पाहा व्हीडिओ - राजाचा आदेश नाही पाळला तर गाढवासोबत 'संबंध' ठेवण्याची विचित्र शिक्षा?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : गधेगळांवरील संभोग शिल्पाचा अर्थ काय?

जर एखाद्याने राजाची आज्ञा मान्य केली नाही, तर त्याच्या कुटुंबातल्या महिलांवर गाढवामार्फत बळजबरी केली जाईल, असा 'धमकीवजा इशारा' कोरलेले काही 11व्या शतकातले शिलालेख महाराष्ट्रात सापडले आहेत.

मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात निर्मिलेली मंदिरे, शिलालेख, ताम्रपट, मराठी भाषेतले काही दस्ताऐवज हे त्याकाळच्या इतिहासावरील पडदा उलगडतात. विशेषतः त्याकाळी काळ्या बसॉल्ट खडकातून निर्माण झालेली मंदिरं आणि शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात.

यापैकी एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे 'गधेगळ' हा शिलालेख. दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत निर्माण झालेला हा शिलालेख केवळ एक लिखित पुरावाच नाही तर, राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्याकाळातील महिलांचे सामाजिक स्थान दर्शवणारा एक स्तंभही आहे.

'गधेगळ' म्हणजे काय?

मुंबईतल्या युवा पुरातत्त्वज्ञ हर्षदा विरकुड या 'गधेगळ' विषयावर घेऊन PhD करत आहेत. महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतल्या गधेगळांवर त्या गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. त्या सांगतात, "गधेगळ हा एक प्रकारचा शिलालेख असतो. हा शिलालेख ३ टप्प्यात विभागलेला असतो. वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा यावर कोरलेल्या असतात."

"मधल्या टप्प्यात एक लेख यावर लिहिलेला असतो. तर खालच्या टप्प्यात यावर एक प्रतिमा कोरलेली असते. यात एक गाढव महिलेवर आरूढ होऊन तिच्याशी बळजबरी समागम करताना दिसतो," असं त्या म्हणाल्या.

पुढे त्यांनी सांगितलं की, "अशी प्रतिमा आणि लेख असल्यानेच या शिलालेखाला 'गधेगळ' हे नाव पडलं. म्हणजेच शिलालेखामध्ये लिहिलेली माहिती अथवा आज्ञा जे कोणी पळणार नाहीत, त्यांच्या घरातील महिलेसोबत असा प्रकार केला जाईल, अशी ती धमकी आहे."

Image copyright SACHIN DARVHEKAR
प्रतिमा मथळा अंबरनाथ इथल्या हाजी-मलंग जवळील आदीवासी वाडीतील गधेगळ.

गधेगळांवर असलेल्या चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमेबद्दल त्यांनी सांगितलं की, "'आ चंद, सूर्य नांदो...', म्हणजे चंद्र आणि सूर्य अस्तित्वात असे पर्यंत ही आज्ञा कायम राहील म्हणून यावर चंद्र, सूर्य कोरलेले असतात."

पुढे त्या म्हणाल्या, "हे गधेगळ 10व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात आढळतात. हा शिलालेख दुर्मिळ असून महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांमध्येच केवळ 150च्या आसपास गधेगळ सापडले आहेत."

"महाराष्ट्रातील पहिला ज्ञात गधेगळ इ.स. 934 ते 1012 या काळात होऊन गेलेले शिलाहार राजा केशिदेव पहिले यांनी अलिबाग मधल्या आक्षी इथे उभारल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात 50 टक्के गधेगळ हे शिलाहार राजघराण्याशी संबंधित आहेत. तर 30 टक्के गधेगळ यादव घराणं, कदंब घराणं, विजयनगरचे संगम घराणं, चालुक्य आणि बहामनी साम्राज्याशी निगडीत आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.

महिलांची प्रतिमा का?

गधेगळांच्या अभ्यासाविषयी सांगताना विरकुड म्हणाल्या की, "ज्येष्ठ इतिहासकार डॉ. रा. ची. ढेरे यांनी सर्वप्रथम गधेगळांचा अभ्यास केला. त्यांनी गाढवाचा महिलेशी होत असलेल्या समागमाचा अर्थ 'गाढवाचा नांगर फिरवणे' या संकल्पनेशी जोडला."

"म्हणजेच गाढवाचा नांगर जमिनीवरून फिरल्यास ती जमीन नापीक होईल, असा समज समाजात होता. आणि हाच संदेश गधेगळांची निर्मिती करणाऱ्यांना द्यायचा आहे. की, तुम्ही गधेगळांवर लिहिलेली राजाज्ञा मोडली तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल," असं त्यांनी सांगितलं.

Image copyright SANKET SABNIS/BBC
प्रतिमा मथळा बदलापूर शिरगांव इथल्या शिलालेखावरील महिला आणि गाढवाच्या समागमाचं शिल्प.

पुढे त्या म्हणाल्या, "मात्र, आज 150 हून अधिक गधेगळ अभ्यासल्यानंतर माझ्यासमोर वेगळेच सत्य उभं राहिला आहे. 'गाढवाचा नांगर फिरवणे' या संकल्पनेशी गधेगळांचा संबंध नसून समाजातल्या महिलेच्या स्थानाशी आहे. कारण, गधेगळ समजून घेताना त्या काळची परिस्थिती जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं."

