आजच्या दिवशी झाला होता गांधींच्या हत्येचा 5वा प्रयत्न

गांधीजी Image copyright Getty Images

69 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 20 जानेवारी 1948ला नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी महात्मा गांधींची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 30 जानेवारी 1948ला गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीत महात्मा गांधींची हत्या केली.

20 जानेवारीच्या घटनेनंतर जर पुरेशी दक्षता घेतली असती तर?

गांधींचे पणतू तुषार गांधी म्हणतात, तसं झालं असतं तर आजचा इतिहास काही वेगळा असता. तुषार गांधी यांनी या विषयावर बीबीसी मराठीशी चर्चा केली.

आजपासून 69 वर्षांपूर्वी नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधींना ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता.

भारताला स्वातंत्र्य मिळून काही महिनेच झाले होते. आणि देशात ठिकठिकाणी धार्मिक तणावाचं वातावरण होतं.

Image copyright Getty Images

'हिंदू, शीख आणि मुस्लिमांमध्ये एकेकाळी बंधुभाव होता. आता ते राहिलं नाही, हे पाहून माझ्या मनाला यातना होत आहे,' असं गांधी म्हणाले होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या आणि स्टॅनेले वॉलपर्ट यांनी लिहिलेल्या 'गांधीज मिशन' या पुस्तकात अस म्हटलं आहे.

"सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी आमरण उपोषण करणार आहे," अशी घोषणा महात्मा गांधींनी 12 जानेवारीला केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी उपोषण सुरू केलं.

'तुम्ही तुमचं उपोषण सोडा,' अशी विनंती करण्यासाठी देशभरातून लोक येत असत. या लोकांसमवेत महात्मा गांधी नित्यनेमाने प्रार्थना करत. पण त्यांनी आपलं उपोषण सोडलं नाही.

"जेव्हा मला खात्री होईल की सर्व धर्मांच्या लोकांमध्ये सलोखा निर्माण झाला आहे, तेव्हाच मी माझं उपोषण सोडणार आहे, असं त्यांनी निग्रहानं सांगितलं," अशी नोंद वॉलपर्ट यांच्या पुस्तकात आहे.

Image copyright Getty Images

"जर माझ्या अकार्यक्षमतेमुळं या देशातील हिंसाचार नियंत्रणात येत नाही, असं बापूंना वाटत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो," असं सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं. पण गांधींनी त्याही गोष्टीला नकार दिला.

100हून अधिक नेत्यांनी महात्मा गांधींना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली होती. आम्ही शपथ घेऊन सांगतो की आम्ही धार्मिक सलोखा ठेऊ, असं आश्वासन त्यांनी वारंवार दिलं. त्यानंतर 18 जानेवारीला त्यांनी आपलं उपोषण सोडलं. त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद असे प्रमुख नेते उपस्थित होते.

"आम्ही या पुढं बंधुभावाने राहू, असं सात कलमी आश्वासन सर्व गटांच्या नेत्यांनी लिहून दिलं. कोणत्याही स्थितीत आम्ही ही प्रतिज्ञा मोडणार नाही, असं ही त्यात म्हटलं होतं," अशी नोंद या पुस्तकात आहे.

20 जानेवारीला काय घडलं होतं?

"20 जानेवारी रोजी ते बिर्ला हाऊसच्या बागेत प्रार्थनेसाठी पोहचले. प्रार्थनेसाठी शेकडो लोक जमा झाले होते. इथं महात्मा गांधींसाठी एक छोटंसं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. त्या व्यासपीठावरुन ते बोलू लागले पण माइक खराब होता. तरी देखील त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं, 'जे मुस्लिमांचे शत्रू आहेत ते भारताचेही शत्रू आहेत' असे ते म्हणाले. तितक्यात एक स्फोट झाला. इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइसने (IED) हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. व्यासपीठापासून काही अंतरावरच हा स्फोट झाला होता," अशी माहिती तुषार गांधी यांनी दिली.

तुषार गांधी यांनी 'लेट्स किल गांधी' हे पुस्तक लिहिण्यासाठी या घटनेचा बारकाईनं अभ्यास केला आहे.

या स्फोटामुळं बागेत गोंधळ, पळापळ सुरू झाली. फक्त महात्मा गांधी शांतपणे बसून होते.

नथुराम गोडसेचा सहकारी दिगंबर बडगे सर्व्हंट क्वार्टरमध्ये लपला होता. तिथून त्यानं गोळीबार करायचा, असा कट होता. पण त्याचं धाडस झालं नाही आणि सर्वांनी तिथून पळ काढला. हा कट नथुराम गोडसेने रचला होता. नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे आणि नारायण आपटे यावेळी इथं उपस्थित होते.

हॅंडग्रेनेड टाकणाऱ्या मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. पण त्याचे सर्व साथीदार मात्र पळून गेले.

Image copyright Fox Photos

या घटनेच्या 10 दिवसांनंतर म्हणजे 30 जानेवारी 1948 ला बिर्ला हाऊसमध्येच नथुराम गोडसेने प्रार्थनेच्या वेळीच गांधींवर गोळ्या झाडल्या.

तर गांधीची हत्या टळली असती

गांधींच्या हत्येची चौकशी करण्यासाठी नंतर कपूर आयोगाची स्थापना झाली होती. 10 दिवस आधी एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी सावध व्हायला हवं होतं, असं न्यायाधीशांनी सुनावणीवेळी म्हटलं होतं. याची नोंद कपूर आयोगाच्या अहवालामध्ये आहे, असं तुषार गांधी म्हणाले.

