#HerChoice आम्ही दोघी एकत्र आहोत पण लेस्बियन नाही

महिला, तिचं आयुष्य, महिला हक्क
प्रतिमा मथळा मी आणि माझी गर्लफ्रेंड

मी आणि माझी गर्लफ्रेंड दोघीही लेस्बियन नाही. आमच्यात कोणतंही लैंगिक आकर्षण नाही. आमचे विचार आणि कल्पना जुळतात आणि आमची श्रद्धास्थानं एकच आहेत. आणि म्हणूनच गेली 40 वर्षं आम्ही एकाच घरात एकत्र राहत आहोत.

आम्ही दोघींनी आता सत्तरी गाठली आहे. जेव्हा आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही नुकताच तिशीत प्रवेश केला होता.

उत्साही तरुण वयातही आम्हाला काहीही धाडसी करायचं नव्हतं. आम्हाला शांत आणि स्थिर जीवन जगायचं होतं. हेच आमचं एकत्र येण्याचं मुख्य कारण होतं.

आम्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. मला भडक रंग भावतात आणि या वयातही लिपस्टिक वापरायला आवडतं. माझी जोडीदार शांत, संयमी आणि मवाळ रंग पसंत करते.

मी हाय हिल्सचे सँडल्स घालणं पसंत करते पण माझी गर्लफ्रेंड सदासर्वकाळ 'डॉक्टर स्लिपर्स'मध्येच असते.

मी टीव्ही पाहत असते तेव्हा ती मोबाइलमग्न असते. या वयात कसलं खूळ घेतलं आहेस असा शेलकी टोलाही ती लगावते.

हे असं आमचं जगणं आहे. खेळीमेळीत थट्टामस्करी सुरू असते. मात्र स्वान्तसुखाय जगण्याचं मनमुराद स्वातंत्र्य असतं.

अपेक्षांच्या बोजाखाली नाती दबून जातात

आम्ही एका घरात राहतो पण आमचं भावविश्व सर्वस्वी वेगळं आहे.

आधुनिक काळातल्या लग्न संकल्पनेत इतका मोकळेपणा नसतो. त्यात एकमेकांवर अपेक्षांचं ओझं असतं आणि नाती या बोज्याखाली हरवून जातात.

माझं लग्न मोडलं, मात्र तो आता इतिहास झाला आहे. मला त्यात डोकवायचं नाहीये. माझी मुलं मोठी झाली आहेत आणि आपापलं आयुष्य जगत आहेत.


प्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.


एकटं राहण्यावर माझ्या मैत्रिणीचा विश्वास होता. ती तसंच जगत होती. म्हणूनच आम्ही एकत्र आहोत पण एकट्याच आहोत.

इतकी वर्षं एकत्र राहिल्यानंतरही आम्हाला अनेकदा एकमेकींविषयी नवीन गोष्टी उमगतात.

...म्हणूनच आमच्या नात्यात चैतन्य

आम्ही एकमेकींना पूर्णांशाने ओळखत नाही हेच आमच्या नात्याचं गुणवैशिष्ट्य आहे. कदाचित म्हणून आमच्या नात्यात चैतन्य आहे.

एकमेकांबरोबर केवळ एकत्र राहण्याचा कधी कंटाळा येतो का? असं लोक आम्हाला विचारतात. पण प्रत्यक्षात आम्ही एकमेकींशी क्वचितच बोलतो.

आम्ही एका छताखाली राहतो. पण अनेकदा फक्त जेवताना आमची भेट होते. जेवून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आपापल्या आयुष्यात दंग होतो.

आम्ही नोकरी करत होतो तेव्हापासूनची ही सवय आहे. नोकरीनंतरही ती कायम आहे.

प्रतिमा मथळा आमचं एकत्र राहणं लोकांना चक्रावून टाकतं.

आमच्याकडे स्वयंपाक करण्यासाठी येणाऱ्या बाई सुरुवातीला गोंधळून जात असत. आमचे कोणी नातेवाईक आहेत आहेत का? असं ती खोदूनखोदून विचारत असे. कोणी तरुण मंडळी आमच्याबरोबर येऊन राहणार आहेत का? असं ती वारंवार विचारत असे.

