अनुज लोयांनी उत्तरं दिली, पण अनेक प्रश्न अनुत्तरित!

न्या. ब्रिजगोपाल लोया Image copyright CARAVAN MAGAZINE
प्रतिमा मथळा न्या. ब्रिजगोपाल लोया

न्यायाधीश ब्रिजगोपाल लोयांचे पुत्र अनुज लोया यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, "माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांच्या मृत्यूबद्दल कुठलाही संशय नाही. या प्रकरणी चौकशी करण्याची माझी मागणी नाही."

अनुज यांनी आधी एका पत्रात वडिलांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याचं लिहिलं होतं. त्याविषयी विचारलं असता ते म्हणाले, "तेव्हा माझ्या मनात भावनिक उलथापालथ सुरू होती. तेव्हा मला गोष्टी समजत नव्हत्या. मला तेव्हा संशय होता, पण आता नाहीये."

ज्या पत्राचा उल्लेख रविवारी करण्यात आला, त्या पत्रात अनुज यांनी लिहिलं होतं, 'मी त्यांना (न्या. मोहित शहा) बाबांच्या मृत्यूसाठी चौकशी आयोग नेमण्याची विनंती केली... माझं किंवा माझ्या कुटुंबाचं काही बरंवाईट झालं, तर सरन्यायाधीश मोहित शहा आणि या कटात सहभागी असलेले इतर त्याला जबाबदार असतील.' हे पत्र कॅराव्हान मासिकाने 21 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केलं होतं.

हे पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर एका आठवड्यात अनुज यांनी यू-टर्न घेतला आणि मला माझ्या वडिलांच्या मृत्यूसंदर्भात कोणतीही "तक्रार किंवा संशय नाही" असं सांगितलं.

रविवारच्या पत्रकार परिषदेत अनुज अस्वस्थ दिसत होते. त्यांच्यासोबत त्यांचे मावस भाऊ, न्यायाधीश लोयांचे एक मित्र आणि वकील अमित नाईक असे तिघे होते. अमित नाईक अनुज यांना प्रश्न विचारण्यात अडथळे आणत आहेत, अशी तक्रार तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी वारंवार केली.

प्रतिमा मथळा वर-वधूसोबत सर्वात डावीकडे उभे न्या. लोया

अनुज यांचे आजोबा आणि आत्या यांनी अलीकडेच न्यायाधीश लोयांच्या मृत्यूसंदर्भात अनेक संशय व्यक्त केले होते. त्याबद्दल विचारले असता अनुज यांनी दावा केला की, "त्यांना आधी संशय होता. आता नाहीये."

न्यायाधीश लोयांच्या मित्राने म्हटलं, "मी सामाजिक संस्था, वकील आणि राजकीय पुढाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी (लोया) कुटुंबीयांचा छळ करू नये. त्यांनी गेल्या ३ वर्षांत खूप सहन केलंय. (न्यायाधीश लोयांचा) मृत्यू वादग्रस्त नव्हता. या परिस्थितीचा कुणीही फायदा घेऊ नये, असं आम्हाला वाटतं."

पत्रकार परिषदेची पार्श्वभूमी

ब्रिजगोपाल हरकिशन लोया हे विशेष CBI कोर्टात न्यायाधीश होते. ते सोहराबुद्दीन शेख खटल्याची सुनावणी करत होते, ज्यात तेव्हा अमित शहा आरोपी होते. शहा सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

नागपूरमध्ये एका सहकाऱ्याच्या लग्नासाठी गेलेले असताना लोयांचा हृदय बंद पडून १ नोव्हेंबर २०१४ रोजी मृत्यू झाला.

कॅराव्हान मासिकाने २०१७ साली लोयांच्या नातेवाइकांच्या मुलाखती घेतल्या, ज्यात त्यांनी मृत्यू संशयास्पद परिस्थिती झाल्याची शंका व्यक्त केली.

Image copyright Getty Images

या मुलाखतींच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती ए.पी. शहा यांनी लोयांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. याविषयी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. यावर १५ जानेवारी २०१८ रोजी सुनावणी अपेक्षित आहे.

या प्रकरणाला नवं वळण लागलं, जेव्हा सुप्रीम कोर्टातल्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांवर आरोप करत म्हटलं की "दूरगामी परिणाम असणारे" महत्त्वाचे खटले अपारदर्शक पद्धतीने काही विशिष्ट न्यायमूर्तींकडे सोपवले जात आहेत. जेव्हा एका पत्रकाराने विचारलं की लोयांच्या मृत्यूचा खटलाही तुमच्या तक्रारीचा भाग आहे का, तेव्हा एक न्यायमूर्ती "हो" असं म्हणाले.

न्यायमूर्तींच्या या अभूतपूर्व पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने लोयांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)