हळदीकुंकवाचं नाव नव्हे, मानसिकता बदला! : वाचकांची प्रतिक्रिया

तीळगूळ Image copyright SUBODHSATHE/GETTY

मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या हळदीकुंकू समारंभांविषयी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचा एक लेख बीबीसी मराठीने नुकताच प्रकाशित केला होता. (तो लेख इथे वाचू शकता) या लेखात त्यांनी हळदीकुंकू समारंभाची आजच्या काळातली समर्पकता आणि त्याचं बदलतं स्वरूप यावर विश्लेषण केलं होतं.

"आजच्या काळात हळदीकुंकवासारख्या समारंभांची गरज नाही. उलट ते स्त्रियांमध्ये जातीपाती आणि भेदाभेद निर्माण करणारं पुरुषप्रधान व्यवस्थेने चालवलेलं एक षडयंत्र आहे," असं त्या म्हणाल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या या दृष्टिकोनाला दुजोरा दिला.

तर काहींना त्यांचं म्हणणं पटलं नाही आणि त्यांनी या लेखाविषयी आपली उघड नाराजी व्यक्त केली. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर या लेखाविषयी आलेल्या या प्रतिक्रिया :

विद्या बाळांनी लिहिलं होतं की, "आपल्या संस्कृतीतलं सगळंच वाईट आहे, असं मला म्हणायचं नाही. ऋतूबदलाप्रमाणे सण योजणं ही निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आणि कल्पक अशी गोष्ट आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे सणाला, परंपरांना नावं ठेऊन चालत नाही तर त्यातील पर्याय शोधावे लागतात."

"गेली दहा बारा वर्षं मी वसंतोत्सवाचं बोलावणं करते. माझ्या काही मित्र-मैत्रिणींसाठी अगदी छोट्या स्वरूपात एक समारंभ करते. जेष्ठागौरीला दिलेलं हे वेगळं रूप आहे."

Image copyright Vidya Kulkarni

यावर प्रतिक्रिया देताना दीपाली जकाते म्हणतात, "(सणांची) नावं बदलण्यापेक्षा मानसिकता बदलण्याकडे कल असावा. स्त्रिया एकत्र येऊन बरंच सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या अशा भेटींमध्ये सुखदुःखाची देवाण-घेवाण होत असते. त्यामुळे अशा पध्दतीने नकारात्मक विचार करणं टाळावं, ही विनंती."

Image copyright Facebook

सुहास भोंडे लिहितात की, "मॅडम, मी स्वतः SC आहे, पण मी लहान असताना माझी आई सगळ्यांकडे हळदीकुंकवाला जायची. आमच्या क्वार्टर्समध्ये अनेक जातींचे लोक राहायचे पण सगळे एकमेकांना हळदीकुंकू समारंभाला बोलवायचे. त्यामुळे तुमचं म्हणणं मला पटलं नाही."

Image copyright Facebook

तेजश्री चौबळ वैद्य म्हणतात की "एक जात सगळ्या हिंदू सणांमध्ये खोट काढण्याची सध्या फॅशन आली आहे. विद्याताई वंदनीय आहेत, पण त्यांनी जे मत व्यक्त केलं त्याचा मथळा व्यवस्थित असावा, गैरसमज निर्माण करणारा नको."

Image copyright Facebook

"हळदी कुंकू समारंभाची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. अनेक पूर्वापार चालत आलेल्या प्रथांमध्ये काळानुरूप बदल व्हायलाच हवे. जर या प्रथा पुरुषप्रधान वाटत असतील तर तेवढा बदल करावा. सण आणि परंपरा हे समाजाचे support pillar असतात, ते मोडून टाकण्यापेक्षा त्यांची डागडुजी करावी," असंही त्या पुढे मांडतात.

"हळदीकुंकू समारंभाला विरोध असेल तर मिस वर्ल्ड सारखे कार्यक्रम कसं सहन करता? त्यातून स्त्रीच्या अस्तित्वाचा काय संदेश जातो? त्यांची आताच्या काळात काय गरज?" असा प्रश्न अरविंद कुलकर्णी विचारतात.

Image copyright Facebook

अनुजा गोखले म्हणतात, "हे असले विचार कुठून येतात? मलाही सण साजरे करण्यात फारसा रस नसतो, पण हे वाचून तर हसूच येतंय. हे मला कधीच पटणार नाही."

Image copyright Facebook

दिनेश बावस्करांना वाटतं की हळदीकुंकू हा एक सार्वजनिक उपक्रम आहे. "उद्या म्हणाल गणेशोत्सवही साजरा करू नका."

Image copyright Facebook

सिद्धी तांबेना विद्या बाळांची मतं पटतात, पण त्या म्हणतात की हे अमलात आणणं कठीण आहे.

लेखिकेची मतं अनेकांना खटकली असली तरी त्यांना पाठिंबा देणारे वाचकही बरेच आहेत.

अंजली पोतदार बैतूले लिहितात की, सण-परंपरांना तर्कसंगत असायला हवं, त्यातून काहीतरी सकारात्मक व्हायला हवं. महिलांच्या भावना न दुखावता, त्याचा विकास घडवणारे सण साजरे करायला हवेत.

Image copyright Facebook

सुनिल देवकुळे म्हणतात, "छान विचार! एक पुरुष असूनही या विचारांचा मी सन्मान करतो. खरंच असं होईल का? मला वाटतं स्त्रियांनी यावर जरूर विचार करावा व असं घडवून आणण्याचा प्रयत्नही करावा."

Image copyright Facebook

सूर्यकांत कसबे म्हणतात की विद्या बाळ या त्यांच्या आवडत्या लेखिका आहेत. ते म्हणतात की समाजात सुधारणा होणं गरजेचं आहे आणि परंपरांवर प्रश्न उपस्थित करणारे लोक हवेत. "निरर्थक प्रथांमध्ये बदल आवश्यक आहे. बाकी सर्व आधुनिक स्वीकारायचं अन् परंपरेने नियम म्हणून तसंच ठेवणं हे चूक आहे."

Image copyright Facebook

"नवरा मेल्यानंतर विधवा स्त्रीवर अनेक बंधन येतात. नातेवाईकदेखील विधवा स्त्रीचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. स्त्रियांवर बंधन आणणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्या प्रथा संपल्याच पाहिजे," असं प्रतिमा सावंत मालवदकर यांना वाटतं.

Image copyright Facebook

आणखी एक वाचक विद्या घोलप लिहितात, "विद्या बाळ यांच्या विचारांचं स्वागत आहे. पण त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची कीव येते. कधी सुधरणार आपला समाज?"

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे वाचलंत का?