ग्राऊंड रिपोर्ट : डहाणूच्या किनाऱ्यावर नेमकं काय घडलं?

डहाणू अपघात Image copyright Prashant Nanaware/BBC
प्रतिमा मथळा पांढरा आणि केशरी रंग असलेली अपघातग्रस्त बोट.

पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या पारनाका किनाऱ्यावर शनिवारी - 13 जानेवारीला बोट पलटून झालेल्या अपघातात 30 जणांना वाचविण्यात यश आलं, पण तीन विद्यार्थिनींचा या अपघातात अंत झाला. या मुलींच्या मृत्यूला जबाबदार कोण - सेल्फी काढणारे विद्यार्थी की विनापरवाना बोट सेवा?

सोनल सुरती, जान्हवी सुरती आणि संस्कृती मायावंशी या के. एल. पोंदा महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन 17 वर्षीय विद्यार्थिनींचा शनिवारच्या अपघातात मृत्यू झाला.

डहाणूच्या मसोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये समोरासमोरील घरात राहणाऱ्या या तरुणींच्या मृत्यूमुळे संपूर्ण आंबेडकर नगरवर शोककळा पसरली आहे.

परीक्षेसाठी महाविद्यालयाला सुट्टी लागणार असल्याने शेवटच्या दिवशी अकरावी आणि बारावीचे काही विद्यार्थी महाविद्यालयासमोरच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर चार-पाच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या बोट सफरीचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. मात्र अपघातानंतर डहाणूच्या किनाऱ्यावर सुरू झालेली ही बोट पर्यटन सेवा अनधिकृत असल्याचं समोर येत आहे.

समुद्रकिनारी बोट पर्यटनासाठी बोटींना महाराष्ट्र मेरीटाईम बोट, नगरपरिषद, स्थानिक पोलिस यांची परवानगी आवश्यक असते. मात्र या बोट मालकांकडे अशी कोणतीच परवानगी नव्हती, अशी माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोटचे बंदर अधिकारी कॅप्टन सी. जे. लेपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. या बोटीच्या सर्व कागदपत्रांची आणि मालकांची तपासणी सुरू असून त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल, असंही लेपांडे म्हणाले.

अपघात नेमका कशामुळे?

अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

Image copyright Prashant Nanaware
प्रतिमा मथळा पोलीस उपनिरीक्षक सचिन पांडकर

प्राथमिक अहवालानुसार सेल्फी घेताना सर्व विद्यार्थी बोटीच्या एका बाजूला आल्याने बोट कलंडल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या मते, 'बोट चालकाने अतिशय जवळच्या कोनातून बोट वळविण्याचा प्रयत्न केल्याने बोटीचा तोल जाऊन बोट कलंडली.' ही माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन पांडकर यांनी बीबीसी मराठीला दिली.

अपघाताच्या वेळी बोटीचे मालक असलेले तीनही आरोपी बोटीवर उपस्थित होते. बोट उलट्यावर त्यांनीदेखील विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी मदत केली. बचावकार्य संपल्यानंतर बोटीचे मालक धीरज अंबिरे आणि पार्थ अंबिरे यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर कलम 304 (अ), 280, 282, 43 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Image copyright Prashant Nanaware
प्रतिमा मथळा महेंद्र अंबिरे या बोटचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिसरा आरोपी बोटचालक महेंद्र अंबिरे याच्यावर डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे सर्वांचा जवाब नोंदवल्यानंतरच अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण कळू शकेल, असंही पांडकर पुढे म्हणाले.

पाच दिवसांपूर्वीच सुरू झाली होती बोट फेरी

चार-पाच दिवसांपूर्वीच ही बोट सेवा सुरू झाली होती. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास या बोटीवर तब्बल 35 जण चढले. परंतु बोट एक ते दीड किलोमीटर अंतर पार करून आत गेल्यावर अचानक बोट उलटली आणि सर्व जण पाण्यात बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सनत तन्ना यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

डहाणू इथेच राहणारे सनत स्वत: आपली पत्नी आणि दोन लहान मुलांसह या सफरीचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी आले होते. परंतु ऐनवेळी बोटीत माणसांची वाढलेली संख्या पाहून त्यांनी समुद्रकिनारीच थांबणं पसंत केलं.