तिच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचं नव्हतं. आमचे खूप नातेवाईक आणि मित्रमंडळी आहेत पण आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय आम्ही स्वेच्छेने घेतला आहे याचं स्पष्टीकरण तिला द्यावं असं मला वाटलं नाही.

कर्त्या पुरुषाशिवाय आम्ही राहतो याचं तिला राहूनराहून आश्चर्य वाटत असे. आमचा कोणीतरी खून करेल किंवा आमचं घर कुणीतरी लुटून नेईल असं तिला वाटत असे.

तिचं ऐकताना मला हसू येत असे. आमच्याकडे चोरण्यासारखं काहीही नाही हे मी तिला समजावून सांगितलं.

आमच्या घरातल्या रंग उडालेल्या भिंती पाहून चोरालाही घरात कशाप्रकारची माणसं राहतात याची कल्पना आली असती.

मी सांगितलेल्या गोष्टी तिला समजतात का याविषयी मला खरंच कळत नसे. पण प्रत्येकवेळी तिला आमची काळजी वाटत असे. आमचं असं एकत्र राहणं आणि जगणं तिला जराही पटत नसे.

योगायोग म्हणजे अगदी अस्संच जगण्यासाठी आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

शांतचित्ताने मला झोप लागते आणि प्रसन्न मनाने जाग येते. आमच्या आयुष्यात अनाठायी धावपळ गोंधळ नाही.

ताणतणावांनी दिवसाची सुरुवात होणं मला कधीच पटत नसे. त्याऐवजी दरदिवशी सकाळी स्वत:वर लक्ष द्यावं, असं मला वाटत असे.

दूर पळून जाण्याचा प्रयत्न नाही

नातेसंबंधातून येणाऱ्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळण्यासाठी हे जगणं आम्ही स्वीकारलं नव्हतं.

आमच्यावर कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीत आणि आम्ही मनमौजी आयुष्य जगतोय असंच आम्हाला भेटणाऱ्यांना किंवा आमच्या घरी येणाऱ्यांना वाटतं.

पण स्वत:चं आयुष्य स्वतंत्रपणे जगणं ही एक जबाबदारी नाही का?

आमच्या गरजांसाठी आम्ही कोणावरही अवलंबून नाही.

आमच्या एकत्र राहण्यात लोकांना काहीतरी संशयास्पद वाटत असे. आमच्यात काहीतरी 'तसं' आहे, असंही लोकांना वाटतं.

लोकांच्या नजरेत चांगलं होणं किंवा लोकांच्या भावनांना महत्त्व देणं हे आमचं प्राधान्य नाही.

मी कुंकू लावते. पायात जोडवी घालते. नाकात चमकी घालते. जोपर्यंत मला हे आवडतंय तोपर्यंत मी हे करेन. मला बंद करावंसं वाटेल तेव्हा बंद करेन.

आमच्या या नात्याच्या वाटचालीत मला काही गोष्टी जाणवल्या आहेत. तुम्ही तुमचं आयुष्य कोणाबरोबरही जगू शकता मात्र तुम्हाला आयुष्य खऱ्या अर्थाने व्यतीत करायचं असेल तर खंबीरपणे साथ देणारी व्यक्ती सोबत लागते. अशी व्यक्ती सुखदु:खात सदैव तुम्हाला आधार देते, बरोबर असते पण तुमच्यात अनाठायी गुंतत नाही.

अतिशय संतुलित असं आमचं आयुष्य लोकांना चक्रावून टाकतं. पण याचं मला आश्चर्य वाटतं.

स्वतंत्रपणे जगणाऱ्या आम्ही दोन मैत्रिणी आहोत. आम्ही एकमेकांशी फार बोलत नाही किंवा लोकांना आमच्याविषयी सांगायला जात नाही. आम्ही आमच्या आयुष्याबाबत समाधानी आहोत. यात वावगं काय?... यात विचित्र काय?

(उत्तर भारतातल्या दोनस्त्रियांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याची ही गोष्ट. त्यांच्याशी बीबीसीच्या प्रतिनिधी भूमिका राय यांनी संवाद साधला तर दिव्या आर्य यांची निर्मिती केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार या गोष्टीतल्या स्त्रियांची नाव गुप्त ठेवण्यात आली आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)