त्यावेळची परिस्थिती विषद करताना विरकुड म्हणाल्या की, "तेव्हाची सामाजिक परिस्थिती बिकट अवस्थेत पोहोचलेली होती. दख्खन प्रदेशात राज्यसत्ता हस्तगत करण्यासाठी सतत संघर्ष सुरू होता. सामंतशाहीवादी राजे जनतेवर आपला अंमल करण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करत होते."

"जातिव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेनं समाजाला घेरलेलं होतं. अंधश्रद्धा समाजात शिगेला पोहोचली होती. तर याच काळात मराठी भाषा देखील आकार घेऊ लागली होती. मात्र यावेळी महिलेला समाजात कोणतंही स्थान नव्हतं, उलट ते खालावलेलं होतं," असं विरकुड म्हणाल्या.

हे आता मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासावरूनही अनेकांनी सिद्ध केलं आहे.

"महिला त्यावेळी एखाद्याची आई, पत्नी आणि बहीण किवा देवीचं रूप असली तरी तिला समाजात काहीच स्थान नव्हतं. म्हणूनच गधेगळांवर महिलेची प्रतिमा कोरलेली असायची. कारण एखाद्या व्यक्तीनं जर, या गधेगळावर लिहिलेल्या मजकुराचं पालन केलं नाही अथवा त्याला विरोध केला तर त्याच्या घरातील स्त्रीसोबत अशारीतीने बळजबरी केली जाईल असा," याचा अर्थ असल्याचं त्यांनी सांगितलं.

Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा मुंबईतल्या गिरगाव इथल्या पिंपळेश्वर मंदिराबाहेरील या गधेगळाची अंधश्रद्धेमुळे नागरिक पूजा करतात.

"एखाद्याच्या घरातील महिलेसोबत असा प्रकार झाल्यास त्या व्यक्तीचं समाजातील स्थानही डळमळीत होईल. त्यामुळे कोणीच घाबरून हे कृत्य करणार नाही, असा त्यामागचा अर्थ होता. प्रत्यक्षात असा प्रकार कधी घडला की नाही, याबाबत माहिती उपलब्ध नाही. तरी एखाद्याला शिक्षा म्हणून महिलेची विटंबना केली जाईल अशी राजाकडून आलेली ही धमकीच होती," असंही त्या म्हणाल्या.

गधेगळांविषयी बोलताना मुंबईस्थित पुरातत्त्वज्ञ डॉ. कुरुष दलाल यांनी सांगितलं की, "महिलेला आईचा दर्जा असला तरी त्याकाळी महिलांना समाजात किंमत नव्हती. म्हणूनच गाढव आणि महिलेचं असं शिल्प त्यावर कोरलं आहे."

आपण दिलेल्या आज्ञेचं गांभीर्य जनतेच्या मनात ठसलं जावं, यासाठी मध्ययुगीन महाराष्ट्रातल्या राजांकडून अशी शिल्प शिलालेखांवर कोरली जात असल्याचं एकंदरीत पुरातत्त्वज्ञांनी व्यक्त केलं आहे.

विशेषतः केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर बिहार आणि अन्य उत्तर भारतीय राजांमध्ये हे शिलालेख आढळले आहेत. या शिलालेखांचं स्वरूप गधेगळापेक्षा काहीसं भिन्न असलं तरी जनतेवर अंकुश ठेवण्यासाठी भीतीदायक संदेश देणारी शिल्प ही त्या शिलालेखांवर कोरलेली आढळली आहेत.

त्यामुळे आजच्या काळात महिलांना असलेली लैंगिक अत्याचाराची भीती मध्ययुगीन महाराष्ट्रातल्या महिलांनाही होती हे या गधेगळांवरून स्पष्ट होत आहे.

गधेगळांचं आज महत्त्व काय?

डॉ. कुरुष दलाल यांनी सांगितलं, "गधेगळातून आताच्या काळात अंधश्रद्धा उत्पन्न झाल्या आहेत. गाढव आणि महिलेला अशा स्थितीत पाहून अनेक जण त्याला अशुभ मानतात, तर काही जण त्याला शेंदूर फासून त्यांची पूजा करतात. अनेक जण या दगडाला त्या जागेचा देव किवा देवी मानतात. तर काहींनी अशुभ म्हणून हे शिलालेख फोडून टाकले आहेत."

त्यामुळे गधेगळ ज्या ठिकाणी आढळतो त्या जागेला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा मुंबईतल्या गोराई इथल्या गधेगळाची स्थानिक अंधश्रद्धेमुळे पूजा करतात.

तर याविषयी विरकुड सांगतात, "गधेगळ हे मराठी भाषेत असतात. मराठी भाषेचा इतिहास त्यांच्यामुळे उलगडतो. काही गधेगळ अरबी भाषेतही आहेत. त्यांच्या अभ्यासामुळे मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. म्हणून गधेगळ सापडल्यास ते पाण्यात टाकून देणे, फोडून टाकणे किंवा नष्ट करणे, त्यांची पूजा करणे अशा अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित आहे."

हे पाहिलंत का?

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)