब्द त्यांच्या बोलण्यातून आजही येतात," असं ते म्हणाले.

मोरे म्हणतात, 'आईन-ए-अकबरी'मध्ये रोड समुदायाचा उल्लेख सापडत नाही. पानिपतच्या युद्धानंतरच त्यांचे सर्व संदर्भ सापडतात.

अशी मिळाली नवी ओळख

नफेसिंग यांचा पानिपत इथं हँडलूमचा व्यवसाय आहे. ते 72 वर्षांचे आहेत. त्यांना मराठी भाषा माहीत नाही किंवा त्यांनी कधी महाराष्ट्राला भेटही दिलेली नाही. पण महाराष्ट्रातून आलेले लोक भेटले की ते आनंदीत होतात.

Image copyright BRITISH LIBRARY
प्रतिमा मथळा पानिपतच्या युद्धाचं चित्र

"1761च्या युद्धानंतर मराठे महाराष्ट्रात परतले. त्यातील जवळपास 250 कुटुंबं कुरुक्षेत्र आणि करनालच्या जंगलात मागे राहिली. जर कुणी त्यांना त्यांची ओळख विचारली तर ते राजा रोडची ओळख सांगायचे. हीच ओळख पुढं कायम राहिली. नंतरच्या काळात पुढच्या पिढ्या त्यांची मूळ ओळख विसरून गेले," नफेसिंग सांगतात.

"आम्ही मूळचे महाराष्ट्राचेच आहोत. आमचे पूर्वज हे महाराष्ट्रातील आहेत. जाट, राजपूत किंवा उत्तर भारतातील इतर समाजांत आमचे कूळ सापडत नाही," असं ते म्हणाले.

Image copyright MANOJ DHAKA/BBC
प्रतिमा मथळा पानिपतचे रोड मराठे

"2000नंतरच आम्हाला आमची मूळ ओळख कळाली. माजी सनदी अधिकारी विरेंद्रसिंह यांनी रोड समाजाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. कोल्हापुरातील इतिहासतज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी त्यांची मदत केली," नफेसिंग सांगतात.

डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या 'रोड मराठोंको इतिहास' या पुस्तकानंतर त्यांना वयाच्या 50व्या वर्षी नवी ओळख मिळाली.

रोड मराठ्यांची संख्या किती?

आज रोड स्वतःची ओळख गर्वाने 'रोड मराठा' अशी करून देतात. पानिपत, सोनिपत, करनाल, कैथल, रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड मराठा समजाची चांगली संख्या आहे. रोड मराठ्यांची निश्चित अशी लोकसंख्या माहिती नसली, तरी डॉ. मोरे यांच्या माहितीनुसार हरियाणात या समाजाची संख्या सहा ते आठ लाख असावी.

Image copyright Niranjan Chhanwal/BBC
प्रतिमा मथळा पानिपत युद्ध स्मारकाच्या प्रांगणात असलेला स्तंभ.

नवी ओळख प्राप्त झाल्यानंतर रोड मराठा एका व्यासपीठावर आले आहेत. 'मराठा जागृती मंच'ने समाजातील तरुणांसाठी करनाल आणि पानिपत इथं हॉस्टेलही सुरू केले आहेत.

इथले नागरिक सुलतानसिंह म्हणाले, "हा मंच रोड मराठ्यांच्या इतिहासाबद्दल जनजागृती करण्याचं काम करत आहे."

रोड मराठ्यांची संख्या जास्त असल्यानं आणि ही लोकसंख्या एका ठराविक क्षेत्रातच केंद्रीत असल्यानं राजकारण्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागत आहे.

स्थानिक पत्रकार मनोज ढाका सांगतात, "आता रोड मराठा समाज राजकीय रूपात आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळंच सर्वच पक्षांचे राजकीय नेते रोड मराठ्यांच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात."

Image copyright NIRANJAN CHHANWAL/BBC
प्रतिमा मथळा विविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या झेंड्यांवर शिवाजी महारांजांचे छायाचित्र असते.

महाराष्ट्रातील राजकीय नेतेही इथं येऊन गेले आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, खासदार संभाजीराजे छत्रपती असे काही नेते या कार्यक्रमांना येऊन गेले आहेत.

शिवाजी महाराजांविषयी प्रेम

रोड मराठ्यांची भाषा हिंदी आहे. त्यांचं जेवण हरियाणवी असतं आणि हरियाणवी उत्सव ते साजरे करतात. ते हरियाणातील परंपरेनुसारच कपडे आणि पगडी परिधान करतात. पण त्यांसाठीचे त्यांचे शब्द मात्र मराठी आहेत, हे मात्र विशेष.

रोड मराठा समाजाच्या बोलीमधील अनेक शब्द हे मराठी आहेत. उदाहरणात ते फेट्याला फटका म्हणतात. याशिवाय कवाड, लाड्डू, म्हैस, ससा, कधी, थांबले, दुपार, कुचेष्टा, माहिती, रामराम, जाता, गोधडी, काठी, परात, पाहुणा, धार काढणे असे अनेक शब्द त्यांच्या बोलीत आहेत.

