#5 मोठ्या बातम्या : 'पद्मावत' प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; 'न्यूड'ला ए प्रमाणपत्र

पद्मावत, चित्रपट, मनोरंजन Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पद्मावत चित्रपटाला राजस्थानमधील करणी सेनेने विरोध केला आहे.

1. पद्मावतची सुटका; न्यूडला 'ए' प्रमाणपत्र

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या चार राज्यांनी घातलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. त्यामुळे हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला संपूर्ण देशात प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द हिंदूने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राजस्थानमधील राजपूत समाजातील एक गट चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजस्थान सरकार या निर्णयाविरोधात अपील करण्याची शक्यता आहे. आम्ही या निर्णयाचा अभ्यास करू आणि त्यानंतरच पुढच्या कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येईल असं गुजरात आणि हरयाणा राज्यांनी स्पष्ट केलं असल्याचं द हिंदूच्या बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान 'न्यूड' या मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित करण्यात आलं आहे. कोणत्याही कटशिवाय सेन्सॉरनं न्यूडला 'ए' दिलं आहे. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा मुंबईत जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे. एबीपी माझाने यासंदर्भात बातमी दिली आहे.

गोव्यात झालेल्या इफ्फीच्या चित्रपट महोत्सवात 26 चित्रपटांपैकी न्यूड आणि एस दुर्गा हे चित्रपट निवडले होते. न्यूडला ओपनिंग चित्रपटाचा बहुमानही मिळाला होता. मात्र केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं चित्रपटाला वगळण्याचा निर्णय घेतला.

2. 'न्या. लोया रविभवनात थांबलेच नव्हते!'

नागपुरातील ज्या रविभवन सरकारी निवासस्थानात न्यायमूर्ती बी.एच.लोया यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं, त्या रविभवनात लोया थांबलेच नव्हते, अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. सकाळने यासंदर्भात बातमी दिली आहे. लोया यांचा मृत्यू 1 डिसेंबर 2014 ला झाला होता. मात्र त्या तारखेला किंवा त्या महिन्यात कधीही ते रविभवनात थांबले नव्हते असं तेथील नोंदवहीवरून स्पष्ट झालं आहे. नागपुरातील वकील योगेश नागपुरे यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली होती. ती मिळवताना त्यांना बराच त्रास झाला, असं सकाळनं बातमीत म्हटलं आहे.

Image copyright caravan magazine
प्रतिमा मथळा न्या. लोया

रविभवनातल्या लोया यांच्या वास्तव्यासंदर्भात विचारलेली माहिती अनेकदा लपवण्याचाही प्रयत्न झाला. रविभवन सरकारी निवासस्थानाच्या नोंदवहीतील काही तारखाही खोडलेल्या आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे.

न्या. लोया कोणत्या वाहनानं नागपुरात आले होते याचीही माहिती उपलब्ध नाही. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका अॅड. नागपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली आहे.

3. पेंग्विनमुळे प्राणीसंग्रहालयाला बारापट नफा

मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजामाता उद्यान येथे दक्षिण कोरियातून आणलेल्या हंबोल्ट पेंग्विनमुळे प्राणीसंग्रहालयाचं उत्पन्न बारा पटींनी वाढलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

Image copyright INDRANIL MUKHERJEE/Getty Images
प्रतिमा मथळा मुंबईतील प्राणीसंग्रहालयतील पेंग्विन.

ऑगस्ट 2017 मध्ये पेंग्विनला पाहण्यासाठीचे शुल्क वाढवण्यात आलं. मात्र त्यानंतरही प्राणीसंग्रहालयाने महिनाभरात 70 लाखांची कमाई केली. प्राणीसंग्रहालयाच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही ही रक्कम जास्त आहे. पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली असली तरी प्राणीसंग्रहालयाच्या कमाईत वाढ दिसून येत आहे.

4. महाबळेश्वरमध्ये वणवा

राज्यातलं प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये बुधवारी सिगारेटमुळे वणवा लागल्याची घटना घडली. पुढारीने याबाबत बातमी दिली आहे. लॉडविक पॉइंट येथे एका पर्यटकाने सिगारेट पिऊन झुडपात टाकली. दुपारी उन्हाची तीव्रता असल्याने या सिगारेटच्या ठिणगीमुळे वणवा पेटला.

या वणव्यात साधारण पाच किलोमीटर परिसरातील झाडंझुडपं जळून भस्मसात झाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक रोहित लोहार, दीपक चोरट यांनी जीवाची बाजी लावून वणवा भडकू नये यासाठी प्रयत्न केले.

5. लष्कराकडून पंधरा मिनिटात पूल उभारणी

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर कल्याणजवळच्या आंबिवली येथील पुलाची निर्मिती करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं. त्यानुसार आंबिवली येथील पादचारी पुलाच्या उभारणीचं काम गुरुवारी विक्रमी वेळेत करण्यात आलं. अवघ्या पंधरा मिनिटात लष्कराचे अभियंते आणि जवानांनी हा पूल उभा केला.

या पुलावरील उर्वरित सिमेंट क्राँकीट तसंच अन्य कामं पूर्ण करून तो 31 जानेवारीपर्यंत पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार असल्याचं लष्करातर्फे सांगण्यात आलं. 12 फूट रूंद आणि 60 फूट लांब असं या पुलाचं स्वरुप आहे. या कामासाठी मध्य रेल्वेतर्फे पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. पुलाच्या सांगाड्याचं वजन 15.84 टन होतं. बंगालमधून पुलाचे काही भाग आधीच आणण्यात आला होता. सकाळी अकरा वाजता काम सुरू झालं. अवघ्या नऊ मिनिटांत जवानांनी गर्डर टाकला. पुढच्या काही मिनिटांत त्याची जोडणीही पूर्ण करण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)