"पोलिसांनी जर दक्षता बाळगली असती तर 30 जानेवारीला त्यांच्यावर झालेला हल्ला टाळता आला असता. 20 जानेवारीला हल्ला होऊन तुम्ही काहीच का केलं नाही, असा जाब न्यायाधीशांनी पोलिसांना विचारला होता. आम्हाला वाटलंच नाही की हल्लेखोर इतक्या लवकर परत हल्ला करतील असं, उत्तर त्यावेळी पोलिसांनी दिलं होतं," असं तुषार गांधी यांनी सांगितलं.

...तर परिस्थिती वेगळी असती

"20 जानेवारी रोजी झालेल्या घटनेपासून आपण धडा घ्यायला हवा होता. तसं झालं असतं तर 30 जानेवारीची घटना टळली असती. या देशाला एकत्र ठेवण्यासाठी, या देशाची शांतता अबाधित राखण्यासाठी गांधींजी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करत होते. ऊर्वरित आयुष्यातही त्यांनी हेच कार्य सुरू ठेवलं असतं," असं मत सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.

Image copyright Getty Images

गांधींच्या हत्येची पार्श्वभूमी कशी होती, या विषयावर त्यांनी एक पुस्तक संपादित केलं आहे. त्यांनी संपादित केलेल्या 'बियाँड डाउट- ए डॉसिएर ऑन गांधीज असासिनेशन' या पुस्तकात विविध लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे.

गांधींच्या हत्येचे 4 प्रयत्न

यापूर्वी त्यांच्या हत्येचा 4 वेळा प्रयत्न झाला होता आणि सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे हे प्रयत्न नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनीच केले होते, अशी दाट शक्यता आहे असं तुषार गांधी यांनी म्हटलं.

1. पुणे टाऊन हॉलजवळ गांधींच्या ताफ्यातील गाडीवर हॅंडग्रेनेड टाकण्यात आलं होतं. 1934मध्ये गांधी 'हरिजन यात्रे'निमित्त पुण्यात आले होते. दोन कारमधून गांधी आणि त्यांचे सहकारी येत होते. गांधींची कार टाऊन हॉलला उशिरा पोहचली. पण हल्लेखोरांना वाटलं की पहिल्याच कारमध्ये गांधी आहेत. त्यांनी त्यांच्या गाडीवर हॅंडग्रेनेड टाकलं. हे ग्रेनेड गाडीच्या बॉनेटवर पडलं आणि बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात कुणाला दुखापत झाली नव्हती.

2. त्यांच्यावर दुसरा हल्ला पाचगणी इथं झाला होता. 1944मध्ये गांधींची प्रकृती खालावली होती. त्यांना विश्रांतीसाठी पाचगणी इथं नेण्यात आलं होतं. दिलखुश नावाच्या एका बंगल्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. इथं ते गावकऱ्यांसोबत रोज संध्याकाळ प्रार्थना करत असत. एकदा प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यावर एक युवक चालून आला. त्याच्या हातात खंजीर होता. गांधींचे रक्षक भिल्लारे गुरूजी यांच्या लक्षात आलं की समोरून कुणी चाल करून येत आहे. त्यांनी त्या युवकाला जेरबंद केलं आणि त्याच्या हातातून खंजीर हिसकावून घेतला. त्या युवकाला सोडून द्या, असं गांधींनी सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो युवक नथुराम गोडसे होता, असं भिल्लारे गुरूजींनी म्हटलं होत.

Image copyright Getty Images

3. गांधींच्या हत्येचा तिसरा प्रयत्न झाला तो सेवाग्राममध्ये. 1944मध्ये गांधी वर्धा स्टेशनहून रेल्वेने जाणार होते. त्यावेळी एक युवक गांधींवर चालून आला. पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडलं. त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. त्याची नोंद देखील घेतली गेली नाही, असं गांधींचे चरित्र लेखक प्यारेलाल यांनी म्हटलं आहे.

4. या प्रयत्नाच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1945मध्ये महात्मा गांधी मुंबईहून पुण्याकडं रेल्वेने येत होते. एक गार्डचा डबा, एक इंजिन आणि एक तिसऱ्या वर्गाचा डबा अशी ही रेल्वे होती. रात्रीची वेळ होती. रेल्वे कसारा घाटात पोहचली. तेव्हा तिथं रुळांवर काही ओंडके ठेवण्यात आले होते. तसेच दगडांचा एक ढिगारा करण्यात आला होता. तो ढिगारा चालकाला दिसला आणि त्याने करकचून ब्रेक दाबला. त्या इंजिनाचा हलका धक्का त्या ढिगाऱ्याला बसला पण एक मोठा घातपात टळला.

गांधीजी पुण्याला आले आणि म्हणाले ज्या लोकांना मला मारावयाचे आहे त्यांनी मला खुशाल मारावे. पण माझ्या सोबतच्या लोकांना नुकसान पोहोचवू नये.

"गांधींच्या निधनानंतर देशाला एक मोठा धक्का बसला. एकमेकांच्या जीवावर उठलेले समुदाय अचानकपणे शांत झाले. गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आले. म्हणजे मृत्यूनंतरही त्यांनी देशाची एकात्मता टिकवण्यासाठी कार्य केलं," असं तुषार गांधी म्हणाले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)