सोनई तिहेरी हत्याकांड : 6 जण दोषी, 18 जानेवारीला शिक्षेची सुनावणी

पीडितांचे नातेवाईक Image copyright BBC / Pravin Thakare
प्रतिमा मथळा पीडितांचे नातेवाईक

महाराष्ट्राभर गाजलेल्या सोनई तिहेरी हत्याकांडातल्या सात आरोपींपैकी सहा जणांना सोमवारी नाशिक सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं.

प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे अशी या सहा दोषींची नावं आहेत. हे सहाही दोषी मराठा समाजातले आणि ते एकाच कुटुंबातले आहेत.

सातवे आरोपी अशोक रोहिदास फलके यांना पुराव्यांअभावी निर्दोष ठरवण्यात आलं असून त्यांची जामीन मंजूर झाली आहे.

१८ जानेवारीला दोषींना शिक्षा सुनावणी जाईल.

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेजवळ सोनई गावात जानेवारी 2013 साली तिहेरी हत्याकांड घडलं होतं. संदीप राज थनवार (वय 24), राहुल कंडारे (वय 26) आणि सचिन घारू (वय 23) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. गवत कापायच्या विळ्याने या तिघांच्या शरीरांचे तुकडे करण्यात आले होते.

हे तिघेही तरुण दलित समाजातले होते.

यापैकी सचिनचं दोषींच्या कुटुंबातल्या एका मुलीवर प्रेम होतं. त्यावरून त्या कुटुंबाकडून सचिनला आधीच समज देण्यात आली होती.

पण नंतर मुलीचे वडील, भाऊ आणि चुलत्यांनी सचिन आणि त्याच्या दोन मित्रांना घरी बोलवून त्यांची हत्या केली. या तिघांच्याही शरीराचे तुकडे करून विहिरीत, बोअरवेलच्या खड्ड्यात आणि संडासाच्या टाकीत टाकण्यात आले होते.

दरंदले परिवारातले प्रकाश, रमेश, पोपट आणि गणेश दरंदले, आणि अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना या हत्याकांडा प्रकरणी अटक करण्यात आली होती.

हत्याकांड उघडकीस आल्यावर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे खून केल्याचा जबाब दिला होता. शिवाय जे केलं त्याची खंत नसून शिक्षा भोगायला तयार आहे, असं त्यांनी जबाबात म्हटलं होतं.

घटना घडल्यानंतर 20 दिवसानंतर हे हत्याकांड माध्यमांनी उचलून धरलं. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा तपास योग्य रीतीने होण्यासाठी आदेश दिले होते.

प्रतिमा मथळा नाशिक सत्र न्यायालय

साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे हा खटला नाशिक किंवा जळगाव कोर्टात चालवावा, अशी मागणी पीडितांचे भाऊ पंकज राजू थनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. ही मागणी मान्य झाली आणि त्यानंतर हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला.

राज्य सरकारने या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)