सोशल : 'सरकार चौकशीविषयी टाळाटाळ करून शंकेला खतपाणी घालत आहे'

न्यायव्यवस्था Image copyright Getty Images

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या न्यायाधीशांचं समर्थन करत न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. याबाबत वाचकांची मतं बीबीसी मराठीनं विचारली होती.

या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे असं अनेकांनी म्हटलं आहे तर काहींनी हा विषय इथेच संपवावा, उगाच मुद्द्यांचं राजकारण नको, असं मत व्यक्त केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयातल्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली आणि सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती, ही त्यामागची पार्श्वभूमी आहे.

बीबीसी मराठीनं न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, या काँग्रेसच्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न वाचकांना विचारलं होता.

या प्रश्नावर वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया पाठवल्या. त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया.

राजू तुलालवर म्हणतात, "न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक नाही, हे दर्शवणाऱ्या बऱ्याच बाबी आहेत. त्यावर खुलासा होणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांचा मृत्यू संशयास्पद आहे असं म्हणणारा मुलगा आणि त्यांचे कुटुंबीय अचानक पत्रकार परिषद घेऊन वेगळंच काही बोलतात. ते कुणाच्या दबावामुळे बोलले का, याचीही चौकशी झालीच पाहिजे", असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

तर इंद्रजीत पटोले यांचं मत जरा वेगळं आहे. ते म्हणतात,"लोया यांच्या घरच्यांनी यात काहीच संशयास्पद नाही, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे मुद्दयाचं राजकारण करू नये."

वृषाली प्राजक्त यांनी याविषयी कायदा काय म्हणतो, हे आपल्या कमेंटमध्ये सांगितलं आहे. "कायद्यानुसार जर कुणाचाही असा संशयास्पद मृत्यू झाला असेल तर त्याची चौकशी व्हावी की नाही, हे कुटुंबीयांच्या इच्छेनं ठरवलं जात नाही. जर मृत्यू संशयास्पद असेल तर त्याची चौकशी करावीच लागते आणि न्या. लोया यांच्या बाबतीत अनेक गोष्टी संशयास्पद आहेत. त्यामुळे त्यांच्या खटल्याची चौकशी होणारच." असं म्हटलं आहे.

Image copyright Facebook

गुरू बल्की म्हणतात, "शेतकरी, कामगार, सर्वसामान्य रोज मरतात तेव्हा काहीच बोलू नका, पण जिथे राजकीय पोळी भाजायला मिळते ते मात्र सोडू नका. तुमच्या अशा वृत्तीमुळेच तर देशाचा सत्यानाश होत आहे."

"लीड मिळत असेल तर चौकशी करावी, खोलात जाऊन तपास करावा. आपल्याकडे नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, होमी भाभा अशी अनेक मोठी नावं आहेत. त्यांच्या मृत्यूचा काहीच सुगावा लागलेला नाही", असं मत अमोल यादव यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"एखाद्या प्रकरणाबद्दल संशय, शंका उपस्थित होत असतील तर त्यांची चौकशी करणं हे सरकारचं काम आहे. सरकार चौकशीला टाळाटाळ करून शंकेला खतपाणी घालत आहे", असं मत आसिफ कुरणे यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)