गाजर हलवा ते विमानातले उंदीर : एअर इंडियामधले 6 रंजक किस्से!

एअर इंडिया Image copyright INDRANIL MUKHERJEE/GETTY IMAGES

एअर इंडियाच्या विभाजनाचा प्रस्ताव सरकारने ठेवला असल्याच्या बातम्या आल्यानंतर अनेक चांगले-वाईट किस्से मनात तरळून गेले.

मी चार वर्षांचा होतो तेव्हा पहिल्यांदा विमानाचा प्रवास केला होता. आम्ही भारतातून ब्रिटनला स्थलांतरित झाल्यानं मी माझ्या आईसोबत मुंबई ते लंडन प्रवास करत होतो. माझे काका, काकू, चुलत भाऊ यांच्याबरोबर माझे वडील लंडनच्या हीथ्रो विमानतळावर आमच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. मी फार लाजाळू होतो, त्यामूळं संपूर्ण विमानप्रवासात आईला चिटकून बसलो होतो.

मी विमानात काहीच खाल्लेलं नव्हतं. त्या वेळेस माझ्या रोजच्या आहारात बोर्नविटा हॉट चॉकलेटचा एक कप असायचा. पण एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये असे कुठलेही पदार्थ माझ्यासाठी नव्हते.

एका प्रेमळ एअर होस्टेसला माझी कीव आली आणि तिने साथीदारांकडे शोध घेत एक बरबन चॉकलेट क्रीम बिस्कीटचा पुडा माझ्यासाठी आणला. मी मनसोक्त तो बिस्कीटचा पुडा संपवला.

35 वर्षांपूर्वी एअर इंडियाबरोबर उड्डाण करण्याचा तो माझा पहिलाच अनुभव होता. म्हणून भारत सरकारने जेव्हा या राष्ट्रीय एअरलाईन्सचं विभाजन चार स्वतंत्र कंपन्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली, तेव्हा माझ्यासह अनेक मित्रांना, नातेवाईकांना मनात एअर इंडियाविषयीच्या अनेक कडू-गोड आठवणी तरळून गेल्या.

Image copyright RAVEENDRAN/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

माझ्या ओळखीतल्या ब्रिटन आणि अमेरिकेतल्या अनिवासी भारतीयांमध्ये एअर इंडिया नेहमीच उपहासाचा आणि लाजिरवाणाचा विषय असतो. काय करू, गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्यांच्या सेवेबद्दलच्या कहाण्याच इतक्या रंजक ठरल्या आहेत.

कधी फ्लाईटमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी असतात, तर कधी प्रवासी तासनंतास ताटकळत राहिलेले. काही लोकांनी चेक-इन काऊंटरवरची भांडणं पाहिली आहेत, तर काहींना तुटलेल्या आणि डागाळलेल्या खुर्च्या, अस्वच्छ प्रसाधनगृह आणि चिडचिड्या एअरहोस्टेसचा सामना करावा लागला आहे. काहींना तर विमानत उंदीरही दिसले आहेत. पण सुदैवाने माझ्यावर असं काही बघण्याची परिस्थिती नाही ओढवली.

मी सोशल मीडियावर माझ्या मित्रांना त्यांनी अनुभवलेले असे काही भयानक किंवा रंजक प्रसंग शेअर करायला सांगितलं. त्यांच्यापैकी हे काही भारी एपिसोड -

1. माझ्या एका मैत्रिणीनं हा किस्सा सांगितला : एकदा एअर इंडियानं एकटीच प्रवास करताना मी विमानाच्या स्टाफला 'अल्कोहिलिक ड्रिंक आहे का?' असं विचारलं. त्या स्टाफने माझ्याकडे असं पाहिलं जणू मी काही गुन्हाच केला आहे.

2. आणखी एका मित्राच्या नशिबी आलेला हा प्रसंग - दिल्ली ते लंडन प्रवासादरम्यान विमानात सर्वांना एक चित्रपट दाखवण्यात आला. पण तो चित्रपट फ्रेंच भाषेत होता. अनेकांनी त्याबद्दल तक्रार केली आणि ते म्हणाले की 'आम्ही चित्रपट बदलतोय.' पण काही झालं नाही.

शेवटी ते म्हणाले, "आता चित्रपट थोडाच बाकी राहिला आहे. बदलून काय फायदा."

3. माझी आणखी एक मैत्रीण एक दुसऱ्या कंपनीच्या विमानात असताना आजारी पडली. त्याच विमानात एअर इंडियाचा एक पायलट फर्स्ट क्लासने प्रवास करत होता. माझी मैत्रीण आजारी असल्याचं लक्षात आल्यावर त्यानं त्याची जागा तिला बसायला दिली, जेणेकरून ती आराम करू शकेल. आणि तो तिच्या इकॉनॉमी क्लास सीटवर जाऊन बसला.

4. एकदा माझ्या मित्रानं फ्लाईटमध्ये दिलेलं जेवण स्वीकारलं नाही. थोड्याच वेळात फ्लाईट स्टिवर्ड तिथं आला आणि त्याने त्या मित्राला गाजर हलवा दिला. तो खूश झाला.

Image copyright MANAN VATSYAYANA/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा एअर इंडिया

5. एअर इंडियाच्या कडक एअर होस्टेसच्या कथा तुम्हीही ऐकल्या असतीलच. एका मित्राने सांगितलेला हा प्रसंग - माझ्या पुढच्या सीटवर बसलेला एक प्रवासी टेकऑफदरम्यान सतत आपली सीट मागं सरकवण्याचा प्रयत्न करत होता. मी एअर होस्टेसला सांगितल्यावर तिने त्या व्यक्तीच्या सीट बटण दाबून ती सरळ केली आणि त्याला बजावून सांगितलं, "खबरदार आता ही सीट पुन्हा मागे केली तर... तुला मी विमानातून खालीच फेकून देईल. ही काही आरामखुर्ची नाही!"

हे ऐकल्यावर तो प्रवासी अख्ख्या प्रवासात मग शहाण्यासारखं वागला.

6. जेफ नावाच्या एका मित्राने हा अनुभव सांगितला. एकदा सहपरिवार प्रवास करताना त्याचं विमान रद्द झालं आणि एअरलाईनने त्याला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. मित्रानं त्या ग्राउंड स्टाफला नम्रपणे पण दृढतेनं सांगितलं, "आम्हाला तुम्ही कसंही करून विमानात बसवा. मग त्यांनी आम्हाला बिजनेस क्लासमधली तिकिटं दिली. पण त्यामुळे एक प्रॉब्लेम असा झाला की, आता माझी मुलं बिजनेस क्लासनेच प्रवास करण्याचा हट्ट करतात."

माझा सर्वांत अलीकडचा एअर इंडियाचा प्रवास अगदी गेल्याच आठवड्यात झाला. मी त्यांच्या 787 ड्रीमलाइनरने लंडनहून दिल्लीला आलो. माझ्या उजवीकडच्या दोन्ही सीट पूर्ण प्रवासादरम्यान रिकाम्या होत्या. म्हणून मी माझे पाय लांबवून, मस्त एकट्यानेच पर्सनल एंटरटेनमेंट सिस्टिमवर सिनेमा पाहिला.

मग चार वर्षांचा असताना मी घेतलेल्या त्या पहिल्या फ्लाईटच्या आठवणी पुन्हा जागा झाल्या. आज काळांतराने बदललेल्या त्या प्रशस्त कॅबिनमधली आधुनिक उपकरणं पाहिली आणि माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकलं.

(तृषार बारोट हे बीबीसीचे भारतामधले डिजीटल एडिटर आहेत.)

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)