फेसबुकवरून मदतीचं आवाहन

व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या सनत यांनी बोट समुद्रात जाण्यापूर्वी मुलांचे आणि बोटीचे काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. बोट समुद्रात बुडताना समोर पाहिल्यानंतर सनत यांनी ताबडतोब मित्रांना फोनवरून याची माहिती दिली आणि स्वत:च्या फेसबुक अकाउंटवर मेजेज टाकून मदतीसाठीही आवाहन केले. सनत यांनी अपघातापूर्वी काढलेले फोटोही ताबडतोब फेसबुक अकाऊंटवर शेअर केले.

बोट पलटी झाल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर आरडाओरड सुरू झाली. त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी पहिल्यांदा किनाऱ्यावर फिरायला आलेल्या पवन धानमेहेर, साईराज पागधरे, जतीन मंगेला आणि भाविक दवणे या चार तरुणांनी पाण्यात उड्या घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

या चारही मुलांशी आणि सनत तन्ना यांच्याशी केलेल्या थेट बातचीतीचा व्हीडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ज्या बोटीवर हा सर्व प्रकार घडला त्या बोटीमध्ये प्रवासीसंख्या वाढवण्यासाठीही बदल करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. बोटीवर बसण्याच्या सीटवर विशिष्ट उंचीवर आणखीन एक लाकडी फळी टाकून वर अधिक लोकांना उभं राहण्यासाठी डेक तयार करण्यात आला होता. मुळात ही प्रवासी बोट नसतानाही कुणाच्या परवानगीने हे बोट पर्यटन सुरू होते याचा तपास पोलीस करत आहेत.

कारवाईची मागणी

डहाणूच्या किनाऱ्यावर अशा प्रकारची कोणतीच सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध नसल्याने या बोटीला परवानगी कुणी दिली? असा सवाल मृत विद्यार्थिनी जान्हवीचे वडील हरेशभाई सुरती यांनी केला आहे. त्याचप्रमाणे बोटीवर सुरक्षेच्या काय उपाययोजना होत्या याचाही प्रशासनाने शोध घ्यावा आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणीही हरेशभाई यांनी केली आहे.

कोस्टगार्डच्या बोटी बंद

स्थानिक नागरिक विश्वनाथ मर्दे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी बांधवांनी आणि स्थानिक रहिवाशांनी धाव घेतल्याने सर्व विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले. सर्व सरकारी सेवा उशीरा घटनास्थळी दाखल झाल्या. समुद्रकिनारी असलेल्या कोस्ट गार्डच्या तीनही बोटी बंद अवस्थेत पडल्या आहेत. त्या बोटी कार्यरत असत्या तर कदाचित मृत पावलेल्या तीनही मुलींचे प्राण वाचले असते, असंही मर्दे म्हणाले.

बचावलेल्यांना धक्का

या बोटीत एकूण 41 जण होते. त्यापैकी 33 सहलीला आलेले कॉलेजवयीन विद्यार्थी होते. या अपघातात जीव गमावलेल्या संस्कृती मायावंशी हिची जिवलग मैत्रीण वैशाली मायावंशी हिने हा संपूर्ण अनुभव बीबीसी मराठीला सांगितला.

Image copyright Prashant Nanaware/BBC

मैत्रीण गमावल्याच्या आणि थोडक्यात बचावल्याच्या धक्क्यातून वैशाली अद्याप बाहेर आलेली नाही.

अनुत्तररित प्रश्न

या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्याची समाधानकारक उत्तरं उद्याप मिळालेली नाहीत. ते प्रश्न पुढीलप्रमाणे;

- बोटीला परवानगी नसताना ही पर्यटन सेवा गेले आठवडाभर कशी सुरू होती?

- ‎परवाना नसलेली बोट सागरी पोलिसांच्या नजरेत कशी आली नाही?

- ‎जर डहाणू किनाऱ्यावर बोट पर्यटन सुरू झालं होतं, तर त्याची माहिती सार्वजनिकरित्या नागरिकांना का देण्यात आली नाही?

- ‎हा अपघात नेमका कशामुळे झाला - विद्यार्थी सेल्फी काढताना की बोट चालक बोट वळवताना?

- ‎कोस्ट गार्डच्या बोटी नादुरूस्त अवस्थेत का पडून आहेत?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)