Image copyright MANOJ DHAKA/BBC
प्रतिमा मथळा पानिपतच्या युद्ध स्मारकाच्या प्रांगणात जमलेले मराठा

विवाहातील प्रथाही महाराष्ट्रातील प्रथा यांच्यात साधर्म्य आहे. विशेष समारंभात ते पुरणपोळी केली जाते. इथं सामूहिक जेवणाला भंडारा असा शब्द आहे.

असं असलं तरी त्यांची आडनावं मात्र मराठी आहेत. पवार, चव्हाण, भोसले, सावंत, घोले, दाभाडे, बोडले, जोंधळे आणि शेलार अशी आडनावं या समाजात दिसतात. त्यांच्या नावात आता 'मराठा' या शब्दाची भर पडली आहे. ते आता नावाच्या पुढं किंवा नावाच्या मागं 'मराठा' लिहितात.

Image copyright NIRANJAN CHHANWAL/BBC
प्रतिमा मथळा उजवीकडे नफेसिंह तर डावीकडे सुलतानासिंह

रोड मराठ्यांना त्यांच्या इतिहासाचा मोठा अभिमान आहे. शिवाजी महाराजांना वंदन करूनच त्यांचे प्रत्येक कार्यक्रम सुरू होतो. इथल्या तरुणांनी छत्रपती शिवाजी विद्यार्थी परिषदेची स्थापना केली आहे. शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आणि जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड राजा इथं रोड मराठ्यांतील अनेकांनी भेटी दिल्या आहेत.

"आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन काम करतो," छत्रपती शिवाजी विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष गौरव मराठा यानं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

14 जानेवारी शौर्यदिन

पानिपताच्या युद्धात हार पत्कारावी लागलेला १४ जानेवारी हा दिवस रोड मराठा 'शौर्यदिन' म्हणून साजरा करतात.

Image copyright GAURAV MARATHA/CSVP
प्रतिमा मथळा हरियाणातील रोड मराठा

"फक्त रोड मराठाच नव्हे तर जाट, कुर्मी, पटेल हेही यादिवशी पानिपतमधल्या युद्ध स्मारकाला भेट देतात," असं गौरव म्हणाला.

"मराठा सैन्य जरी या युद्धात पराभूत झालं असलं तरी ते शौर्याने लढले. म्हणून हा दिवस आम्ही शौर्यदिन म्हणून साजरा करतो," असं गौरव सांगतो.

युद्धभूमीच्या परिसरात एक युद्धस्मारक बांधण्यात आलं आहे. त्याला काला आंब (काळा आंबा) असं म्हटलं जातं. ही भूमी रक्तानं माखल्यानं आंब्याचं झाड काळं पडलं, असं म्हटलं जातं.

बलकवडे यांचा दुसरा सिद्धांत

प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे रोड मराठ्यांबद्दल वेगळा इतिहास सांगतात. त्यांचा सिद्धांत डॉ. मोरे यांनी मांडलेल्या सिद्धांतापेक्षा वेगळा आहे.

Image copyright RAVINDRA MANJAREKAR/BBC
प्रतिमा मथळा पानिपत युद्ध स्मारक स्थळ

"पानिपताच्या तिसऱ्या युद्धानंतर दहा वर्षांनी महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा केला होता. त्यावेळी त्यांनी पानिपत, सोनिपत, बागपत अशा परिसरावरही कब्जा मिळवला होता. मराठा सैन्य इथं राज्य करत होतं. १८००च्या नंतर मराठ्यांची सत्ता उत्तर भारतात कमकूवत व्हायला लागली. त्यानंतरही काही मराठा सैनिकांनी तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. त्या सैनिकांचेच वंशज हे रोड मराठा म्हणून ओळखले जातात," असं ते म्हणाले.

Image copyright MaNOJ DHAKA/BBC
प्रतिमा मथळा रोड मराठा

रोड मराठ्यांचं कूळ शोधण्यासाठी DNA टेस्ट घेण्यात आली होती का? असा प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. मोरे म्हणतात, "त्याची आवश्यकताच नव्हती आणि DNA टेस्ट झालीच तर ते मी मांडलेल्या इतिहासच सिद्ध होईल."

Image copyright FACEBOOK/CSVP

पण या प्रश्नांशी रोड मराठा समाजातील तरुणांना काही देणंघेणं नाही. ते नवी ओळख मिळाल्याच्या आनंदात आहेत.

शौर्यदिनानिमित्त मोटारसायकल रॅली

या युद्धाची आठवण म्हणून या परिसरात रविवारी शौर्यदिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्तानं करनाल ते पानिपतदरम्यान मोटारसायकल रॅली झाली.

कसा साजरा केला रोड मराठ्यांनी शौर्यदिन... पाहा व्हीडिओ

आपण हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)